नीलमताई गोर्‍हेंच्या ‘त्या’ फोटोमुळे शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण

30 Oct 2020 17:40:54
Nilam Gore 33 _1 &nb





मुंबई : शिवसेनेसाठी वंदनीय असलेल्या हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुस्तकाचा चक्क मोबाईल ठेवण्यासाठी ‘आधार’ म्हणून वापर केल्याने विधान परिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलमताई गोर्‍हे या वादाच्या भोवर्‍यात सापडल्या. एका ट्विटला रिट्विट करताना त्यांनी शेअर केलेला एक फोटो वादग्रस्त ठरल्याने त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला.
 
 
या फोटोत शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक पुस्तक व्हीडिओ कॉन्फरन्सच्या वेळी मोबाईखाली ठेवण्यात आले होते. ‘ही वेळ बाळासाहेबांवर?’, या मथळ्याखाली हा फोटो अनेक समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या फोटोबाबत सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणार्‍या नीलम गोर्‍हे यांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी यानंतर सर्वत्र होवू लागली.
 
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सध्या राज्यातील मंत्री आणि नेत्यांच्या ऑनलाईन बैठकांचे सत्र सुरू आहे. शुक्रवारी दि. ३० ऑक्टोबर रोजी नाट्यगृहांच्या दुरुस्ती-देखभालीच्या कामासंदर्भात विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या अध्यक्षतेखाली ई-बैठक घेण्यात आली. यावेळी अभिनेते आदेश बांदेकर, सुबोध भावे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आचार्य अत्रे नाट्यगृहातील माल वाहतूक लिफ्टचे काम पूर्ण करण्याचे निर्देश उपसभापतींनी दिले होते.
 
दरम्यान, या बैठकीची माहिती राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभाग यांच्या ‘महाराष्ट्र डीजीआयपीआर’ या अधिकृत खात्याद्वारे ट्विट करण्यात करण्यात आले होते. यावेळी निलम गोर्‍हे यांचा व्हीडिओ कॉन्फरन्सिंगचा एक फोटोही ट्विट करण्यात आला. त्यात बाळासाहेब ठाकरे यांचे एक पुस्तक त्यांनी मोबाईलखाली ठेवल्याचे पहायला मिळत आहे.
 
कॅमेर्‍यात व्हीडिओ नीट दिसावा त्यासाठी या पुस्तकाचा आधार घेण्यात आला होता असे दिसत असून या फोटेवरून सर्वत्र संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. अनेकांनी याचा निषेध नोंदवताना याप्रकरणी नीलम गोर्‍हे यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी केली. याबाबत नीलम गोर्‍हे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होवू शकला नाही.
 



 
Powered By Sangraha 9.0