नाथाभाऊ सरपंच होण्यापूर्वीच...

30 Oct 2020 21:29:22

Eknath khadse_1 &nbs
 
 
 
नाथाभाऊंच्या बोलण्यावरून असा समज होतो की, उत्तर महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्ष किंवा त्याचा मूळ पक्ष असलेल्या जनसंघासाठी पूर्ण दुष्काळी प्रांत होता आणि नाथाभाऊंनी खस्ता खाल्यानंतरच तेथे भाजपला सोन्याचे दिवस आले. उत्तर महाराष्ट्रात नाथाभाऊंच्यामुळे पक्ष उभा राहिल्यावर मात्र पक्षाने त्यांच्यावर अन्याय करून त्यांना दूर लोटले, असाही समज होतो. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे.
 
 
भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात विशेषतः उत्तर महाराष्ट्रात भाजपची उभारणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी पक्षाच्या उभारणीसाठी प्रसंगी दगडगोटे खाल्ले आणि उत्तर महाराष्ट्रात भाजप उभा केला. नाथाभाऊंच्या बोलण्यावरून असा समज होतो की, उत्तर महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्ष किंवा त्याचा मूळ पक्ष असलेल्या जनसंघासाठी पूर्ण दुष्काळी प्रांत होता आणि नाथाभाऊंनी खस्ता खाल्यानंतरच तेथे भाजपला सोन्याचे दिवस आले. उत्तर महाराष्ट्रात नाथाभाऊंच्यामुळे पक्ष उभा राहिल्यावर मात्र पक्षाने त्यांच्यावर अन्याय करून त्यांना दूर लोटले, असाही समज होतो. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. १९५७ साली लोकसभा निवडणुकीत जळगावच्या शेजारच्या धुळे मतदारसंघातून जनसंघाच्या तिकिटावर उत्तमराव पाटील या नेत्याला जनतेने निवडून दिले. त्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जनसंघाचे दोन खासदार निवडले गेले, ते म्हणजे उत्तमराव पाटील आणि प्रेमजीभाई आशर (रत्नागिरी मतदारसंघ). लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे उत्तमराव पाटील हे जनसंघाचे प्रमुख नेते म्हणून उदयाला आले. एकनाथराव खडसे यांचा जन्म १ जून, १९५२ रोजी झाला. त्यानंतर पाच वर्षांनी जनसंघाचा उमेदवार खानदेशात लोकसभा निवडणुकीत विजयी झाला.
 
 
नाथाभाऊंच्या बोलण्यावरून वाटत असले तरी त्यांचा राजकारणात उदय होण्यापूर्वी उत्तर महाराष्ट्र हा जनसंघ-भाजपसाठी दुष्काळी प्रदेश होता, असे बिल्कुल नाही. १९२१ साली जळगाव जिल्ह्यातच जन्म झालेल्या उत्तमराव पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात व विशेषतः उत्तर महाराष्ट्रात जनसंघ बळकट केला होता. नंतर त्यांनी जनसंघाचा पुढचा अवतार असलेल्या भारतीय जनता पक्षाचाही पाया मजबूत केला. उत्तमराव पाटील हे एम.ए, एलएल.बी असे उच्चशिक्षित होते. ते १९५७ ते १९६२ अशी पाच वर्षे लोकसभा सदस्य होते. पण, त्यापूर्वीच ते आमदार म्हणून राजकीय पटलावर चमकले होते. ते १९५४ ते १९५५ असे एक वर्ष विधान परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर ते लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. पुन्हा १९६६ ते १९७२ आणि १९७२ ते १९७८ असे दोन वेळा म्हणजे बारा वर्षे विधान परिषदेचे आमदार होते. याच कालावधीत ते बारा वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. नाथाभाऊ शाळेत आणि महाविद्यालयात शिकत असताना उत्तमराव पाटील यांनी या पदांवर काम केले होते व पक्षाचा पाया मजबूत केला होता.
 
 
१९७८ साली विधानसभा निवडणुकीत उत्तमराव पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पारोळा मतदारसंघातून जनता पक्षाचे आमदार म्हणून निवडले गेले. त्यावेळी आणीबाणीनंतर जनसंघाचे विलिनीकरण करून जनता पक्ष निर्माण झाला होता. पुढे जनता पक्षाच्या पाठिंब्याने पुरोगामी लोकशाही दलाचे (पुलोद) सरकार स्थापन झाले. त्यामध्ये उत्तमराव पाटील महसूलमंत्री झाले. १९७८च्या विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याप्रमाणेच अंमळनेर मतदारसंघात जनता पक्षाचे गुलाबराव पाटील विजयी झाले. चोपडा मतदारसंघात माधवराव कौतिक चौधरी हे जनता पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले. एरंडोलमध्ये महेंद्रसिंह धरमसिंह पाटील हेसुद्धा जनता पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले. त्याचप्रमाणे पाचोर्‍यात ओंकार नारायण वाघ आणि यावलमध्ये सिंधू पार्थ चौधरी हे जनता पार्टीचे विजयी उमेदवार होते. जळगाव, रावेर व एदलाबादमध्ये जनता पार्टीचे उमेदवार पराभूत झाले, पण त्यांची कामगिरी खूपच चमकदार होती. जळगावमध्ये जनता पक्षाच्या शेख मोहम्मद इस्माईल इब्राहिम यांना ३० टक्के मते मिळाली व दुसरा क्रमांक मिळाला. रावेरमध्ये गुणवंत रामभाऊ सरोदे हे २३ टक्के मते मिळवून दुसर्‍या क्रमांकावर होते. हे सर्व घडले त्यावेळी नाथाभाऊ २६ वर्षांचे होते आणि जनता पक्षाचे यश हे नाथाभाऊंचे कर्तृत्व नव्हते. उत्तर महाराष्ट्रात जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले. कारण, मुळात तेथे १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या काळात जनसंघाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या उत्तमराव पाटील यांचे भक्कम नेतृत्व प्रभावी होते. पुढे १९८० साली देशात भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी पक्षाचे महाराष्ट्रातील पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून उत्तमराव पाटील यांनी जबाबदारी पेलली. स्वाभाविकपणे उत्तर महाराष्ट्रात भाजपचे काम वाढण्याला मदत झाली.
 
 
१९७८च्या विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. एदलाबाद मतदारसंघात जनता पक्षाचे अशोक फडके यांना सुमारे ४२ टक्के मते मिळाली होती व ते दुसर्‍या क्रमांकावर होते. पण, अशोक फडके यांना विजयी उमेदवार प्रतिभा पाटील यांच्यापेक्षा केवळ ६९९ मते कमी मिळाली होती. फडके यांना ७०० मते अधिक मिळाली असती, तर ते आमदार झाले असते. अशोक फडके हे जनसंघाचे समर्पित कार्यकर्ते होते. त्यांनी आर्थिक झळ सोसून जळगाव जिल्ह्यात जनसंघाचे काम वाढविले होते. पुढे १९८०च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून एदलाबाद मतदारसंघातून निवडणूक लढविली. विजयी झाले नसले तरी त्यांनी २१ टक्के मते मिळवून पक्षाचा जनाधार कायम ठेवला. १९८५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी इंदिरा काँग्रेसच्या विरोधात विरोधी पक्षांनी जागावाटपाची व्यूहरचना केली, त्यामध्ये एदलाबादचा मतदारसंघ समाजवादी काँग्रेसकडे गेला व हरिभाऊ जावरे निवडून आले. अशा रितीने मुळात अशोक फडके यांच्या प्रयत्नाने विरोधी पक्षासाठी जमीन कसून तयार झालेल्या एदलाबाद विधानसभा मतदारसंघात १९९० पासून पुढे एकनाथराव खडसे निवडून आले.
 
एकनाथराव खडसे हे १९८४ साली कोथळी गावचे सरपंच झाले. त्यापूर्वीच त्यांच्या जळगाव जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात विशेषतः खानदेशात जनसंघ आणि भाजपला निवडणुकात यश मिळाले होते आणि कधी पक्षाचे उमेदवार विजयी झाले नसले तरी त्यांना लक्षणीय मते मिळाली होती. त्यामुळे १९९० साली आमदार एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाच्या रुपाने जळगाव परिसरात भाजपचे नेतृत्व उदयाला आल्यानंतरच शून्यातून पक्षाचा उदय झाला, असे समजणे वस्तुस्थितीला धरून नाही. लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर १९८९ साली एरंडोल लोकसभा मतदारसंघातून उत्तमराव पाटील पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून गेले. त्यावेळी शेजारच्या जळगाव मतदारसंघात भाजपच्या गुणवंतराव सरोदे यांना २,०३,५५६ मते मिळाली व ते दुसर्‍या क्रमांकावर राहिले. लगेचच १९९१च्या लोकसभा निवडणुकीत गुणवंतराव सरोदे यांची मते सुमारे ३० हजारांनी वाढली व ते खासदार म्हणून विजयी झाले. त्यापूर्वी १९७७च्या लोकसभा निवडणुकीत एरंडोल व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. १९६७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघात जनसंघाच्या पी. आर. पटवर्धन यांना ५०,९१८ मते म्हणजे १७.३८ टक्के मते मिळाली होती.
 
 
विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर नाथाभाऊ दहा वर्षांचे असताना १९६२ साली जळगावमध्ये केशवराव भोईटे यांना १७ टक्के मते मिळाली होती व ते तिसर्‍या स्थानावर होते. त्याचप्रमाणे चोपडा (१३.९७ टक्के), अंमळनेर (१६.५१ टक्के), पारोळा (२२.७४ टक्के), भुसावळ (११.२२ टक्के) व एदलाबाद (११.२१ टक्के) या मतदारसंघांमध्ये जनसंघाला चांगली मते मिळाली होती. साधारणपणे ४० टक्के मतांचा उंबरठा ओलांडला की उमेदवार विजयी होतो व त्यामुळे दहा टक्के मते म्हणजे पक्षाचा चांगला जनाधार असल्याचे मानले पाहिजे, असे माझे मत आहे. अशाच प्रकारे १९६७ च्या विधानसभा निवडणुकीतही जनसंघाला या परिसरात चांगली मते मिळाली होती. या निवडणुकीत जळगावला पी. के. झारे यांना २१ टक्के मते मिळाली होती. तसेच चाळीसगाव (पी. एम. मोरे ११.४५ टक्के), पारोळा (२९.३४ टक्के), जामनेर (२०.१२ टक्के), भुसावळ (२३.६९ टक्के) या मतदारसंघांमध्येही जनसंघाला चांगली मते मिळाली होती. अशा रितीने खूप पूर्वीपासून जळगाव-धुळे परिसरात म्हणजेच खानदेशात जनसंघाचा पाया चांगला तयार झाला व पुढे त्याच्या आधारावर भाजपचा विकास झाला. नाथाभाऊ सरपंच झाले, त्याच सुमारास १९८५ साली जळगाव जिल्ह्यातच रावेर विधानसभा मतदारसंघातून गुणवंतराव सरोदे भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून विजयी झाले होते, हे ध्यानात घ्यायला हवे. उत्तर महाराष्ट्रातील पक्षाची ताकद निर्माण होण्यात अर्थातच प्रमुख योगदान हे या परिसरातून तयार झालेल्या उत्तमराव पाटील यांच्या नेतृत्वाचे आहे.
 
 
वरील वस्तुस्थिती ध्यानात घेतली तर असे स्पष्ट होते की, एकनाथराव खडसे यांनी खानदेशात भारतीय जनता पक्षाचा पाया निर्माण करून पक्षाला विजयी केले असे झाले नाही. उत्तमराव पाटील व अन्य नेत्यांनी तयार केलेल्या इमारतीवर नाथाभाऊंनी मजला चढविला असे जास्तीत जास्त म्हणता येईल. जून २०१६ मध्ये एकनाथराव खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला व ते सतत नाराज होते तरीही भाजपच्या निवडणुकीतील यशावर कोणताही गंभीर विपरीत परिणाम झाला नाही. कारण, या परिसरात मुळातच पक्षाचा पाया मजबूत आहे. वरील मांडणीमध्ये शब्दांची मर्यादा ध्यानात घेता, उत्तर महाराष्ट्रातील नाथाभाऊंच्या जळगाव या स्वतःच्या जिल्ह्यापुरता विचार केला आहे. नाशिक, धुळे, नंदूरबार व अहमदनगर या जिल्ह्यांचा विचार केला तर आणखी विस्मयकारक चित्र दिसेल. सत्य कल्पितापेक्षा अद्भुत असते.
 
- दिनकर माहुलीकर
 
 
 
Powered By Sangraha 9.0