माणगाव तालुक्यात आढळले निसर्गातील दुर्मीळ सफाई कामगार

    दिनांक  03-Oct-2020 17:53:26
|
vulture _1  H x

 गिधाडांच्या तीन प्रजातींची नोंद 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - निसर्गातील सफाई कामगार आणि संकटग्रस्त प्रजातीची गिधाडे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आढळून आली आहेत. वन्यजीव छायाचित्रकारांनी शुक्रवारी पक्षीनिरीक्षणादरम्यान भारतीय आणि पांढऱ्या पुठ्ठ्याची गिधाडांची नोंद केली. या नोंदीमुळे नष्टप्राय होणाऱ्या गिधाडांसाठी कोकणात खास करुन रायगडमध्ये पोषक वातावरण असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.


 

महाराष्ट्रात गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद असली तरी ‘पांढऱ्या पुठ्ठ्याची’, ‘लांब चोचीची’ आणि ‘पांढरी गिधाडे’ १९९० आणि त्यापूर्वी मोठय़ा संख्येने आढळत होती. गिधाडांची संख्या देशभरात कोलमडल्यानंतर अपुऱ्या खाद्यपुरवठय़ामुळे राज्यात आढळणारी गिधाडे सुद्धा दिसेनाशी झाली. त्यामुळे त्यांचा समावेश ‘नष्टप्राय श्रेणी’तील पक्ष्यांच्या यादीत करण्यात आला. जिल्ह्यात श्रीवर्धन आणि म्हसाळा तालुक्यातील काही भागांमध्ये पांढऱ्या पुठ्ठ्याच्या गिधाड अधिवास आहे. याठिकाणी त्यांची घरटीही आहेत. वन्यजीव छायाचित्रकार तुषार भोईर यांना शुक्रवारी माणगावमध्ये नऊ पांढऱ्या पुठ्ठयाची आणि पाच भारतीय प्रजातीची गिधाडे आढळली. ही १४ गिधाडे झाडावर एकाच थव्यामध्ये बसल्याची माहिती त्यांनी दिली. 
 

vulture _1  H x 

 
 
यापूर्वी माणगावमध्ये वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवसेकर यांनी गिधाडांची नोंद केली आहे. त्यामध्ये भारतातील गिधाडांच्या प्रजातीमधील सर्वात मोठ्या 'हिमालयीन ग्रिफाॅन' गिधाडांची नोंद आहे. पांढऱ्या पुठ्ठयाची आणि भारतीय गिधाडांचे वास्तव्य हे आग्नेय आशियाई देशांमध्ये आहे.. तर 'ग्रिफाॅन' हे हिमालय पर्वत रांगेत सापडतात. परंतु, हिवाळ्यात हे भारताच्या दक्षिणेकडे स्थलांतर करतात. पांढऱ्या पुठ्ठ्याची आणि भारतीय गिधाड यांना 'आययूसीएन'च्या संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. यांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे, गुरांना-जनावरांना देण्यात येणारे 'डायक्लोफेनॅक' औषध आहे. यांच्या तुलनेत 'ग्रिफाॅन' गिधाडांची संख्या बऱ्यापैकी संतुलित आहे.

 

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.