तेव्हा संजय राऊत झोपले होते का ?

03 Oct 2020 12:11:02

praveen darekar _1 &


जालना :
हाथरस येथील बलात्कार आणि हत्याकांडाची चौकशी झालीच पाहिजे. तशी मागणीही आम्ही केली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील या घटनेवरून महाराष्ट्रात राजकारण केले जात आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रवीण दरेकर बदनापूरला आले होते. यावेळी बोलताना त्यांनी हाथरस प्रकरणावरून विरोधकांनी सुरू केलेल्या राजकारणावर सडकून टीका केली.


हाथरस प्रकरणावर पंतप्रधान का बोलत नाहीत? या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याचा प्रवीण दरेकर यांनी समाचार घेतला. रोह्याला चौदा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या मुलीला दरीत फेकून देण्यात आले. पुण्यात एका तरुणीला डोंगरात नेऊन दगडाने ठेचून मारण्यात आले. त्यावेळी राज्य सरकार झोपले होते का? क्वॉरंटाइन सेंटरमध्ये बलात्कार होता आहेत. त्यावर चकार शब्द काढला जात नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. महाराष्ट्रात अराजकता माजली आहे. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. त्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांपासून ते राऊतांपर्यंत कोणीच बोलायला तयार नाही, असे सांगतानाच उत्तर प्रदेशातील घटनेवरून मात्र महाराष्ट्रात राजकारण केले जात असून या लोकांची करणी आणि कथनी यात अंतर आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. हाथरसमध्ये मीडियाला जाण्यापासून रोखणे चुकीचे असून मीडियामुळे अनेक प्रश्नमार्गी लागतात, असेही ते म्हणाले. पुढे ते म्हणतात, उत्तर प्रदेशातील घटना दुर्देवीच आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या घटनेची चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार असलं तरी आमची भूमिका स्पष्ट आहे. या घटनेची कुणीच पाठराखण केली नाही आणि करणारही नाही, असेही दरेकर यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0