हाथरस प्रकरणी पोलीस अधीक्षकांसह सात जणांचं निलंबन

03 Oct 2020 13:49:04


yogi adityanath_1 &n


नवी दिल्ली :
हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर सिंह, क्षेत्राधिकारी (सीओ) राम शब्द, पोलीस निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, उपनिरीक्षक जगवीर सिंग आणि महेश पाल यांना निलंबित करण्यात आले आहे. हाथरस प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई केली आहे. तसेच दोन्ही पक्षांची (पीडित आणि आरोपी) नार्को टेस्ट केली जाणार आहे. तसेच हाथरस पोलीस स्थानकातील सगळ्या पोलिसांची नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे.


एसआयटीच्या प्राथमिक अहवालानंतर योगी सरकारने ही मोठी कारवाई केली आहे. हाथरसचे एसपी, डीएसपी आणि पोलीस इन्सपेक्टर यांच्यावर योगी सरकारने कारवाई केली आहे. या बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. स्थानिक प्रशासनाविरोधात नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात होता. अखेर योगी सरकारने ही मोठी कारवाई केलीये. तत्पूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत ट्वीट करत म्हटलं की, उत्तर प्रदेशातील माता-भगिनींचा सन्मान आणि स्वाभिमानाला हानी पोहण्याची कल्पना करणाऱ्यांचा विनाश निश्चित आहे. अशांना अशी शिक्षा मिळेल जी भविष्यात एक उदाहरण ठरेल. उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक माता-भगिनींच्या सुरक्षा आणि विकासासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आणि वचन आहे.


१४ सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. यानंतर तिला अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला सोमवारी (२८ सप्टेंबर) दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिथे तिने मंगळवारी सकाळी प्राण सोडले. या प्रकरणातील चार आरोपींना पकडले असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण भागात कलम १४४लागू करण्यात आले आहे. हाथरस प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी चौकशी नेमली आहे.
Powered By Sangraha 9.0