भारत-चीन संघर्ष : चिनी सामरिक तज्ज्ञांच्या नजरेतून...

    दिनांक  03-Oct-2020 19:40:31   
|


armies_1  H x W
 

काही चिनी तज्ज्ञ असेही म्हणतात की, भारताने स्वसंरक्षणार्थ कारवाई केली. त्यांचा चीनवर आक्रमण करण्याचा उद्देश नाही. भारतीय लष्कराने जो गोळीबार केला, तो चीनच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी नव्हता. भारतीय सैन्य पुन्हा पुन्हा इशारा देते आहे की, चिनी सैन्याने पुन्हा हल्ला केला, तर मात्र आम्ही नक्कीच आक्रमक प्रत्युत्तर देऊ.सीमेवर पुष्कळ सैन्याची जमवाजमव केल्यानंतर भारतीय सैन्य आणि सरकार घाबरून जाईल आणि वाटाघाटी करण्यास चीनकडे विनंती करेल, अशी चीनची अटकळ होती. मात्र, असे अजिबात झाले नाही. चीनने १४-१५ जूनला कर्नल बाबूंवर प्राणघातक हल्ला करून भारतावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला. मात्र, गलवानमध्ये झालेल्या लढाईत १०० हून जास्त चिनी सैनिक मारले गेले आणि चीनलाच मोठा धक्का बसला. त्यानंतर २७-२८ ऑगस्ट आणि ३१ ऑगस्टला भारताने आक्रमक कारवाई करत एलएसीवर चिनी सैन्याच्या वरील भागात असलेल्या डोंगरमाथ्यावर भारतीय सैन्य तैनात केले. सर्वात महत्त्वाची घटना ७ सप्टेंबरला घडली. पँगॉग तलावाच्या दक्षिण भागात भारतीय सैन्याने ब्लक टॉप शिखरावर कब्जा केला. १९६२च्या युद्धात चीनने भारताकडून हे शिखर काबिज केले होते. त्यासाठी ८२ चिनी सैनिकांना प्राण द्यावे लागले होते. भारताने मात्र कोणतीही किंमत न चुकवता हे शिखर ताब्यात घेतले. त्याचा चीनला मोठाच धक्का बसला आहे.


युद्ध लढण्याचे तीन भाग


चिनी सैन्याच्या युद्ध लढण्याच्या पद्धतीचे तीन भाग करता येतील. पहिल्या भागामध्ये ते मोठ्या प्रमाणात शत्रूंवर (भारतावर) मानसिक युद्ध लादतात, वेगवेगळ्या पद्धतीने घाबरवण्याचा प्रयत्न करतात. दुसर्‍या भागात शत्रू देशातील आपल्या हस्तकांमार्फत वेगवेगळे लेख लिहून त्या देशाल घाबरायला भाग पाडतात. त्यानंतरही यश मिळाले नाही तर आपल्या भूभागावर सैन्याची प्रचंड प्रमाणावर जमवाजमव करून आम्ही तुमच्यावर हल्ला करणार आहोत, असे चित्र निर्माण करतो, जेणेकरून ते राष्ट्र घाबरून त्यांच्याशी वाटाघाटी करेल.


भारताला जेरीस आणण्यामध्ये पूर्ण अपयशच


चीनने ही तिहेरी पद्धत वापरून भारताला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यामध्ये त्यांना पूर्ण अपयशच आलेले आहे. म्हणून आता चिनी सामरिक तज्ज्ञ ज्यामध्ये चिनी सैन्याचे जनरल्स, इतर सामरिक तज्ज्ञ आणि त्यांचे राजकीय नेतृत्व आता काय करावे, हे यावर गांभीर्याने विचार करताहेत. त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे कळली आहे की, भारताविरोधात चीनच्या लढण्याच्या तीन पद्धती अयशस्वी ठरल्या आहेत. चीन सैन्याने मान्य केले आहे की, भारताची ताकद म्हणजे त्यांचे लष्कर आणि लष्करी अधिकारी, तर चीनची ताकद त्यांचे सीमाभागात तयार झालेले रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा. त्यामुळे चिनी सैन्याला सीमेवर वेगाने सैन्य तैनात करणे सोपे जाते.
शेकडो रणगाडे, चिलखती वाहने, ५०-६० हजार सैन्य चीनने लडाखमध्ये आणले आहे. त्याचा भारतीय लष्करावर काहीही परिणाम झालेला नाही. ज्यावेळेला गलवानमध्ये चीनला रक्तबंबाळ करण्यात आले, तेव्हा चिनी तज्ज्ञांनी विचारायला सुरुवात केली की, चीन सैन्य भारतावर प्रत्युत्तरादाखल हल्ला का करत नाही. परंतु, चिनी सैन्य मानसिक द़ृष्टीने आक्रमक कारवाई करायला तयार नाही. त्यानंतर चिनी तज्ज्ञांनी असे म्हणायला सुरुवात केली की, आम्ही शांतपणे विचार करत आहोत. कारण, आम्हाला लढाई करायची नाही. परंतु, जेव्हा गरज पडेल, तेव्हा मात्र भारताला चोख उत्तर देऊ.


चिनी सैनिक अत्यंत नाजूक


काही चिनी तज्ज्ञ असेही म्हणतात की, भारताने स्वसंरक्षणार्थ कारवाई केली. त्यांचा चीनवर आक्रमण करण्याचा उद्देश नाही. भारतीय लष्कराने जो गोळीबार केला, तो चीनच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी नव्हता. भारतीय सैन्य पुन्हा पुन्हा इशारा देते आहे की, चिनी सैन्याने पुन्हा हल्ला केला, तर मात्र आम्ही नक्कीच आक्रमक प्रत्युत्तर देऊ. काही तज्ज्ञांचे मत असेही आहे की, सीमेवर सध्या जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचा फायदादेखील होऊ शकतो. तो म्हणजे, सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीतूनही दोन्ही देशांना आपसातील संबंध सुधारण्याची संधीही मिळू शकते. भारतीय सैन्य, चीन आणि पाकिस्तान दोन्ही देशांविरोधात लढण्यास तयार आहेत. कारण, गेली ७० वर्षे सीमारक्षण हेच आपले ध्येय ठेवले आहे. परंतु, चीनचे सैन्य मात्र केवळ सीमेवर गस्त घालण्यासाठी किंवा पेट्रोलिंगसाठी येते.


गेल्या ४० वर्षांत ‘एक मूल योजने’मुळे चीनची लोकसंख्या कमी होत आहे. त्यांचे सैनिक अत्यंत नाजूक होत आहेत. कारण, चिनी सैनिक हे उच्चभ्रू घरातून आलेले असल्याने शारीरिक तंदुरुस्ती त्यांच्याकडे अजिबात नसते.
भारताने दोन लाखांपर्यंत सैन्य भारत-चीन सीमेवर तैनात केले आहे. त्यामुळे चिनी सैन्याने हल्ला करायचे ठरवले, तर डोंगराळ भागात रक्षण करणार्‍या सैनिकांविरोधात नऊ ते १२ पट सैनिक वापरावे लागतात. चीनकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्याची क्षमता अजिबात नाही. त्यामुळेच काहींचे म्हणणे आहे की, अशा परिस्थितीमध्ये फायदा भारतास होणार आहे. कारण, हे युद्ध खूप उंचीवर म्हणजे १५ ते १७ हजार फूट उंचीवर होईल. तिथे भारतीय सैन्य लढण्यासाठी तयार आहे. भारतीय लष्कर सियाचीन ग्लेशिअरवर तैनात आहे. म्हणून अनेक चिनी तज्ज्ञ चिनी सैन्याला अशीच सूचना देते आहे की, भारतीय सैन्य तयार आहे. त्यामुळे या भागात चीनने हल्ला केला तर लढाई जिंकण्यासाठी चीनला जीवतोड प्रयत्न करावे लागतील.


लढाईची वेळ कोणती?


त्यामुळे लढाई कशी करायला हवी, याविषयी चर्चा चिनी सामरिक तज्ज्ञ करताहेत. लढाईची वेळ कोणती? अमेरिकेत ऑक्टोबरमध्ये निवडणुका सुरू होतील तेव्हाची असावी, त्यावेळी अमेरिकेचे लक्ष भारत-चीन सीमेवर होऊ शकणार्‍या युद्धावर अजिबात नसेल. कारण, दोन महिने कोणीही राष्ट्राध्यक्ष नसेल, त्यामुळे ते भारताला कोणत्याही प्रकारची मदत करू शकणार नाहीत. त्यामुळेच चीनला असे वाटते की, भारतावर हल्ला करायचा असेल तर तो ऑक्टोबर महिन्यात केला जावा. हा हल्ला चार वेगवेगळ्या स्तरावर करण्यात येईल.


भारताशी युद्ध पुकारण्याची योग्य वेळ


पहिल्या टप्यात चिनी सैन्य त्यांच्याकडील क्षेपणास्त्रे, विमाने, हेलिकॉप्टरचा वापर करून भारताच्या मुख्य कार्यालयांवर हल्ला करतील, त्यांची संवाद साधने उद्ध्वस्त करतील, त्यांची एअर डिफेन्स व्यवस्था नेस्तनाबूत करतील. दुसर्‍या टप्प्यात भारताचा तोफखाना किंवा लढाईचा दारूगोळा, शस्त्रास्त्रे ठेवलेली जागा नष्ट केली जाईल. तिसर्‍या टप्प्यात महत्त्वाच्या उंचीवरील पर्वतांवर चिनी सैन्य चढून भारतीय सैन्याला वेढा घालण्याचा प्रयत्न करेल. चौथ्या टप्प्यात श्रीनगरपासून लेहकडे येणारा महत्त्वाचा रस्ता जो झोझिला, द्रास, कारगील मार्गे लेहला जातो, तो पाकिस्तानच्या मदतीने बंद केला जाईल. हा रस्ता कारगील युद्धात बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे लडाख हे उर्वरित भारतापासून तुटेल. याच वेळी पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश यांचीही भारताविरोधात लढण्यासाठी मदत घेतली जाऊ शकेल. त्यामुळेच भारताशी युद्ध पुकारण्याची ही वेळ योग्य असून त्यासाठी चिनी सैन्याने तयारी करावी, असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


चिनी सैन्याची क्षमता आणि इच्छाशक्ती


अशा प्रकारची लढाई शक्य आहे का? तर त्यात दोन महत्त्वाचे घटक आहेत. एक म्हणजे, चिनी सैन्याची क्षमता आणि त्यांची इच्छाशक्ती. चीनने जवळपास एक ते दीड लाख सैन्य भारतीय सीमेवर एकत्रित केले आहे. म्हणून १९६२ सारखा हल्ला ते निश्चितच करू शकतात. मात्र, हा हल्ला भारतीय सैन्य पूर्ण ताकदीने रोखेल आणि प्रतिहल्ला करेल. त्यामुळे चीनच्या प्रतिमेला प्रचंड मोठा धक्का बसेल. त्याचवेळी अमेरिकेने जर तैवानच्या बाजूने चीनवर दबाव टाकला, तर दक्षिण चीन समुद्रात चीनवर दबाव वाढेल आणि चीनची परिस्थिती फारच कठीण होऊ शकते. चीनला बर्फ पडण्याआधी ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या आधी हल्ला करावा लागेल. बर्फ पडल्यानंतर सैन्याला फारशी हालचाल करता येणार नाही. मोठा हल्ला करायचा जर चीनचा विचार असेल, तर तो फक्त पुढील वर्षीच करता येईल, सद्यःपरिस्थितीत नाही. चीनच्या सैन्य जमवाजमवीला भारताने त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे. चीनकडे हल्ला करण्याची क्षमता आहे. मात्र, इच्छाशक्ती दिसत नाही. तरीही भारतीय सैन्याला हिवाळ्यात अतिथंड अतिउंच भागामध्ये लढाई करण्याची तयारी ठेवावीच लागेल; अर्थातच भारतीय सैन्याने त्याची तयारी आधीपासूनच केली असून भारतीय सैन्य चीनचा सामान करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
 
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.