सातासमुद्रापार ‘अक्षय पात्र’

29 Oct 2020 12:02:22
Akshay patra_1  




‘वसुधैव कुटुंबकम्’ ही सनातन धर्माची मूळ विचारधारा आणि संस्कृती... याच भारतीय संस्कृतीने जेव्हा-जेव्हा जगावर संकट ओढावले, त्या-त्या वेळेस या आपल्या मूलमंत्राला समोर ठेवून अविरत कार्य केले आहे. ‘अक्षय पात्र’ या स्वयंसेवी संस्थेने लंडनच्या विद्यार्थ्यांना अन्नदान मोहीम सुरू करून पुन्हा एकदा जगासमोर आदर्श ठेवला याची दखल घ्यायलाच हवी...

 
भारतात गरीब मुलांचा, भुकेल्या जीवांचा आधार बनलेली ‘अक्षय पात्र’ चॅरिटी संस्था आता सातासमुद्रापार इंग्लंडच्या मुलांची भूक शमविण्यासाठी पुढे आली आहे. या संस्थेने उत्तर-पश्चिम लंडन येथून वॉटफोर्डच्या नव्या स्वयंपाकघरातून अन्नदानाचा पहिला टप्पा वितरित केला आहे. शाकाहारी जेवणासाठी केवळ दोन पाऊंड (२०० रुपये) इतका खर्च यासाठी येत आहे. मुंबई, अहमदाबादसह देशभरात ठिकठिकाणी अन्नदान करणारी ही संस्था आता लंडनमध्येही सक्रिय होत आहे. याचे भारतीयांनी स्वागत करायला हवे. लंडन शहराच्या उत्तर भागांतील शाळांमध्ये हे अन्नदान केले जाणार आहे.
 
 
 
ब्रिटिश राजवटीच्या काळातील एक गरीब आणि भूकबळी जाणारा देश आज गोर्‍यांच्या देशातील गरीब विद्यार्थ्यांसाठी कैवारी ठरत आहे. विशेषतः भारतीय संस्कृतीने व्यापक दृष्टिकोन ठेवत परक्या देशातील मुलांची भूक शमविताना आपलेपणा सोडला नाही, तसेच इथल्या संस्कृतीची ओळखही करून दिली आणि विशेषतः शाकाहारी जेवण देऊन एक प्रतिकात्मक संदेशही दिला, हे वाखाणण्याजोगे आहे.
 
जगभरात कोरोना महामारीचे सावट असताना, सर्वात जास्त या मदतीची गरज होती. मात्र, लंडनच्या सरकारी शाळा ‘लॉकडाऊन’मध्ये बंद पडल्या. विद्यार्थ्यांना मोफत दिले जाणारे जेवण पोहोचविणे कठीण झाले. त्यामुळे ही मोफत जेवणाची सुविधा बंद करण्याचा निर्णय सरकारद्वारे घेण्यात आला होता. शाळा बंद झाल्या म्हणून भूक लागणे थांबत नाही, जी मुले आजवर ज्या जेवणावर अवलंबून होती, त्यांची ऐन ‘लॉकडाऊन’मुळे उपासमार होऊ लागली. या तुघलकी निर्णयाविरोधात आवाज उठविण्यात आला. मुलांना जेवण पुन्हा मिळावे, यासाठी दबाव टाकण्यात आला. मात्र, ही सरकारी प्रक्रिया पुन्हा सुरू होईल की नाही, तोवर मुलांची गैरसोय होणार नाही, याची जबाबदारी ‘अक्षय पात्र’ चॅरिटी संस्थेने घेतली.
 
भारतातील शाळांमध्ये अन्न पोहोचविणारी ‘अक्षय पात्र’ चॅरिटी संस्था या मुलांसाठी धावून आली. ‘मिक्स व्हेजिटेबल पास्ता’ आणि ‘हॉट कुलीफ्लॉवर चीझ’ हे पदार्थ विद्यार्थ्यांना दररोज पोहोचविले जाणार आहेत. क्रिकलवुडच्या मोरा प्रायमरी स्कूलच्या प्रमुख शिक्षक केट बास यांच्यावर याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. एका दिवसात एकूण नऊ हजार जेवणाची पाकिटे पोहोचविली जाऊ शकतात, इतकी या स्वयंपाकघराची क्षमता आहे. या योजनेनुसार लिसिस्टर आणि पूर्व लंडन येथे नाताळनिमित्त हे जेवण शाळांमध्ये पोहोचवले जाईल.
 
 
कोरोना महामारी काळात जगाला मदत पोहोचविणार्‍या भारताचे जगभरातून कौतुक झाले. कोरोना लसीबद्दलही जगाला भारताकडून अपेक्षा आहेत. गोर्‍यांच्या देशात मदत पोहोचविणारी ही मूळ भारतीय संस्था देशभरात दररोज १८ लाख भुकल्या जीवांना तृप्त करते. कोरोना महामारी काळात ज्यावेळी ‘लॉकडाऊन’ सुरू झाला, त्यावेळी जिथे-जिथे शक्य होईल, तिथे अन्नदान मोहीम राबविण्यात या संस्थेचा वाटा होता. जगातील सर्वात मोठे ‘चॅरिटी किचन’ बनण्याचा मान या संस्थेला मिळाला आहे.
 
 
 
स्वच्छता, निटनेटकेपणा जपत पोषण आहार पोहोचविणारी ही संस्था आपल्या सात हजार ५०० कर्मचार्‍यांचाही आधार आहे. एकूण ४५ किचनमध्ये तब्बल १५ हजार शाळांमध्ये संस्था दररोज मदत पोहोचविते. लंडनमध्ये कोरोना आणि शाळा बंद असल्याने मुलांना अन्नवाटप प्रक्रिया बंद करावी लागली, तिथे ‘अक्षय पात्र’ ही संस्था मात्र, आजही कोरोनाच्या काळात दुप्पट ताकदीने कामाला लागली आहे. कोरोना महामारीचे आव्हान ओळखून उपाशी असलेल्या प्रत्येक मुलापर्यंत पोषण आहार पोहोचविण्याचे काम या संस्थेमार्फत सुरू आहे.
 
 
निश्चितच यासाठी सरकारी अनुदान आणि इतर वाणिज्यिक कंपन्यांची मदत मिळत आहे. मात्र, कर्मचार्‍यांची सेवा देण्याची तळमळ. भुकेल्या जीवांना दररोज तृप्त करण्यासाठी सुरू असलेली धडपड अखंड सुरू आहे. ही फाऊंडेशन आपल्या नावाप्रमाणेच संपर्ण जगभरातील भुकलेल्यांसाठी आपले ‘अक्षय पात्र’ कायम पुढे करेल हे निश्चित.


 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0