डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असतानाच गुरुवारी पहाटे डोंबिवलीच्या कोपर रोड भागात दोन मजली धोकादायक इमारतीचा भलामोठा भाग कोसळला. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत टिव्ही पाहत असणाऱ्या व्यक्तीमुळे इमारतीतील लोकांचा अगदी थोडक्यात जीव बचावला.
कोपरमधील भागात मुख्य रस्त्याला लागून ही ४२ वर्षे जुनी इमारत आहे. लोडबेअरिंग पद्धतीने बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये साधारण १५ लोक राहतात. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास इमारतीचा सज्जा कोसळला. त्यावेळी इमारतीमधील एक व्यक्ती पहाटेपर्यंत टीव्ही पहात असलेल्या व्यक्तीने त्याचा आवाज ऐकला. आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
तसे इमारतीमध्ये राहणारी लोकं लगेचच बाहेर आली आणि त्यांनी इमारतीच्या बाहेर पळ काढला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली अन्यथा याठिकाणी मोठी जीवितहानी झाली असती. तर रात्रीपासूनच या इमारतीमध्ये माती कोसळण्यास सुरुवात झाली होती. परंतू या लोकांनी महापालिकेला कळवले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. माहिती दरम्यान या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी याठिकाणी दाखल झाले असून इमारतीचा उर्वरित भागही पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.