सदानंद फणसे काळाच्या पडद्याआड

29 Oct 2020 21:47:59

Sadanand Fanse_1 &nb
 
 
कल्याण : दै. ‘मुंबई तरुण भारत’चे माजी संचालक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ सदस्य आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असणारे कल्याणमधील सदानंद त्र्यबंक फणसे यांचे गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी कोरोनामुळे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. फणसे यांच्याविरोधात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यांची कोरोनाविरोधातील झुंज अखेर अपयशी ठरली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर एक कर्तबगार व्यक्तिमत्त्व आपण गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. फणसे यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी लालचौकी येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांना शोक अनावर झाला.
 
 
फणसे हे मूळचे कल्याणचे रहिवासी होते. सुरुवातीच्या काळात ते टिळक चौक येथे वास्तव्यास होते. त्यानंतर ते बेतुरकरपाड्यातील स्वानंद नगर येथे राहण्यास गेले. त्यांचे संपूर्ण कुटुंबच संघ परिवारातील असल्याने त्यांच्यावर लहानपणापासूनच संघाच्या संस्काराचा पगडा होता. संघाचे तृतीय वर्ष शिक्षण त्यांनी नागपूरला जाऊन घेतले होते. फणसे यांचे नाव सदानंद असले तरी ते नंदा या नावाने सर्वत्र सुपरिचित होते. कल्याणमधील संघाच्या शाखेवर शारीरिक शिक्षण प्रमुख होते. त्यानंतर कल्याण शहराचे कार्यवाह होते, अशा विविध पदांवर ते कार्यरत होते. ‘क्रॉम्पटन’ कंपनी येथे ते सिव्हिल इंजिनियर म्हणून कार्यरत होते. ३६ वर्षांच्या सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर काही वर्षे ते व्यवसाय करीत होते.
 
 
यातून आलेले पैसे त्यांनी अनेकांना दान केले. त्यातूनच ‘नमस्कार मंडळा’ला आईच्या नावे दहा लाख रुपये दिले. त्यामुळे तेथील सभागृहाला त्यांच्या आई इंदिरा फणसे हे नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिक्षण मंडळाचे कर्णिक रोडवरील सभागृह आहे, त्याला फणसे सभागृह नामकरण करण्यास सांगून दहा लाख रुपये दिले होते. अनेक संस्थांना त्यांनी आर्थिक मदतीचा हात दिला होता. छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेचे चिटणीस आणि त्यानंतर कार्याध्यक्ष होते. संघाची कार्यालयीन व्यवस्था पाहण्यासाठी जी संस्था काढली, त्या ‘सहजीवन सेवा मंडळा’चे अध्यक्ष होते. कल्याणमधीलही अनेक संस्थामध्ये ते कार्यरत होते.
 
 
छत्रपती शिक्षण मंडळाच्या शाळांच्या चांगल्या इमारती यांचे मोठे श्रेय फणसे यांना जाते. ‘नंदाख्यान’ हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रसिद्ध आहे. आयआरबीचे दत्तात्रेय म्हैसकर यांची बहीण प्रियवंदा यांच्याशी फणसे यांचा विवाह झाला होता. म्हैसकर यांचेही ते काही वर्षे भागीदार होते. रा. स्व. संघात त्यांनी शाखाकार्यवाह, नगरकार्यवाह, जिल्हा बौद्धिक प्रमुख आदी जबाबदारी पार पडल्या आहेत. तळजाई शिबीर, शबरी कुंभ यांच्या उभारणीत त्यांनी भाग घेतला होता. ते चांगले गीतगायकही होते. फणसे यांच्या दोन्ही ज्येष्ठ बंधूचे गेल्या दीड महिन्यात निधन झाले. त्यानंतर सदानंद यांचे निधन झाल्याने हा फणसे कुटुंबाला बसलेला मोठा धक्का आहे.
 
 
सामाजिक शैक्षणिक संस्थांचे नुकसान
 
 
सदानंद फणसे यांच्या जाण्याने अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे नुकसान झाले आहे. अनेक संस्थांसाठी ते एक मार्गदर्शक होते, त्या मार्गदर्शनाला अनेक संस्था आज मुकल्या आहेत. मी, बालस्वयंसेवक असताना मला फणसे शिक्षक होते. त्यांनी आमच्यावर जे संस्कार केले, त्यातून आम्ही घडलो. फणसे हे मनमिळावू होते.
 
 
- मोहन आघारकर, संचालक, कल्याण जनता सहकारी बँक
 
 
 
 
समर्पित स्वयंसेवकाला आपण मुकलो
 
 
सदानंद फणसे, यांच्या निधनाची बातमी अनपेक्षित आणि दुःखदायक घटना आहे. नंदाजी रुग्णालयात असताना त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. पण, दुर्दैवाने संपर्क झाला नाही. नंदाजी रुग्णालयातून घरी आल्यावर त्यांच्याशी निवांतपणे बोलू, असा विचार करून पुन्हा संपर्क केला नाही. ‘इतिहास संकलन समिती’चे अध्यक्ष म्हणून, संघाचे स्वयंसेवक म्हणून, इतर संस्थात्मक पातळीवर एक खंबीर आणि मार्गदर्शक कार्यकर्ता म्हणून नंदाजींचे सहकार्य नेहमीच मिळाले. त्यांच्या जाण्याने संघ परिवारातील एका ज्येष्ठ आणि समर्पित स्वयंसेवकाला आपण मुकलो आहोत.
 
 
- डॉ. विवेक मोडक, संघचालक, कल्याण जिल्हा
 
 
 
 
संघजीवनातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व
 
 
सदानंद फणसे हे कल्याणच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघजीवनातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. कल्याणच्या आधुनिक इतिहासात त्यांचे योगदान ठसठशीत समोर आहे. अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेशी त्यांचे नाते होते. त्या उभारणीत त्यांचा मोठा हात होता. छत्रपती शिक्षण मंडळ ही संस्था आज विकसित स्वरूपात आहे, त्यात फणसे यांचे परिश्रम होते. १९४८च्या महात्मा गांधीजींच्या हत्येच्या खोट्या आरोपातून संघ तावून आमच्या पिढीपर्यंत विजिगिषू वृत्तीने आणून उभा केला. त्या पिढीचे प्रतिनिधी म्हणजे, सदानंद फणसे होते. सर्वच राजकीय विचारधारा यांना एकत्र घेऊन त्यांनी काम केले. ‘आमचे काम कोणाच्याच विरोधात नाही,’ हे डॉक्टरजींचे वाक्य ते जगले. वेगवेगळ्या संस्थांना त्यांनी आर्थिक मदत केली. ‘इतिहास भारती’चे काम उभे करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. ‘संस्कार भारती’साठीही त्यांनी निधी उभा करून दिला. समाजातील विविध स्तरात संबंध असल्याने ते एक आदर्श होते, असा आदर्श उभा करणे हीच सदानंद फणसे यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
 
- चंद्रकांत जोशी, कोकण प्रांत सहसचिव, इतिहास संकलन समिती
 
 
 
 
कल्याण शहराचे मोठे नुकसान
 
 
सदानंद फणसे हे एक सामाजिक कार्यकर्ता, उत्कृष्ट वक्ता आणि चांगले लेखक होते. प्रत्येकाला मदत करणे हाच त्यांचा स्वभाव होता. ते एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या ६० व्या वाढदिवसाला त्यांनी ६० संस्थांना मदत केली. आपण कमविलेला पैसा समाजाचा आहे, यांचा विचार करून त्यांनी अनेक संस्थांना आर्थिक मदत केली आहे. फणसे यांच्या जाण्याने कल्याण शहराचे मोठे नुकसान झाले आहे.
 
 
- प्रवीण देशमुख, ज्येष्ठ स्वयंसेवक
 
 
 
 
एक जुने जाणते व्यक्तिमत्त्व गमावले
 
 
सदानंद फणसे हे कल्याणमधील एक जुने जाणते व्यक्तिमत्त्व होते. ते एक संघाचे कट्टर कार्यकर्ते होते. सर्व लोकांशी ते अत्यंत मनमिळाऊपणे वागत असत. त्यांना इतिहासाची आवड होती. मी, चिंतामण वैद्य उर्फ भारताचार्य वैद्य यांच्यावर पीएच.डी. करीत असताना, ग्वाल्हेर येथे काही कागदपत्रे घेण्यासाठी जायचे होते. यावेळी नंदाजींनी, “माझा भाऊ ग्वाल्हेरला महापौर आहे,” असे सांगून त्यांना मदत करण्यास सांगितले. त्यांच्या भावानेही मला मदत केली. आता माझी पीएच.डी.चे काम पूर्ण होत आले आहे. या कामाविषयी नंदाजींना सांगायला जाणार होतो, त्याआधीच ही दुःखद बातमी समजली.
 
 
- जितेंद्र भामरे, शाखाध्यक्ष, कोकण इतिहास परिषद, कल्याण
 
 
 
Powered By Sangraha 9.0