मराठा क्रांती मोर्चाचे सोमवारी मुंबईत आक्रोश आंदोलन

24 Oct 2020 20:25:11

maratha kranti morcha_1&n



मुंबई :
मराठा क्रांती मोर्चातर्फे सोमवारी (२६ ऑक्टोबर) वांद्रे येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले स्वतः उपस्थित राहणार आहेत.


मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे वीरेंद्र पवार, विनोद साबळे, सुनील पाटील यावेळी उपस्थित होते. मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्यानंतर मागील दीड महिन्यात सरकारतर्फे कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे मराठा समाज शैक्षणिक व नोकरीतील संधीपासून वंचित राहिला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने सुरुवातीला १२ हजारांची पोलीस भरती जाहीर केली, शिवाय आता नऊ हजार जागांसाठी ऊर्जा खात्यात नवीन भरती जाहीर केली आहे. मात्र आरक्षण नसल्याने मराठा समाजाला या भरतीत स्थान मिळणार नाही. शासनाने एकूण २२ हजार लोकांची जाहीर केलेली नोकरभरती स्थगित करावी व जोपर्यंत मराठा समाज आरक्षणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारची नोकरभरती राज्य सरकारने करू नये, अशी मागणी वीरेंद्र पवार यांनी केली. मराठा आरक्षणासंदर्भात २७ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या पुनर्विचार याचिकेबाबत काय तयारी करण्यात आली आहे याबाबतही माहिती देण्यात येत नाही, असे वीरेंद्र पवार म्हणाले.


पुनर्विचार याचिकेत सरकारने मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडून तो निर्णय मराठा समाजाच्या बाजूने लागणे आवश्यक आहे. अन्यथा मराठा समाजासाठी संपूर्ण पर्यायी व्यवस्था राज्य सरकारने करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.मराठा समाज आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर १८ ठिकाणी ठिय्या आंदोलने करण्यात आली. मात्र ती सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून करण्यात आली. आक्रोश आंदोलनही सोशल डिस्टनसिंगचे नियम पळून करण्यात येईल. मात्र त्यानंतर होणारे आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल. यापूर्वी राज्याने ५५ हजारांची बाईक रॅली अनुभवली आहे. मुंबईत झालेला अफाट मोर्चाही लोकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात योग्य निर्णय न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल असा इशारा वीरेंद्र पवार यांनी दिला.
Powered By Sangraha 9.0