तिरंगा हाती घेण्यास मेहबुबा मुफ्तींचा नकार नकार

23 Oct 2020 19:40:34

MM_1  H x W: 0

तिरंगा हाती घेण्यास मेहबुबा मुफ्तींचा नकार नकार

फुटीरतावादाचा कंडा अद्यापही शमेना



नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : जोपर्यंत जम्मू – काश्मीरचा स्वतंत्र ध्वज फडकविण्याची परवानगी दिली जात नाही, तोपर्यंत मी तिरंगा हाती घेणार नाही. केवळ जम्मू – काश्मीरचाच ध्वज आम्ही तोपर्यंत मानणार, अशी उद्दाम भूमिका जम्मू – काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी घेतली आहे. त्यामुळे फुटीरतावादाचा त्यांचा कंड अद्यापही शमला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

कलम ३७० आणि ३५ अ संपुष्टात आणल्यानंतर केंद्र सरकारने मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवले होते. नुकतीच १४ महिन्यांनंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. सुटका झाल्यानंतर त्यांनी पीडीपीची पुढील राजकीय भूमिका मांडण्यासाठी त्यांनी शुक्रवारी श्रीनगर येथे एका पत्रकारपरिषदेचे आयोजन केले होते.

यावेळी मुफ्ती यांनी आपल्यासमोर कलम ३७० लागू असतानाचा काश्मीरचा स्वतंत्र ध्वज ठेवला होता. काश्मीरच्या ध्वजाकडे अंगुलनिर्देश करीत त्या म्हणाल्या, माझा हाच ध्वज आहे. हा ध्वज परत आल्यावरच आम्ही आम्ही तो ध्वज (राष्ट्रध्वज तिरंगा) हाती घेणार आहोत. जोपर्यंत आमचा स्वत:चा ध्वज परत येत नाही, तोपर्यंत अन्य कोणताही ध्वज आम्ही घेणार नाही. त्या ध्वजासोबतचे (तिरंगा) आमचे नाते या ध्वजामुळेच (काश्मीरचा ध्वज) आहे”, अशी भूमिका मेहबुबा मुफ्ती यांनी मांडली.
 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा वारसा पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पक्षाला आहे, मात्र पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवल्याचा आता पश्चाताप होत असल्याचे मुफ्ती यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, जम्मू – काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा मिळवून देण्यापुरताच आमचा लढा नाही, काश्मीर प्रश्नाचा कायमचा तोडगा काढणे हे आमचे लक्ष्य आहे. काश्मीरला विशेष दर्जा पुन्हा प्राप्त होत नाही, आमचे संविधान आणि आमचा ध्वज परत मिळत नाही; तोपर्यंत निवडणुक लढविण्यास पीडीपीला रस नाही. कलम ३७० आणि ३५ अ पुन्हा स्थापित करणे ही केवळ राजकीय पक्षाची लढाई नसून ती काश्मिरी जनतेची लढाई असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

 

ही तर राष्ट्रविरोधी भूमिका- अशोक कौल, संघटन मंत्री, भाजपा

 

मेहबुबा मुफ्ती यांची राष्ट्रविरोधी भूमिका घेण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीदेखील त्यांनी जम्मू – काश्मिरमध्ये तिरंगा हाती घेणारा एकही व्यक्ती मिळणार नाही, अशा वल्गना केल्या होत्या. मात्र, भारतीय राज्यघटनेची शपथ घेऊन राज्याचे मुख्यमंत्रीपद, खासदारकी भूषविलेल्या व्यक्तींनी अशी देशविरोधी भूमिका घेणे, यातच त्यांचे खरे मनसुबे लक्षात येतात. मात्र, काश्मीरची जनता आता अशा लोकांना महत्व देत नाही, अशी प्रतिक्रिया जम्मू – काश्मीर प्रदेश भाजपाचे संघटनमंत्री अशोक कौल यांनी ‘दैनिक मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली.

 
 
 
Powered By Sangraha 9.0