'निसर्गाने तर अन्याय केलाच,आता सरकारही सूड घेतंय'

23 Oct 2020 17:06:04

devendra fadnavis_1 


मुंबई :
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे", अशी टीका विधानसभा विरोधीपक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.


दरम्यान, अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली. दिवाळीपर्यंत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यावरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.

ते म्हणतात,"नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहतेय्. पण, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्‍यांना अजीबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा केली, फसवणूक केली. किमान शेतकर्‍यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकर्‍यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच, आता सरकारही सूड घेत आहे", अशा कठोर शब्दांत फडणवीस यांनी टीका केली.
Powered By Sangraha 9.0