मुंबईतील सेन्ट्रल मॉलमध्ये अग्नितांडव

23 Oct 2020 10:38:09

Mumbai Central Mall_1&nbs
 
 
मुंबई : गुरुवारी रात्री मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलमध्ये आग लागली. तब्बल १२ तासांनंतरही या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही आग आता लेव्हल ५ला पोहचली असून आग आटोक्यात यावी म्हणून तब्बल २४ फायर इंजिन आणि १७ जम्बो टँकर दाखल झाले आहेत. गेल्या १२ तासांपासून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
 
 
मुंबई सेंट्रल बस स्थानकाजवळ असलेल्या सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजून ५३ मिनिटांनी आग लागली होती. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सिटी सेंटर मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव्ह या ५५ मजली इमारतीमधील जवळपास ३५०० रहिवाशांचे सुरक्षिततेची आवश्यकता लक्षात घेऊन जवळच असलेल्या मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आलं आहे.
 
 
महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे २५० जवान घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोन जवान जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी दोन्ही कर्मचाऱ्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून रवींद्र प्रभाकर चौगुले आणि शामराव बंजारा अशी दोघांची नावे आहेत.आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0