अभाविपचे 'जाब विचारो' आंदोलन राज्यभर निर्दशने

23 Oct 2020 16:25:38

abvp_1  H x W:
 

मुंबई : कोरोना महामारीने संपूर्ण जगभरामध्ये थैमान घातलेले आहे व यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच क्षेत्रातील व्यवहार बंद झालेले आहेत परिणामी अनेकांच्या आर्थिक उत्पन्नाची साधने बंद झाली आहेत. यामुळे अनेक आर्थिक व मानसिक समस्यांना विद्यार्थी व पालक वर्ग सामोरे जात आहे.
 
 
पालक वर्गाला त्यांच्या पाल्यांच्या भविष्याची चिंता मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. अशी सर्व परिस्थिती असताना, इयत्ता अकरावी, व पदवीचे प्रथम वर्ष ते अभियांत्रिकीचे थेट द्वितीय वर्षांच्या प्रवेश प्रक्रिया गेल्या सप्टेंबर महिन्यापासून रखडलेल्या आहेत. आधीच कोविड व पावसाने घातलेले थैमान यामुळे राज्यातील जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. प्रवेश प्रक्रिया लांबल्याने विद्यार्थी व पालवर्गामध्ये प्रचंड तणाव असून त्यांच्यात रोषाचे वातावरण आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अकरावीचे ऑनलाईन प्रवेश सुरु करण्याच्या मागणी घेवून अभाविपने शुक्रवारी मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर मुंबई अभाविपने जाब विचारो आंदोलन केले.
 
 
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण बाबत प्रवेश प्रक्रिया स्थगितीची सुनावणी होवून एक महिना उलटून गेला असला तरी राज्य सरकार यातून तोडगा काढण्यात पूर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी सरकारवर केला आहे. राज्य सरकारला विद्यार्थी ऐवजी मीडिया चॅनेलची टीआरपी कमी जास्त करण्यात रस असल्याचे ओव्हाळ यांनी सांगितले. “सरकार सर्व घटकाना सामावून घेत प्रवेश प्रक्रिया का राबवत नाही, ही सरकारची उदासीनता आहे. याचाच जाब विचारण्यासाठी आज अभाविपने संपूर्ण राज्यात प्रवेश सुरु करण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे." सरकारने पुढील आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरु नाही केली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ओव्हाळ यांनी शुक्रवारी दिला. “राज्यातील विद्यार्थी हित जपता, राज्यातील सर्व प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी यासाठी आम्ही आंदोलन केले त्याबाबत पुढील दिवसात ठोस पावले सरकारने टाकावित” असे मत मुंबई महानगर सहमंत्री विठ्ठल परब यांनी व्यक्त केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0