आधीच उल्हास त्यात कांदे महाग !

22 Oct 2020 19:46:30

onion_1  H x W:

डोंबिवली :
लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद होते. आत्ता अनलॉकमध्ये हॉटेल सुरु झाली. कुठे तरी आनंद हॉटेल व्यवसायिकांना झाला होता. मात्र आत्ता कांदा महागल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा कोमजला आहे. 'आधीच उल्हास त्यात कांदे मास' अशी परिस्थिती कांदे महागल्याने निर्माण झाली आहे.


कोणत्याही पदार्थाची चव रूचकर होण्यासाठी कांदा हा महत्त्वाचा घटक आहे. एकीकडे कोरोनामुळे अनेकांनी आपला रोजगार गमाविला आहे. तर दुसरीकडे भाज्या आणि कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे केवळ सामान्य माणूसच नव्हे तर हॉटेल व्यवसायिक ही चिंतातूर झाला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय मार्च महिन्यापासून बंद होता. त्यानंतर पार्सल सेवा सुरू करण्यात आली होती. कोरोनामुळे ग्राहकांनी मात्र पार्सल सेवाला फारसा प्रतिसाद दिला नाही. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत अनलॉक पाच मध्ये हॉटेल उघडण्यास परवानगी दिली आहे.


सुरूवातीला हॉटेलची वेळ सायंकाळी सात वाजेर्पयत असल्याने डोंबिवली हॉटेल ओनर्स असोसिएशनने ही वेळ वाढविण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. हॉटेल व्यवसायाला वेळ वाढवून दिली असली तरी कांदा आणि भाज्याचे वाढलेले दर यामुळे कसा मेळ घालवा असा प्रश्न हॉटेल चालकांना पडला आहे. मेन्यूचे भाव वाढविल्यास ग्राहक येणार नाहीत. कोणताही पदार्थ हा कांदयाशिवाय होऊच शकत नाही यामुळे हॉटेल व्यवसायिकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हॉटेल उघडली असली तरी ग्राहक मोठया प्रमाणावर नाही. गेले सहा महिने व्यवसायातून उत्पन्न नाही. आता महागाईची फोडणी या व्यवसायाला बसली आहे असे डोंबिवली हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित शेट्टी यांनी सांगितले
Powered By Sangraha 9.0