महिला प्रवाशांना ‘लोकल’साठी हिरवा कंदिल

20 Oct 2020 17:24:05
Local_1  H x W:
 




नवी दिल्ली :
लॉकडाऊनमध्ये बंद झालेल्या लोकल प्रवासाबद्दल काहीशी सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महिला प्रवाशांसाठी लोकल प्रवास खुला करण्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी केली आहे. उद्यापासून दि. २१ ऑक्टोबर २०२० पासून सर्व महिला प्रवाशांना सकाळी ११ ते दुपारी तीन दरम्यान व सायंकाळी सात वाजल्यानंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे गोयल म्हणाले. “रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत.”, असेही ते म्हणाले.
 


 
 
सोशल डिस्टंसिंगचे पालन आणि कोविड संदर्भातील अन्य खबरदारी घेऊन मुंबई लोकल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यासाठी घटस्थापनेचा मुहूर्त ठरवण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारतर्फे पूर्वसूचना न मिळाल्यामुळे हा निर्णय प्रलंबित होता. मात्र, अखेर या संदर्भातील पत्र रेल्वे मंत्रालयाकडे पोहोचल्यानंतर पीयुष गोयल यांनी लोकल प्रवासाला हिरवा कंदिल दर्शवला आहे. लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी बंद झाल्याने लॉकडाऊनमध्ये नोकरदार वर्गाचे हाल झाले. कल्याण-डोंबिवली, वसई विरार, पनवेल, नवी मुंबई या भागांतून मुंबई शहराकडे कामानिमित्त येणाऱ्या महिलांचा मोठा वर्ग आहे. बेस्ट, एसटी आणि अन्य पालिका बसच्या सोयींचा तुटवडा जाणवत असल्याने अनेकांची गैरसोय होत होती. त्यात रिक्षा व टॅक्सी चालकांतर्फेही लूट सुरू होती, त्याला पर्याय म्हणून लोकल सुरू झाल्याने महिलांसाठी काहीसा दिलासा मिळाला आहे.
Powered By Sangraha 9.0