राहुल-प्रियांका गांधींसह २०० जणांवर एफआयआर दाखल

02 Oct 2020 17:14:51

congress rahul  gandhi_1&



नवी दिल्ली :
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांना गुरुवारी यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवलं. त्यानंतर हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले. मात्र त्याचवेळी धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आणि राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी अटक केली. पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल २०० जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गौतमबुद्ध नगर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केली आहे.राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह यमुना एक्स्प्रेस वे वर पायी चालण्यास सुरवात केली. यामुळे एक्सप्रेस वे दोन्ही बाजूंनी जाम झाला होता. 



कलम १४४चे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि कोरोनाच्या संकट काळात सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांविरोधात कलम १८८, २६९, २७०अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी काँग्रेसच्या नेत्यांना हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले होते. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी - वाड्रा गुरूवारी सकाळी दिल्ली येथून हाथरस येथे बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, त्यांचा ताफा ग्रेटर नोएडा येथे यमुना एक्सप्रेस-वे येथे उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवला. त्यानंतर घटनास्थळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी ताफा अडविल्यानंतर राहुल आणि प्रियांका गांधी - वाड्रा यांनी हाथरस येथे पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, राहुल गांधी यांना नोएडा पोलिसांनी अटक केली. राहुल गांधी यांनी महामारी कायद्याचे उल्लंघन केले असून त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना पुढे जाऊ देणे शक्य नाही, असे पोलिसांनी सांगितले. यावेळी राहुल गांधी यांनी आपणास पोलिसांनी लाठी मारून धक्काबुक्की करून खाली पाडल्याचाही आरोप केला. महामारी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अटक करावी लागल्याचे नोएडा पोलिसांनी सांगितले. राहुल गांधी यांना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दिल्ली येथे रवाना करण्यात आले. त्यानंतर काँग्रेसने संपूर्ण देशभरात आक्रमक पावित्रा घेत ठिकठिकाणी आंदोलन केले.
Powered By Sangraha 9.0