राहुल गांधींना पोलिसांनी ढकलले की तेच पडले?; भाजपचा सवाल

02 Oct 2020 14:54:33

rahul gandhi _1 &nbs



औरंगाबाद :
हाथरस येथील बलात्कार पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.यामुळे काँग्रेसने उत्तर प्रदेश व केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवत आंदोलनाची हाक दिली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र या संदर्भात काहीशी वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरेकर यांनी खरंच राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशपोलिसांनी धक्काबुक्की केली की ते स्वतःच पडले असा सवाल उपस्थित केला.

औरंगाबाद येथे ते पत्रकारांशी बोलत होते. राहुल गांधी यांच्यासोबत खरोखरच काही चुकीचे वर्तन झाले असेल तर प्रशासन त्याची नक्कीच गंभीर दखल घेईल. कुठल्याही नेत्याला अशाप्रकारे धक्काबुक्की होणं योग्य नाही. पण तसं काही झालं आहे असं मला वाटत नाही. राहुल गांधी यांना नेमकं ढकलून दिलंय की ते पडलेत हा विषय संशोधनाचा आहे. तो तपासला जाईल,' असे दरेकर म्हणाले. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अनेकदा आमच्यावरही अशा प्रकारची कारवाई करतात. सायन हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलनाला बसल्यानंतर माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यासह आमच्या आमदारांवर गुन्हे दाखल झाले. पोलिसांना कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची वाटली, आम्हाला लोकांचा प्रश्न महत्त्वाचा वाटला. असं होत असतं. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे नेते असलेल्या राहुल गांधी यांना पोलीस ढकलून देतील असं मला वाटत नाही. इतके पोलीस संवेदनाहीन नाहीत. मग ते कुठलेही असोत,' असेही दरेकर पुढे म्हणाले.


'हाथरसची घटना दुर्दैवीच आहे. आम्हीही या घटनेचा निषेध केलाय. मात्र, विरोधक यात राजकारण करत आहेत. पुण्यात एका तरुणीला ठेचून डोंगरात टाकून दिलं. रोह्याला १४ ते १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिला दरीत ढकलून दिलं. पनवेलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार झाला. नुकताच एका डॉक्टरनं क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग केला. यातल्या कुठल्या घटनेची जबाबदारी स्वीकारून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला?,' असा प्रश्नही त्यांनी केला.'आपल्या पायाखाली काय जळतंय बघा. महाराष्ट्रात रोज काही ना काही होतंय. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय. राजीनामेच मागायचे झाले तर तुमचे रोज राजीनामे मागावे लागतील. हाथरसच्या विषयावर राजकारण करण्याची संधी यांना मिळालीय. ती त्यांनी साधली आहे आणि आम्हाला सांगतात राजकारण करू नका. हाथरसच्या घटनेवर बोलणारे संजय राऊत महाराष्ट्रातील घटनांवर का बोलले नाहीत? गृहमंत्र्यांनी एखाद्या ठिकाणी भेट दिली नाही?,' अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली.हाथरसच्या घटनेवरून योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांचाही त्यांनी समाचार घेतला.
Powered By Sangraha 9.0