पवार बांधावर : मुख्यमंत्र्यांना तत्काळ मदतीच्या सूचना

19 Oct 2020 17:21:11
Sharad Pawar _1 &nbs



केंद्राकडून मदत मिळवण्याशिवाय पर्याय नाही : पवार

तुळजापूर : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तुळजापूर जवळील काकरअंबावाडी या गावातील शेतकऱ्यांशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संवाद साधला. त्यांच्या नुकसानाचा आढावा घेत मदत करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले आहे. "या परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल. एकंदर नुकसानीचे स्वरूप पाहिले तर या सर्व परिस्थितीला एकटे राज्य सरकार तोंड देऊ शकणार नाही. याठिकाणी केंद्राकडून मदत मिळाली पाहिजे. आपण आपल्या लोकप्रतिनिधींना घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या संबंधित प्रतिनिधींशी बोलू.", असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
 
 
 
केंद्राकडे मदत मागणार
 
राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट घेणार असल्याचे समजते. पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. ते म्हणाले, "जमीन खरवडून गेली. त्यामुळे या नुकसानाचे स्वरूप हे नेहमीपेक्षा मोठे आहे. याशिवाय काही ठिकाणी कुणाच्या विहिरी होत्या, कुणाच्या पाईपलाइन होत्या, कुणी ठिबक सिंचन व्यवस्था केली होती. अन्य काही साधनं होती, तीदेखील वाहून गेली आहे"
 
 
 
मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार
 
पवार यांनी तुळजापूर परिसरातील काक्रंबावाडी, लोहारातील सास्तुर, राजेगांव, उमरग्यातील कवठा, औसा तालुक्यातील उजनी, उस्मानाबादमधील पाटोदा, करजखेडा या गावांना भेटी दिल्या. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचा आढावा घेत गावकऱ्यांशी संवाद साधला. आम्हाला तातडीने मदत करा, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी सरकारकडे केली आहे. स्वतः पवार यांनी आपण मुख्यमंत्र्यांशी याबद्दल सविस्तर बोलणार असल्याचे म्हटले आहे.
 
 
 
 
राज्याच्या तिजोरीवर भार : कर्जाशिवाय पर्याय नाही
 
"कधी नव्हlते तितके मोठे आर्थिक संकट सध्या राज्य सरकारवर आहे. आपल्याला कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही. ते कर्ज आपण काढतो आहोत. महाराष्ट्र सरकारने या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ आली तर ते कर्ज घ्यावे असं मी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार आहे.", असे पवार म्हणाले.
 
 
 
उभं पिक आडवं झालं जनावरे वाहून गेली
 
काहींची जनावरे वाहून गेली आहेत. घरंदारेही कोसळली आहेत. गावपातळीवर रस्ते सगळे उद्धवस्त झाले आहेत. या संकटात केंद्र सरकारने मदत करण्याची पद्धत आहे, असे पवार म्हणाले.
 
 
 
 
रस्ते दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करा : पवार 
काही ठिकाणी रस्तेच वाहून गेले आहेत. राज्यातील रस्ते दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घ्यावे लागणार असल्याच्या सूचना पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. पाटबंधारे विभागाच्या कालव्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा नियोजन मंडळाचा निधी पुरेसा ठरणार नसून होणार नाही. या संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी स्वतंत्र निर्णय राज्य व केंद्र सरकारला घ्यावा लागेल, अशी मागणीही त्यांनी केली आहे.







Powered By Sangraha 9.0