आवरा बावर्‍या मनाला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2020
Total Views |

arogya_1  H x W


हितकारक गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यात जमवायच्या म्हटल्या तर आपल्याला मुळात इच्छा असावी लागते. स्वहिताच्या दृष्टीने परिश्रम करायची प्रेरणा असायला लागते. शिस्तबद्धता असायला लागते. आरोग्याच्या दृष्टीने पोषक अशा सवयी लावायच्या असतील तर चंचल मनावर आवर घालायला लागतो, तरच शिस्तबद्धता येईल.


असे अनेक दिवस असतात जेव्हा आपल्या मनात असतं की, एखादी अमुक अमुक गोष्ट आपण करायची नाही. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती मधुमेहाची रुग्ण आहे. तिला माहीत आहे की, डाएट व्यवस्थित सांभाळायचे आहे. मागचे काही महिने ‘शुगर’ थोडी जास्तच प्रमाणात दिसत होती. डॉक्टरांचा सततचा सल्ला होता की, डाएट सांभाळा. पण, आता इतर मित्रमंडळीमध्ये उभे आहोत. पार्टीचा मूड आहे. समोर चॉकलेट आईस्क्रीम आहे. नको नको असे म्हणताना नजर सतत त्या आईस्क्रीमकडे जात राहते. अथक प्रयत्नाने ती व्यक्ती तिची नजर दुसरीकडे वळवत राहते. हा नजरेचा खेळ काही वेळ चालू राहतो. पण, मनातून एक जबरदस्त ऊर्मी येते. मनात सारखे तेच उचंबळत राहते. मनच सक्ती करते. मग आपोआप आपण आईस्क्रीमच्या दिशेने भारल्यासारखे चालत जातो. आपला हात सहज तो आईस्क्रीमचा कप उचलतो.


आपण ते आईस्क्रीम भारावलेल्या स्थितीत फस्त करुन टाकतो. मनात आनंदाची झुळूक येते व जातेसुद्धा आणि अचानक खूप अपराधी वाटायला लागतं. पराभूत वाटायला लागतं. मनात रुखरुख राहते. एखादा तरुणसुद्धा असाच भारवलेल्या कृतीच्या साखळीतून जाताना दिसतो. एका कुठल्यातरी गोंधळलेल्या क्षणी त्याचा स्वत:वरचा ‘कंट्रोल’ गेलेला असतो. तो त्याच्या खिशात हात घालतो. एक पॅकेट बाहेर काढतो. ते उघडतो व त्यातून सिगारेट बाहेर काढतो. दुसर्‍या हाताने लाईटर बाहेर काढतो आणि ती सिगारेट शिलगावतो. त्याला या सगळ्या कृतीच्या साखळीतून जाताना सिगारेट शिलगावेपर्यंत धुराचा तो लोट सोडेपर्यंत कळतही नाही, ‘अरे आपण खरंतर हे करणारच नव्हतो.’ सकाळी सकाळी उठून आपण जॉगिंगला जायचे ठरवले आहे. घड्याळाची रिंगटोन कानातून डोक्यात शिरते. ‘एवढ्या लवकर नको’ म्हणून डोळे उघडत नाहीत. डोळे जेव्हा उघडतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. ऑफिसला जायची तयारी करायची असते. ‘किती लवकर’चा ‘किती उशीर’ होतो आणि पुन्हा आता ‘उद्या’ची वाट पाहायला लागते. वेळ आपल्यासाठी कधी थांबत नाही .


नक्की काय चाललं आहे? आपल्याला आवडणार्‍या आणि फायद्याच्या असणार्‍या गोष्टी आपण का करु शकत नाही? त्या आपल्याला इतक्या कठीण का वाटतात? नेमक्या या गोष्टी इतर लोक मात्र, नियमितपणे करतात, सहज करतात. इतर लोकांना कसं जमतं? आपल्यालाच कसं काय जमत नाही? त्या लोकांकडे जास्त आत्मविश्वास आहे का? ते आपल्यापेक्षा भावनिकदृष्ट्या जास्त लवचिक आहेत का? देवाने त्यांना चांगलं आरोग्य दिलं आहे का? त्यांचे आयुष्य जास्त सुखकर आहे का? त्यांच्या आयुष्यात तणाव कमी आहे का? काही कळत नाही. खरंच नक्की काय चाललं आहे? दुसर्‍यांना सगळं कसं जमतं करायला? कारण, हे लोकं आपल्यापेेक्षा वेगळे आहेत. त्यांच्यासाठी त्यांचे अवतीभोवतीचे वातावरण पोषक आहे. हे सगळं म्हणायला ठीक आहे. काही माणसं दुसर्‍यांना असंही सांगतात की, “अरे तुझं ठीक आहे. तुला ते करायला नक्कीच जमेल.” कारण, कठीण गोष्टी आपल्यासाठीच असतात. दुसर्‍यासाठी एकंदरीत सगळेच सोपे असते, असे प्रत्येकाला वाटते. बहुधा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने योग्य गोष्टी करायच्या म्हटल्या तर आपल्याला अनेक अडथळे दिसायला लागतात. याचं गोष्टी दुसरे लोक करतात. तेव्हा त्या अधिक सुकर वाटायला लागतात.


या हितकारक गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यात जमवायच्या म्हटल्या तर आपल्याला मुळात इच्छा असावी लागते. स्वहिताच्या दृष्टीने परिश्रम करायची प्रेरणा असायला लागते. शिस्तबद्धता असायला लागते. आरोग्याच्या दृष्टीने पोषक अशा सवयी लावायच्या असतील तर चंचल मनावर आवर घालायला लागतो, तरच शिस्तबद्धता येईल. कुठलीही व्यक्ती एक-दोन दिवसात लठ्ठ होत नाही. गेले कित्येक वर्षे रोज जेवणातून थोडं थोडं जास्त खात जाते व त्यासाठी आवश्यक असलेल्या व्यायामही करत नाही. नंतर हा लठ्ठपणा शरीरापेक्षा मनाचा आजार बनतो. कारण, आता वजन कमी करण्यासाठी मनावर काबू मिळवायला लागतो. आयुष्यात काही गोष्टी, सवयी आपण कधी कधी विचार न करता करत राहतो. या सगळ्या गोष्टी करायला आपण स्वतंत्र आहोत खरे, पण या सगळ्याचा जो परिणाम आपल्यावर होईल, तो मात्र आपल्याला भोगायलाच लागेल. तो नाकारायचे स्वातंत्र्य आपल्याला कोणी दिलेले नाही.

- शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@