आयुर्वेदिक ज्यूसेस - अन्न हे पूर्णब्रह्म! (भाग-१२)

19 Oct 2020 22:21:49

juices_1  H x W


‘ऑक्टोबर हिट’ची उष्णता जाणवू लागली की, थंड पाणी, शीतपेये, आईस्क्रीम यांच्यावर अधिक लक्ष जाते, खाल्ले-प्यायले जाते. पण, सध्याच्या कोविडच्या काळात गरम पाण्याचा वापर करताना वरील पदार्थ घेणे अवघड झाले आहे. अशा वेळेस कही रुचकर आणि त्याबरोबरच आरोग्यदायी पर्याय, जे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहेत, त्याबद्दल आज जाणून घेऊयात.



आयुर्वेदात विविध पाककृतींचा केवळ उल्लेख नाही, तर त्याची कृती, उपयोगिता, पथ्यामध्ये उपयोग आणि कोणी खाऊ नये, असे सर्व सविस्तर सांगितले आहे. आज काही आरोग्याकर शीतपेयांच्या प्रकारांची माहिती घेऊया. यामध्ये ‘मंथ’ या पद्धतीने तयार केलेल्या पेयाचा समावेश केला आहे. मंथ म्हणजे जो पदार्थ, पेय मंथन करुन (घुसळून) तयार केला जातो, त्याला ‘मंथ’ म्हणतात. ‘मंथ’ पद्धतीच्या पेयांमध्ये रवीने घुसळण्याची प्रक्रिया केली जाते. सामान्य कृती-मंथ निर्माण विधी : यामध्ये ज्या आहारिय/औषधी द्रव्यांपासून मंथ बनविले जाणार आहे, त्याची भरड/पेस्ट १ भाग आणि थंड पाणी ४ भाग घ्यावे. हे एकत्र करुन मातीच्या भांड्यात झाकून ठेवावे. एका तासाने हे द्रव-द्रव्य रवीने घुसळावे व प्यावे. काही वेळेस भरड विरघळत नाही, अशा वेळेस ते गाळून घ्यावे. मंथमधील विविध पाककृतींमध्ये प्रामुख्याने गोड-आंबट चवीचे पेय तयार केले जाते, जे खूप पातळही नसते आणि खूप घट्टही नसते. अशा काही रुचकर ‘मंथ’ कल्पनेतील पाककृती आज जाणून घेऊयात.


(१) खर्जुरादि मंथ :

घटक द्रव्य : खजूर, द्राक्षे, आमसूल, चिंच, डाळिंब, फालसा, आवळा

ही द्रव्ये स्वच्छ धुवून घ्यावीत. खजुराचे तुकडे करावेत. बी काढून टाकावी. आवळ्याचेही तुकडे करुन बी काढावी. चिंचेतील बिया, टरफले काढून स्वच्छ धुवून घ्यावीत. सर्व घटक द्रव्ये समप्रमाणात घ्यावीत. (प्रत्येकी १०-१० ग्रॅ.) त्याचे छोटे तुकडे करुन चार पट पाण्यात (म्हणजे २८० ग्रॅ.) भिजवावे. हे एक-दोन तास बंंद पातेल्यात भिजू द्यावे. त्यानंंतर, झाकण काढून कुस्करावे, एकजीव करावे. त्यातील रेषा किंवा गुठळ्या राहिल्यास त्या काढून टाकाव्यात. चवीपुरते साखर व मीठ घालावे. खजूर स्वाभाविकतः गोड असल्याने सहसा साखर लागत नाही. ‘हेल्थ कॉन्शस’ असल्यास साखरेऐवजी खडीसाखर किंवा गूळ, गरज पडल्यास घालावा. मीठाऐवजी सैंधव वापरावे. रवीने चांगले घुसळावे व प्यायला द्यावे.हे पेय ‘इन्स्टंट एनर्जी ड्रिंक’ म्हणून प्यावे. खूप थकल्यावर, व्यायामानंतर गळून गेल्यासारखे झाल्यावर खूप तहान लागलेली असल्यास, तसेच उन्हाळ्यात ‘कोल्ड ड्रिंक’च्याऐवजी आरोग्यपूर्ण पर्याय म्हणून ‘खर्जुरादि मंथ ’ प्यावा.

२. नागरादि मंथ :

घटक द्रव्य : सुळ, ज्येष्ठमध, तेल, खडीसाखर व दही

नागर म्हणजे सुळ यालाच ‘विश्वभेषज’ असाही पर्याय आहे. शरीरातील आम घटक (ज्याचे नीट पचन न होता शरीरात साठविले जाते, असे अन्न) पचनाचे उत्तम कार्य सुळ करते. वरील सर्व घटक समभाग घेऊन पाण्यात एक-दोन तास भिजवावे. सुळ व ज्येष्ठमधाची पूड (चूर्ण) घेतल्यासही चालेल. ज्येष्ठमध व खडीसाखरेमुळे ‘नागरादि मंथ’ चवीला गोड असतो. तसेच दह्यामुळे थोडी आंबट चव येते.‘नागरादि मंथ’चा पथ्य कल्पनेत समावेश होतो. हा मंथ वातज प्रदरात उपयोगी आहे. (प्रदर म्हणजे अंगावरुन पांढरे पाणी जाणे.) अन्य औषधी चिकित्सा सुरु असते वेळी ‘नागरादि मंथ’ दिवसाला एक-दोन वेळा प्यायल्यास लवकर आराम पडतो.


३. चंदनादि मंथ :

घटक द्रव्य : चंदन, वाळा, साखर, लाजा चूर्ण


उन्हाळ्यातील उष्णतेने बेजार झालेल्या व्यक्तींसाठी हा मंथ एक आरोग्यदायी व रुचकर पर्याय होऊ शकतो. वाळ्याचे सरबत (Rooh Afza) उन्हाळ्यात बरीच लोकं पितात. त्यातच चंदन व लाजा (म्हणजे लाह्या) घालून ते पाण्यात एक-दोन तास भिजू द्यावे. वरील घटकांच्या चार पट पाणी घालून ते भिजू द्यावे. (चंदन, वाळा, लाजा - समप्रमाणात, पाणी - याच्या चारपट) साखर न वापरता खडीसाखर वापरावी तसेच, चवीपुरते मीठ घालून प्यावे. वरील तिन्ही कृतींमध्ये मीठाचा समावेश घटक द्रव्यांमध्ये झालेला नाही. पण, चवीने खाणार्‍यांसाठी थोडी मीठाची चव गरजेची असते, म्हणून पिताना वरुन सैंधव भुरभुरावे व मंथ प्यावा. ‘चंंदनादि मंथा’चा वापर पंचकर्मांचा जर अतियोग झाला, तर त्यानंतर करण्यास सांगितला आहे. म्हणजेच, उलट्या, जुलाब, अतियोग (जास्त वेग) झाल्यास, शरीरातील जलीयांश कमी झाल्यास, इन्स्टंट तर्पण कर्म करण्यासाठी ‘चंदनादि मंथ’चा उल्लेख आयुर्वेदात केला आहे.


४. फलरस मंथ :

घटक द्रव्य : फळांचा रस, तूप, साखर, मध


आयुर्वेदशास्त्रानुसार फळ आणि दूध एकत्र करून पिऊ नये. हे मिश्रण ‘विरुद्धान्न’ म्हणून ओळखले जाते. विरुद्धान्न शरीराला पोषक नसून, अतिवापराने व्याधिकारक ठरते. म्हणून असे मिश्रण टाळावे. पण, दुधाऐवजी फळांचा रस असा पाण्यातून घेतल्यास अपाय होणार नाही. फळे सहसा आंबट-गोड चवीची घ्यावीत व ज्याला रस आहे, अशी घ्यावीत. तूप आणि मध हे समप्रमाणात घेऊ नये. ऋतूनुसार, प्रकृतीनुसार आणि व्याधीनुसार तूप आणि मध घ्यावे. (कफाचा त्रास वा प्रकृती असल्यास तुपापेक्षा मधाचे प्रमाण जास्त असावे व पित्ताचा त्रास व प्रकृती असल्यास तुपाचे प्रमाण मधापेक्षा जास्त असावे.) या सगळ्या पाककृतींमध्ये कुठेही शिजविणे, उकळविणे किंवा गरम करणे अपेक्षित नाही. ‘इन्स्टंट एनर्जी बुस्टर’चे काम हे मंथ करते. पण, मंथ हा जेवण झाल्यावर लगेच पिऊ नये. मधल्या भुकेला (१०-११ सकाळी किंवा सायं ४-५ वा.) प्यायल्यास चालेल. तसेच चहा घेण्यापूर्वी/नंतर लगेच मंथ घेऊ नये. सर्दी-पडसं असताना ‘नागरादि मंथ’ चालेल, अन्य नाही. आपल्या जवळील तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार या मंथांचा अवलंब करावा.
(क्रमशः)


- वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
MD -AYUR, PG DIP (Tricology), PG DIP (Skin Aesthetics), BA (Yoga Shastra)
vaidyakirti.deo@gmail.com
Powered By Sangraha 9.0