पाहणी नको ! मदत करा : शेतकऱ्यांतर्फे पवारांच्या दौऱ्याचा निषेध

18 Oct 2020 15:00:33
Sharad Pawar_1  
 


मुंबईला जाऊन तत्काळ मदत घोषित करा !

जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज जालना दौऱ्यावर आहेत. अवकाळी व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा करण्यासाठी पवार बांधावर पोहोचले. मात्र, तिथे शेतकऱ्यांनी पवारांचे निषेध आंदोलन करत स्वागत केले. बाधित पिकांना प्रतिहेक्टर ५० हजारांची थेट मदत करा, पाहणी दौरे नंतर करा, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी निषेध आंदोलन केले.
 
 
गेल्या आठवड्यापासून कोसळत असेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातील उस्मानाबाद, औरंगाबाद, लातूर, बीड, नांदेड, जालना या जिल्ह्यात शेतीचे नुकसान केले आहे. ठिकठिकाणी काढून ठेवलेले सोयाबीनही डोळ्यादेखत वाहून गेले. तर काही ठिकाणी सोयाबीनला बुरशी आली, मोड फुटले. कापूसही यातून सुटला नाही. हातातोंडाशी आलेल्या कापसाचेही मोठे नुकसान झाले. शेकडो एकरवरील उभा ऊस आडवा झाला. त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. खरिपाच्या पिकांवर पाहिलेली स्वप्न मातीमोल झाली आहेत.
 
पवारांचे केंद्राला साकडे
 
सत्तेत असूनही तत्काळ मदतीची घोषणा करण्यासाठी सर्व सरकारमधील मंत्री पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही आता सोमवार, दि. १९ ऑक्टोबरपासून पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. शरद पवारही मराठवाड्यातील तुळजापूर, उमरगा, औसा, परंडा आणि उस्मानाबादमधील भागांना भेट देत, झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबद्दलची माहिती देत केंद्राकडूनही मदत मिळवणार असल्याचे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले आहे.
Powered By Sangraha 9.0