'आम्ही मागे लागलो म्हणून मुख्यमंत्री घराबाहेर पडले'

18 Oct 2020 15:56:02

ch patil_1  H x



सांगली :
‘आम्ही मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडले. घरात बसून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येत नाही. यासाठी बांधावर जावे लागते,’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.




भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून राज्यातील स्थिती पाहावी, असे आम्ही अनेकदा बोललो. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या काळात तरी मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून शेतीची पाहणी करावी. आम्ही सातत्याने मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर अखेर मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत आहेत. आता त्यांनी स्वतःची जबाबदारी झटकून मदतीसाठी केंद्राकडे बोट दाखवू नये. राज्य सरकारने मदतीसाठी केंद्राकडे रितसर मागणी केली आहे का? कागदावर नुकसानीचा तपशील नोंदवला आहे का ? याबाबत अजून काहीच काम झालेले नाही," असा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रांबाबत विचारले असता आमदार पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्याचा राज्यपालांना अधिकार आहे. यात त्यांची काहीच चूक झाली नाही. उलट मुख्यमंत्र्यांनी पत्राला उत्तर देताना किमान राज्यपालांच्या वयाचे तरी भान राखायला पाहिजे होते. त्यांनी दिलेले उत्तर योग्य नाही.’




उद्धव ठाकरे सोमवारी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मात्र, शरद पवार आणि अजित पवार हे अनुक्रमे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी अगोदरच बाहेर पडले आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील उद्यापासून अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. एवढेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही कोकणातील नुकसानग्रस्त भागाला भेट देणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारभार करण्याची कार्यपद्धती विरोधकांच्या टीकेचा विषय ठरत आहे.आगामी काळात यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्यासह अन्य मागाण्यांसाठी आंदोलने करावी लागणार असल्याचेही चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. तसेच सत्ताधारी पक्षातील काही आमदार सरकारमधून बाहेर पडण्यासाठी आग्रही असल्याचा दावाही पाटील यांनी केला. विरोधक आक्रमक झाले तर आपली आमदारकी धोक्यात येईल, अशी भीती सत्ताधारी पक्षातील काही आमदारांना वाटत आहे. त्यामुळे हे आमदार स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांवर सरकारमधून बाहेर पडण्याासाठी दबाव आणत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0