'राज्य सरकारकडे फक्त मंत्र्यांचे चोचले पुरवायला पैसे'

18 Oct 2020 16:43:52

ajit pawar_1  H


मुंबई :
'राज्य सरकारकडे फक्त मंत्र्यांचे चोचले पुरवायला आणि पीआर कंपन्यांसाठी पैसा असावा', अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. 'पूरग्रस्तांना आताच मदत शक्य नाही',असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या' असे आदेश दिले होते यावरूनच भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.



राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीचे चित्र निर्माण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याला आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यानंतर त्यांनी पूरग्रस्तांना आताच मदत करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मात्र ‘पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या’ असे आदेश दिले होते. याविषयीची बातमी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात छापून आली होती. याच पार्श्वभूमीवर ‘अजित पवार सामना वाचत नसावेत’, असा टोलाही भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
 
ट्विट करत अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणतात 'पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी 'सामना'तून जारी केला होता. परंतु अजित पवार सामना वाचत नसावेत. मदत देणे शक्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारकडे फक्त मंत्र्यांचे चोचले पुरवण्यासाठी आणि पीआर कंपन्यांसाठी पैसा असावा. फुकाच्या तोंडाच्या वाफा,' असे म्हणत त्यांनी राज्यसरकारवर टीका केली.
Powered By Sangraha 9.0