कल्याणच्या रुग्णालयात घटस्थापनेला 'नव'दुर्गांचा जन्म

18 Oct 2020 17:28:00
Kalyan Vaishnavi Hospital



घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर नऊ मुलींचा जन्म

कल्याण : घटस्थापनेचा उत्साह देशभरात आहे. कोरोनामुळे नवरात्रोत्सवात रास, गरबा यांच्यावर नियंत्रण आहे. यातच मात्र, अनोखा शुभसंदेशाचे वृत्त आले आहे. कल्याणच्या वैष्णवी रुग्णालयात घटस्थापने दिवशी नऊ मुलींनी जन्म घेतला आहे. घटस्थापनेच्या दिवशीच असा अनोखा योगायोग जुळून आल्याने या घटनेची संपूर्ण राज्यात चर्चा आहे.
 
 
 
कल्याणच्या वैष्णवी रूग्णालयात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तब्बल नऊ मुलींनी जन्म घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड योद्धा आरोग्य कर्मचारी युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. कल्याणच्या वैष्णवी रुग्णालयातही अशाच प्रकारे यंत्रणा राबत होती. मात्र, घटनस्थापनेच्या दिवशी आलेल्या या शुभसंकेताने सर्व कोविड योद्ध्यांमध्ये एकच उत्साह संचारला.
 
 
 
एकाच दिवशी नऊ मुलींनी जन्म घेतला हा क्षण इथल्या कर्मचाऱ्यांसाठी भावूक आणि तितकाच उत्साह देणारा ठरला होता. आपल्या रुग्णालयात कोरोनाशी झुंज देत असताना खुद्द नवदुर्गांनीच अवतार घेतल्याची भावना साऱ्यांनी व्यक्त केली आहे. कल्याणच्या सुप्रसिध्द डॉ. अश्विन कक्कर यांची सामाजिक आणि संवदेनशील व्यक्ती म्हणून सर्वत्र ओळख आहे.
 
 
वैष्णवी मॅटर्निटी रुग्णालयातील शनिवारचा दिवस त्यांच्यासाठी काहीसा वेगळा ठरला. रुग्णालयात शनिवारी तब्बल ११ महिलांची प्रसुती करण्यात आली. ज्यामध्ये ११ पैकी नऊ महिलांनी मुलींना जन्म दिला असल्याची माहिती डॉ. ठक्कर यांनी दिली.
 
 
 
डॉ. ठक्कर म्हणाले, "आमच्या रुग्णालयात एकाच दिवशी ११ महिलांची प्रसुती होणो ही तशी नवीन गोष्ट नाही. पण एकाच दिवशी आणि तेही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नऊ मुलींचा जन्म होणो ही नक्कीच वेगळी आणि आनंदाची बाब आहे. या नऊ मुलींच्या जन्माची सर्वत्र चर्चा सुरू आहे."


Powered By Sangraha 9.0