'एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना खातोय काय ?'

    दिनांक  17-Oct-2020 17:58:23
|

raosaheb danve_1 &nbपैठण :
परतीच्या पावसाने राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला. उभी पिकं पावसामुळे आडवी झाली तर काही ठिकाणी वाहून गेली. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.


कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळं सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली आहे. मंत्री दानवे आज पैठण येथे ऐतिहासिक पालखी ओटा परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.


केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, अशी अनेक संकट येत राहतात. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं घराच्या बाहेर निघा. तर हे म्हणतात 'माझं कुटुंब माझी जबाबदारी'. आम्ही राज्यभर फिरलो तर आम्हाला काही झालं नाही. ह्यांना एकट्यालाच घरात बसून कोरोना खातो की काय, अशा शब्दात दानवेंनी टीका केली आहे. ते म्हणाले, या स्थितीत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरले. मागच्या वर्षीही ते बांधावर गेले. राजा प्रजेत गेला पाहिजे. प्रजेचं दु:ख वाटून घेतलं पाहिजे. त्या प्रजेचं कुटुंब हेच आपलं कुटुंब वाटलं पाहिजे. प्रजेच्या दु:खामध्ये सहभागी झालं पाहिजे. मात्र मुख्यमंत्री हे मी आणि माझे कुटुंब असं म्हणत घरात बसले आहेत,असे म्हणत दानवेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

आमच्या सरकारनं शेतकरी, गोरगरीबांना अनेक योजना दिल्या. या राज्य सरकारनं काय दिलं? असा सवाल त्यांनी केला. हे सरकार कोण चालवतंय काही कळत नाही. तिघांची तोंड तीन दिशेला असलेलं हे सरकार आहे. यांच्या काळात या राज्याचं काय होईल काही सांगता येत नाही, असं दानवे म्हणाले. हे सरकार कोण चालवतंय, कोण निर्णय घेतंय काय कळतच नाही,असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.