स्वामी तत्त्वज्ञानानंद : एक आधुनिक योद्धा संन्यासी

17 Oct 2020 21:48:27

swami_1  H x W:

ही कथा आहे हेमंतकुमार वामन वाघ या एका मध्यमवर्गीय मराठी तरुणाच्या ‘सुखसंपन्न जीवन ते संन्यस्त कर्मयोगी जीवन’ या प्रवासाची...


दि. १७ डिसेंबर, १९५१ रोजी वांद्रे पश्चिम, मुंबई येथील एका सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. १९६७ साली दहावीच्या परीक्षेत पहिला, १९७२ साली जे जे कॉलेजमधून मुंबई विद्यापीठाची बी.आर्चची पदवी. अमेरिकेतील शिकागो आयआयटीमधून एम आर्च उत्तम रीतीने पास. या यशस्वी उच्चशिक्षणामुळे १९७४पासून अमेरिकेतील अनेक वास्तुरचना आस्थापनांत काम, विशेषत: ‘स्किडमोर ओविंग अ‍ॅण्ड मेरील’ या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये उच्च पदावर व भल्या मोठ्या पगारावर अनेक वर्षे काम करून जगातल्या मोठ्या मोठ्या वास्तुरचनात्मक कामाचा अनुभव. आधुनिक तंत्रज्ञान वापरून व्यवस्थापनाचा, प्रशासनाचा अनुभव गाठीशी. १९८३साली ‘रामकृष्ण मिशन’च्या बेलूर मठात विधिवत संन्यास घेतला. हेमंतकुमार वामन वाघ या नावाने पूर्वायुष्यात घालवलेल्या सुखवस्तू जीवनाचा त्याग करून, ‘स्वामी तत्त्वज्ञानानंद’ हे नाव धारण करून नव्या संन्यस्त जीवनाचा प्रारंभ केला. ‘रामकृष्ण मिशन’मध्ये त्यांना ‘हेमंत महाराज’ या नावाने नवीन ओळख निर्माण झाली. स्वामी विवेकानंदांना वेदांत, पाश्चिमात्यांचे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान आणि इंग्रजी भाषा यांची योग्य सांगड घालून निर्माण केलेली शिक्षण प्रणाली हवी होती. ज्या शिक्षणामुळे सुसंस्कारित, सुविद्य तंत्रज्ञानी तरुण सरकारी नोकर्‍यांच्या शोधात न हिंडता स्वत:चे उद्योग-धंदे निर्माण करून इतरांना नोकर्‍या देतील, स्वत:ला व पर्यायाने देशाला ‘आत्मनिर्भर’ बनवतील.बेलूर मठाजवळचे ‘रामकृष्ण मिशन शिल्पमंदिर’ हे पॉलिटेक्निक याच विचारांना अनुसरून शिक्षण देण्यासाठी स्थापन केलेली एक शिक्षणसंस्था.‘रामकृष्ण मिशन शिल्पमंदिर पॉलिटेक्निक’चे प्राचार्य डॉ. घोष हे १९८७साली सेवानिवृत्त झाल्यावर रामकृष्ण मिशन शिल्पमंदिर व्यवस्थापन समिती व रामकृष्ण मिशन मुख्यालयाच्या कार्यकारिणीने मिळून संन्यासी वर्गातून ऑनररी प्रिन्सिपॉल (मानद प्राचार्य) नेमण्याचा निर्णय घेतला.

स्वामी तत्त्वज्ञानानंद (हेमंत महाराज) यांची शैक्षणिक योग्यता विचारात घेऊन आणि मुख्य म्हणजे, त्यांची या बदलत्या कार्यपद्धतीच्या प्रसंगी उद्भवणार्‍या कठीण प्रसंगांना धडाडीने तोंड देण्याची क्षमता, त्वरित योग्य निर्णय घेण्याची पद्धत, तडफदार वृत्ती, आधुनिक तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापनाचा अनुभव व प्रभावशाली व्यक्तिमत्त्व या सर्व गोष्टी विचारात घेऊन त्यांची या पदासाठी निवड करण्यात आली.या मानद प्राचार्यपदावर एका संन्यासी स्वामींची नेमणूक करण्यास शिक्षकवर्ग व सत्ताधारी साम्यवादी संघटनांकडून प्रखर विरोध झाला. शेवटी मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी मध्यस्थी करून तडजोड म्हणून प्राचार्यपदाच्या नावात ‘ऑफिसर-इन-चार्ज‘ असा तांत्रिक बदल करून या नव्या पदावर महाराजांची नेमणूक केली.हेमंत महाराजांनी थोड्याच दिवसात शिल्पमंदिर पॉलिटेक्निकची एक नवी इमारत बांधून अनेक नवीन अभ्यासक्रम सुरू केले. कौशल्य विकासाचे अल्पमुदतीचे प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरू केले. सरकारी कचाट्यातून मुक्तता करून आर्थिक स्वायत्तता मिळवली व अनेक उद्योगपतींकडून मदत गोळा करून संस्थेला ‘आत्मनिर्भर’ बनवले. संस्थेची सर्व प्रकारे पुनर्रचना केली. शिल्पमंदिर तंत्र शिक्षण संस्था स्वामी विवेकानंदांनी दाखवलेल्या मार्गाने वेगाने मार्गक्रमण करू लागली. शिक्षकवर्गाचे ज्ञान अद्ययावत व्हावे व शिकविण्यात रुची वाढावी, यासाठी शिस्तबद्ध रीतीने प्रोत्साहन, त्यांच्या वेतनांत सुधारणा, नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी अभ्यासवर्ग, विद्यार्थ्यांसाठी नवनवीन संगणक व यंत्रे यामुळे प्रारंभी विरोध करणारा शिक्षकवर्ग खूश होऊन मोठ्या उत्साहाने महाराजांच्या अधिपत्याखाली निष्ठापूर्वक विद्यादानाचे काम करू लागला. विद्यार्थीही आनंदाने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करू लागले. टाटांनी पॉलिटेक्निकला दिलेल्या नॅनो कारच्या मॉडेलचे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना शिकवून नॅनोच्या कारखान्यात लागणारे तंत्रज्ञ व मोटारींच्या सुट्या भागांचे उत्पादन करणारे छोटे कारखानदार निर्माण करण्याचे काम सुरू झाले.



महाराजांनी अनेक अल्पमुदतीचे तांत्रिक शिक्षणाचे मूल्यवर्धित अभ्यासक्रम सुरू करून अनेकांना स्वत:चे व्यवसाय सुरू करण्यास मदत केली.विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळांतही प्रावीण्य मिळवून शारीरिक स्वास्थ्य जोपासावे, म्हणून सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. महाराज स्वत: मुलांबरोबर व्हॉलीबॉल, फुटबॉल खेळत असत. थोड्याच दिवसांत स्वामी तत्त्वज्ञानानंद हे विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, कर्मचार्‍यांचेच नव्हे, तर रामकृष्ण मिशनच्या संन्यांशांचे, सेवकांचे, सरकारी मंत्री, बाबूलोक, प्रतिष्ठित उद्योजक व भद्र जनांचे आवडते मार्गदर्शक व गुरुतुल्य ‘हेमंत महाराज’ म्हणून ज्ञात झाले.रामकृष्ण मिशन शिल्पमंदिर पॉलिटेक्निकला हेमंत महाराजांच्या नेतृत्वामुळे नवीन ओळख निर्माण झाली.हेमंत महाराजांच्या कार्यशैलीमुळे प. बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू फारच प्रभावित झाले व त्यांनी हेमंत महाराजांना अनेक सरकारी समित्यांवर ‘मानद सदस्य’ म्हणून सन्मानपूर्वक आमंत्रित केले.भारतीय रेल्वेच्या बेलूर आणि बेलूर मठ या दोन स्थानकांची बांधणी रेल्वेने, महाराजांनी सादर केलेल्या सुंदर व प्रेक्षणीय आराखड्यानुसार केली आहे. जादवपूर विद्यापीठ व इतर अनेक महाविद्यालयांत परीक्षा पेपर सेटर म्हणूनही हेमंत महाराजांनी काम केले.हेमंत महाराजांनी अनेक संस्थांत अनेक विषयांवर व्याख्याने दिली. पुण्याच्या एमआयटीमध्ये व मुंबईच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्येही त्यांची व्याख्याने झाली. महाराजांची व्याख्याने मुख्यतः इंग्लिश व बंगाली भाषेत आहेत. त्यांचे लेख व व्याख्याने ’Collection of Articles Speeches : Swami Tattwajnananda' या शीर्षकाखाली दोन भागांत संग्रहित केली आहेत. बेलूर मठातल्या रामकृष्ण मंदिराच्या वास्तुशिल्पीय बारकाव्यांवर ‘ A Symphony of Architecture- Ramkrishna Temple, Belurmath' हे बंगाली व इंग्लिशमध्ये पुस्तक लिहिले.

७फेब्रुवारी, २०१३ला पश्चिम बंगालमधील माल्दा या गावात विवेकानंद समितीतर्फे एक सभा आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, हेमंत महाराज व इतर काही वक्ते होते. सभेत महाराजांचे अस्खलित बंगालीत भाषण झाले व मोहनरावजींचे हिंदीमध्ये. सभा संपल्यावर महाराज मा. मोहनजींबरोबर मराठीमध्ये बोलायला लागल्यावर मा. मोहनजी आश्चर्यचकीत झाले व त्यांचे नंतर अनेक विषयांवर संभाषण झाले. महाराज अपरात्री रामकृष्ण मिशनच्या टाटा सुमो गाडीतून बेलूरला जायला निघाले. पाऊस पडत होता, रात्रीची २-३ वाजताची वेळ होती, अचानक त्या महामार्गावर एक ट्रक आडवा आला व सुमो गाडी त्या ट्रकवर आदळून अपघात झाला. रामकृष्ण मिशनच्या गाडीला अपघात झालेला पाहून आजूबाजूच्या लोकांनी सर्वांना रामकृष्ण मिशनच्या कोलकात्याच्या मोठ्या इस्पितळात पाठवले. जे जे उपचार शक्य होते ते केले गेले. रामकृष्ण मठात व इतर अनेक ठिकाणी महाराजांना बरे वाटावे यासाठी प्रार्थना केल्या गेल्या. रा. स्व. संघ कार्यालयात महाराजांसाठी महामृत्युंजय यज्ञ व जप केला गेला. पण, दुर्दैवाने महाराज शुद्धीवर आलेच नाहीत. चार महिने कोमामध्ये राहून स्वामी तत्त्वज्ञानानंद, सर्वांचे आवडते हेमंत महाराज १० जून, २०१३ रोजी श्री रामकृष्ण चरणी विलीन झाले.

हेमंत महाराजांच्या लोकप्रियतेचा प्रत्यय जगभरातून आलेल्या श्रद्धांजलीयुक्त शोकसंदेशांतून आला. प. पू. सरसंघचालक, सरकार्यवाह, विवेकानंद केंद्र, अनेक संस्था, उद्योगपती, आधुनिक तंत्रज्ञान विषयांचे जाणकार, देश परदेशांतले महाराजांचे विद्यार्थी, मित्र व सहकारी अशा सहस्रावधी लोकांकडून महाराजांच्या अकाली अपघाती निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.
नोव्हेंबर 2009 मध्ये पुण्याला विश्व शांती केंद्र, आळंदी व MAEER-एमआयटी या संस्थांनी आयोजित केलेल्या ’XIV ENDOWMENT LECTURE SERIES 2009' या व्याख्यानमालेच्या उद्घाटनाच्या समारंभात इंग्रजीत केलेल्या भाषणात हेमंत महाराजांनी वैश्विक शांततेबद्दल काही मौलिक विचार मांडले. महाराज म्हणाले, “भारताला ‘सेक्युलर (सर्वधर्म समभावी) देश’ या ऐवजी ‘आध्यात्मिक देश’ अशी ओळख निर्माण व्हायला हवी. कारण, भारत हा प्राचीन काळापासून सर्वधर्मसमभावाचे जगातले एकमेव उदाहरण आहे. आमची संस्कृती ही फक्त मानवाच्याच नव्हे, तर विश्वाच्या कल्याणाचा विचार करणारी संस्कृती आहे.”आज सायन्सही अध्यात्माकडे वळत आहे. आपले प्राचीन धर्म ग्रंथ, संगीत नाट्यकला, वास्तुकला, आयुर्वेद, योग इत्यादी अनेक शास्त्रांद्वारे अधोरेखित केलेली जीवनमूल्ये व त्यावर आधारित जीवनशैली अंगीकारणे व इतर देशांतून आयात केलेली चंगळवादी संस्कृती नाकारणे, भ्रष्टाचार टाळणे या गोष्टीच भारताला विश्वगुरुपद बहाल करण्यास साहाय्यभूत ठरतील. हेमंत महाराजांची तडफदार, अभ्यासू वृत्ती व काम पाहून मिशनच्या एका ज्येष्ठ स्वामींनी जे उद्गार काढले ते हेमंत महाराजांबद्दल बरेचसे काही सांगून जातात. ते म्हणाले, “स्वामी विवेकानंदांच्या नंतर असा तडफदार, कर्तबगार, त्यांनी वापरलेला शब्द 'Dynamic' संन्यासी स्वामी, आज आम्ही हेमंत महाराजांच्या रूपात पाहत आहोत.” भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी मांडलेल्या विचारांच्या दिशेने भारत आज वेगाने वाटचाल करत आहे व या कार्यात हेमंत महाराजांचाही खारीचा वाटा आहे हे महाराष्ट्राला कळावे यासाठी केलेला हा लेखन प्रपंच.


- ज्ञानचंद्र वाघ
dnyan64@gmail.com
Powered By Sangraha 9.0