‘हॅण्डसम’ फौजदार अभिनेता...

17 Oct 2020 22:21:22

ravindra mahajani_1 


देखण्या, रुबाबदार रूपाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे आणि चित्रपटांचा प्रवाहही बदलायला लावणारे कलाकार म्हणजेच अभिनेते रवींद्र महाजनी...


अभिनय करणं आणि पैसे कमावणे यातून या कलावंताने सुवर्णमध्य काढला. दिवसा निर्मात्यांना भेटता यावे, म्हणून रात्री टॅक्सी चालवायची, हे ठरवले. रात्री पैसे कमवायचे आणि दिवसा आपले अभिनयाचे वेड जपण्याचा या कलावंताने प्रामाणिक प्रयत्न सुरू केला. तब्बल तीन वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली. त्याच्या अनेक नातेवाइकांनी हा टॅक्सी चालवतो, म्हणून संबंध तोडले. पण, मराठी चित्रपटांमध्ये यश मिळाले आणि सर्व नातेवाईक परत नीट बोलू लागले. या कलावंताने प्रामुख्याने मराठी व काही हिंदी, गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘झुंज’ या मराठी चित्रपटाद्वारे या कलाकाराने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ हे चित्रपट विशेष गाजले. या कलाकाराने चित्रपट दिग्दर्शक व निर्माता म्हणूनही काम केले. ऐतिहासिक कालखंडातील आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अति महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणार्‍या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या चित्रपटात या कलाकाराने नुकतीच एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. मराठी चित्रपटांमध्ये एक काळ गाजविणारे आणि आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या विशेषत: तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजविणारे त्या काळचे ‘हॅण्डसम हंक’ हरहुन्नरी कलावंत, म्हणजेच दिलखुलास अभिनेते रवींद्र महाजनी.


रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावचा. रवींद्र दोन वर्षांचे असताना वडिलांनी नोकरीसाठी मुंबईला मुक्काम हलवला. रवींद्र महाजनी यांचे वडील ह. रा. महाजनी हे स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार होते. एका प्रथितयश आणि लोकप्रिय वर्तमानपत्राचे ते संपादक होते. वडिलांची शिकवण रवींद्र महाजनी यांनी आयुष्यभर लक्षात ठेवली. वडील त्यांना म्हणायचे, “तू कुठलंही काम कर. पण, प्रामाणिकपणे कर. त्या कामाशी बेईमानी करू नकोस. बघ, यश तुझंच आहे.” हेच त्यांचे वाक्य लक्षात ठेवून त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत सुरू केली. शाळेत असल्यापासूनच रवींद्र यांना अभिनयाची अतिशय आवड. मोठे झाल्यानंतर नाटकांत-चित्रपटांतच जायचे, हे त्यांनी आधीच ठरवून टाकले होते. शाळेतही ते स्नेहसंमेलनात, अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत. इंटर सायन्सच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर निराश झालेल्या रवींद्र यांना वडिलांनी पदवी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. मग रवींद्र यांनी खालसा महाविद्यालयामध्ये बी.ए.साठी प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांच्या महाविद्यालयात रॉबिन भट्ट, रमेश तलवार, अवतार गिल, शेखर कपूर अशी मंडळी होती. सगळ्यांनाच अभिनयाची आणि चित्रपटांची अत्यंत आवड. शिक्षण पूर्ण करून चित्रपटात जायचे, असे सगळ्यांनी तेव्हाच ठरवून टाकले होते. त्यावेळी ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटके सादर करायचे. अशोक मेहताही त्यांच्यासोबत असायचे. चित्रपटात गेल्यावर काय काय करायचे, हेही त्याचवेळी त्यांचे ठरून गेले होते. शेखर कपूर यांना दिग्दर्शनाची आवड होती. रमेश तलवार-अवतार गिल यांच्यासोबत रवींद्र महाजनींना अभिनयाची आवड होती. रॉबिन भट्ट यांना लेखनाची आवड होती, तर अशोक मेहता यांना कॅमेरामन व्हायचे होते. आपापल्या आवडीप्रमाणे सगळे त्या त्या क्षेत्रात स्थिरावले आणि यशस्वी झाले.


शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब आजमाविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वडिलांच्या निधनानंतर आर्थिक जबाबदारीही त्यांच्यावर पडली होती, त्यामुळे कमाई करणे आवश्यक होते; म्हणून काही काळ त्यांनी छोटी-मोठी कामे केली. काही वर्षे टॅक्सीसुद्धा चालवली. संपादकांचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून नातेवाइकांकडून बरीच टीकाही सहन करावी लागली. पण, रवींद्र महाजनी यांना त्यांचे ध्येय माहीत होते. मधुसुदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना खर्‍या अर्थाने पहिली संधी मिळाली. महाजनींनी साकारलेली त्यातली मुख्य भूमिका गाजली. त्यानंतर कालेलकरांनी खास त्यांच्यासाठीच ‘तो राजहंस एक’ हे नाटक लिहिले. शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी दिली. १९७४साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर ‘रवींद्र महाजनी’ नावाचा नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. या चित्रपटाने त्यांचा नऊ वर्षांचा संघर्ष संपवला. ‘झुंज’ने रौप्यमहोत्सवी यश मिळवले आणि महाजनींकडे मराठी चित्रपट निर्मात्यांची रांग लागली. त्यानंतर ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’, असे अनेक यशस्वी चित्रपट महाजनींच्या खात्यावर जमा झाले. ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार,’ असे विनोदी ढंगाचे हलके-फुलके चित्रपटही त्यांनी केले आणि त्यांनाही यश मिळाले. त्या काळात तमाशापटांची आणि ग्रामीण पार्श्वभूमीच्या चित्रपटांची चलती होती. तरीही महाजनींसारखा ‘तारा’ मिळाल्यानंतर मराठी निर्मात्यांनी त्यांच्या शहरी रूपाला शोभून दिसतील, अशा कथा शोधायला सुरुवात केली आणि मराठी चित्रपटांतील सामाजिक आशय पुन्हा वाढीला लागला. चांगली कथा-पटकथा आणि रवींद्र महाजनी यांचे देखणे रूप, हे समीकरण १९७५ ते १९९० या काळात छान जुळून आले होते. अरुण यांच्या आकस्मिक निधनानंतर महाजनींनी त्यांच्या ‘बेलभंडार’, ‘अपराध मीच केला’ या नाटकांचे अनेक प्रयोग केले. सन 1990 नंतर महाजनी चरित्र भूमिकांकडे वळले. काही दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी काम केले. ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. कलाकाराने कायम नवनवीन शिकत आणि करत राहायला हवे, असे त्यांना वाटते. त्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू असतात.


“कुणी कुणाच्या पोटी आणि कुणाच्या घरात जन्माला यायचे, हे जर आपल्या हातात असते, तर माझी रत्नावली नक्कीच तुमच्या या घरात जन्माला आली असती,” हा ‘हळदीकुंकू’ या सिनेमातील रवींद्र महाजनी आणि जयवंत दळवी यांच्यातील हा संवाद मनात इतका खोलवर रुतला आहे की, आज दोन-तीन दशकांनंतरही तो लख्ख आठवतो. कनिष्ठ जातीतील प्रेयसीला सून म्हणून स्वीकारण्यास यातील नायक रवींद्र महाजनी यांचे वडील तयार नसतात. त्यावेळचा हा प्रसंग आहे. हा संवाद त्या सिनेमाचा एक भाग असला तरी प्रत्येक संवेदनशील माणसाला निश्चितच अस्वस्थ करणारा आहे, मंथन करायला लावणारा आहे. ‘हळदीकुंकू’ हा चित्रपट छान आहे. आपल्या वडिलांच्या आग्रहाखातर प्रतिष्ठेपायी, अभिनेता रवींद्र महाजनी यांना अभिनेत्री रंजना यांच्याशी लग्न करण्याची सक्ती केली जाते. पण, आपली वर्गमैत्रीण असणार्‍या अभिनेत्री उषा नाईक यांच्यावर त्यांचं प्रेम असतं. चित्रपटाची कथा साधी-सरळ असली, तरी उत्कृष्ट अभिनय, सुमधुर गाणी, त्याचबरोबर प्रेमाचा त्रिकोण झाल्यामुळे सन 1979 साली हा चित्रपट खूप गाजला होता. त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेला देखणा, रुबाबदार अभिनेता हीच रवींद्र यांची खरी ओळख. मराठीला त्यांच्या रूपाने एक हिंदीच्या तोडीचा अभिनेता लाभला. रवींद्र महाजनी यांची रंजना, उषा नाईक, आशा काळे यांच्याबरोबर अनेक चित्रपटात जोडी जमली. ‘मुंबईचा फौजदार’, ‘हळदीकुंकू’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’ या चित्रपटात त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. हिंदीतदेखील त्यांनी काही चित्रपट केले. परंतु, त्यात त्यांना तितके यश मिळाले नाही. त्यांनी ‘सत्ताधीश’ नावाचा चित्रपटदेखील निर्माण केला. परंतु, तो फारसा चालला नाही. त्यांचे चिरंजीव गश्मीर महाजनी यांनीदेखील चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून, तेसुद्धा वडिलांच्या पाऊलवाटेवर यशस्वीपणे पुढे जात आहेत. ‘पानिपत’ व ‘देऊळ बंद’ या दोन चित्रपटांमध्ये या बापलेकांनी सोबत अभिनय केला आहे.

सत्तरच्या दशकात आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वामुळे रवींद्र महाजनी मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखले जायचे. त्यांनी मराठीसोबतच काही हिंदी आणि गुजराती चित्रपटातही अभिनय केला आहे. मराठीमध्ये त्यांनी ‘जुलुम’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. ‘आराम हराम आहे’, ‘मरी हेल उतारो राज’, ‘दुनिया करी सलाम’, ‘तीन चेहरे’, ‘चोरावर मोर’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘लक्ष्मीची पावले’, ‘बेआबरू’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘बढ़कर’, ‘गंगा किनारे’, ‘नैन मिले चैन कहाँ’, ‘कानून कानून हैं’, ‘वहम’ आणि ‘गूंज’ हे त्यांचे प्रमुख चित्रपट आहेत. देखण्या, रुबाबदार रूपाने मराठी चित्रपटसृष्टी गाजविणारे आणि चित्रपटांचा प्रवाहही बदलायला लावणारे कलाकार अशीच रवींद्र महाजनी यांची खरी ओळख आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीला मनापासून सलाम आणि पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा.


- आशिष निनगुरकर
Powered By Sangraha 9.0