“जनतेने तुम्हाला उद्या आभासी मुख्यमंत्री मानले तर?”

17 Oct 2020 13:35:19

Uddhav Thackeray _1 
 
मुंबई : महाराष्ट्रामध्ये एकीकडे शेतकरी संकटात आहे, तर दुसरीकडे अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाबद्दल ठोस पाऊल उचललेले नाही. त्यात, बॉलीवूडचे समर्थन करताना मुख्यमंत्री दिसत असल्याने विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपनंतर आता मनसेनेदेखील मुख्यमंत्र्यांवर टीका करत मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. “निवडणुकीपूर्वी बांधावर दिसणारे उद्धव ठाकरे आता आभासी पद्धतीने बांधावर जात आहेत,” अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
 
 
 
“निवडणुकीआधी प्रत्यक्ष बांधावर जाणारे उद्धव ठाकरे आता मात्र आभासी पद्धतीने बांधावर जात आहेत. उद्या जनतेने तुम्हाला आभासी मुख्यमंत्री मानले तर?” अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. “राज्यातले सर्व नेते दौरे करत असताना मग मुख्यमंत्री घरी बसून का आहेत? शेतकऱ्यांना वाटत आहे की कुणीतरी आपल्याला दिलासा द्यायला हवा.” अशी टीका त्यांनी केली आहे.
 
 
 
गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके मातीमोल झाली आहेत. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष या भागांचा दौरा करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. परंतु, आतापर्यंत तरी उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच अधिकाऱ्यांशी चर्चा आणि परिस्थितीचा आढावा घेण्यावर भर दिला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0