राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा : देवेंद्र फडणवीस

17 Oct 2020 10:31:11

Devendra Fadnvis_1 &
 
 
मुंबई : महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाने मोठे थैमान घातले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना या पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. या भागातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता असून तिथे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
 
 
 
 
 
 
“परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्याला शासनाकडून थेट मदत मिळणे गरजेचे आहे. गेल्या ३ ते ४ दिवसांमध्ये पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून वेदना होतात. पण राज्य सरकारला अजूनही पाझर फूटत नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत यापलीकडे सरकारकडून काहीही शब्द दिला जात नाही. प्रत्यक्षात पंचनामे देखील होत नाहीत आणि शेतकऱ्यांना मदत तर मिळतच नाही. आज अन्नदात्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
 
 
“आधीच कोरोनामुळे राज्यातील प्रत्येक घटक हवालदिल झाला आहे. या संकटातून शेतकरी उभा करायचा असेल तर आतातरी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळेल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नुकसानीची व्यापकता आणि सर्वत्र झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे”, अशी मागणी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0