'घर सोडा, अन्यथा लोकांचा 'ठाकरे' नावावरील विश्वास उडेल'

16 Oct 2020 10:35:24

mns vs cm_1  H



मुंबई :
“मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल “ऑनलाईन” बघता येणार नाही,” अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. परिणामी हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे आणि वेदनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ शेअर करत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडण्याचा सल्ला दिलाय.


ट्विट करत बाळा नांदगावकर म्हणतात, "“मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो. पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही.थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा आणि त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा “ठाकरे”नावावरील विश्वास उडेल,” असा टोला बाळा नांदगावकरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

शेतात कापणीला आलेली उभी पीकं पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांचे मोठं नुकसान झालंय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा व त्यातून निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. प्राथमिक अंदाजानुसार २३ जिल्ह्यांमधील काढणीवर आलेल्या साडेचार लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. तूर, भात यांच्यासह कापसाचेही नुकसान झाले आहे. उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर व बारामती या ४ ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरफ) तुकड्या तैन्यात केल्या आहेत. वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनुष्यहानी टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले असले तरी, आता मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडण्याची गरज असल्याचे मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले आहे
Powered By Sangraha 9.0