'मुलाचे छंद जोपासणंं सोडा अन् शेतकऱ्याकडे लक्ष द्या'

16 Oct 2020 17:49:59

nilesh rane_1  


मुंबई :
परतीच्या पावसाने राज्याला दिलेल्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. उभी पिके आडवी झाली आहेत. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडे मदतीची विनवणी करत आहे. सोशल मीडियातून शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे आणि वेदनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.



निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, परतीच्या पावसामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाचे छंद जोपासायचे सोडून द्या आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर लक्ष द्या, असं म्हणत उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निलेश राणे यांनी टीका केली आहे. तसेच ते पुढे म्हणतात, मुख्यमंत्री ठाकरे घराच्या बाहेर या आणि बघा महाराष्ट्रात काय चाललंय पण तुम्ही त्या बॉलीवूड आणि संजय राऊत यांच्या नादी लागले आहात. तुम्हीच तुमचं मुखपत्र सामना आणि तुमच्या पीआर एजन्सीला बंद करावं तरच आणि तरच तुम्हाला महाराष्ट्राची खरी परिस्थिती कळेल.



बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीचा तडाखा बसला. बुधवारी झालेल्या पावसाने भीमा व कृष्णा नदीला पूर आल्याने पंढरपूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ पथकांची मदत घेण्यात आली. राज्यातील लाखो हेक्टरवरील सोयाबीन व भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तूर, भात या पिकांनाही अविृष्टीचा तडाखा बसला. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अनेक ठिकाणची वाहतूकही बंद करण्यात आली होती. पाऊस अजून सुरूच असून हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आणखी चार दिवस असाच कोसळण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0