फणसाड अभयारण्यामधून प्रथमच रानकुत्र्यांची नोंद

    दिनांक  15-Oct-2020 08:32:02   
|
dhole_1  H x W:


फणसाड-ताम्हिणी वन्यजीव भ्रमणमार्गाचे सर्वेक्षण होणार 

मुंबई (अक्षय मांडवकर) - रायगड जिल्ह्यातील 'फणसाड वन्यजीव अभयारण्या'मध्ये प्रथमच रानकुत्र्यांचा वावर आढळून आला आहे. ताम्हिणी वन्यजीव अभयारण्यामधून हे प्राणी याठिकाणी दाखल झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात ताम्हिणी ते फणसाड दरम्यान असलेल्या वन्यजीव भ्रमणमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम वन विभागाच्या मदतीने संशोधक हाती घेणार आहेत. यानिमित्ताने पश्चिम घाटाच्या म्हणजेच सह्याद्रीच्या डोंगर भागापासून विलग असलेल्या फणसाड अभयारण्याचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
 
 
रानकुत्रे हे अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहेत. सह्याद्रीच्या खोऱ्यात त्यांचा वावर प्रामुख्याने दक्षिणेकडील पट्ट्यांमध्ये आहे. परंतु, आता रानकुत्र्यांच्या अधिवासाची नोंद प्रथमच उत्तर पश्चिम घाटामधून करण्यात आली आहे. 'फणसाड वन्यजीव अभयारण्या'त या प्राण्याचा वावर आढळून आला आहे. संशोधक अनिश परदेशी, रोहन जोगळेकर आणि राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) सुनील लिमये यांनी रानकुत्र्यांच्या अधिवासासंबंधीची शास्त्रीय नोंद केली आहे. फणसाड अभयारण्यातील जीवांचे वैविध्य आणि त्यांचे या परिसरातील वर्गीकरणाचा अभ्यास सुरु आहे. याअंतर्गत अभयारण्य क्षेत्रात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. या कॅमेरा ट्रॅपमध्ये दोन वेळा रानकुत्र्यांचे छायाचित्र टिपण्यात आले आहे. 
 
 
 
फणसाड अभयारण्याच्या उत्तरेकडील भागामध्ये सर्वप्रथम २३ जानेवारी, २०२० रोजी आम्हाला रानकुत्र्याचे छायाचित्र मिळाले. त्यानंतर २९ जानेवारीला रात्रीच्या वेळी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या रानकुत्र्याचे छायाचित्र मिळाल्याची माहिती वन्यजीव संशोधक अनिश परदेशी यांनी दिली. त्यानंतर रानकुत्र्यांचा पाऊलांचे ठसे मिळाले. त्या ठशांवरुन चार ते पाच रानकुत्रे या भागात वावरत असल्याचे लक्षात आले. फणसाड अभयारण्यामधून प्रथमच रानकुत्र्यांची नोंद झाली असून पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील भागामध्ये रानकुत्र्यांच्या अधिवासाच्या वर्गीकरणाचा हा शास्त्रीय पुरावा असल्याचे, परदेशी यांनी सांगितले.
 
 
 
रायगड जिल्ह्यात ५२ चौ.किमी क्षेत्रावर 'फणसाड वन्यजीव अभयारण्य' पसरलेले आहे. या अभयारण्यामधून गेल्यावर्षी प्रथमच रानगव्यांची नोंद करण्यात आली होती. सह्याद्रीच्या डोंगर रांगापासून हा भागा दुरावलेला आहे. शिवाय कोणत्याही संरक्षित वन क्षेत्राचा पट्टा या भागाशी जोडलेला नाही. २०१८ साली मुळशी धरण परिसरातील ताम्हिणी वन्यजीव अभयारण्यात रानकुत्र्यांचा वावर निदर्शनास आला होता. त्यामुळे याच परिसरातून फणसाडमध्ये रानकुत्रे स्थलांतर करुन आल्याचा कयास परदेशी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ताम्हिणी ते फणसाड दरम्यानच्या भ्रमणमार्गाचा अभ्यास होणे आवश्यक आहे. 
 
 
फणसाडच्या उत्तर भागात रानकुत्र्यांचा वावर आढळून आल्याने या प्राण्याचा स्थलांतराचा अभ्यास होणे आवश्यक आहे. ताम्हिणीमधून हा प्राणी फणसाडमध्ये स्थलांतरित झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ताम्हिणी ते फणसाड दरम्यानच्या वन्यजीव भ्रमणामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम आम्ही हाती घेणार आहोत. - सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम)
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.