'...म्हणूनच जलयुक्त शिवारच्या चौकशीचा घाट'

15 Oct 2020 16:44:29

jalyukta shiwar_1 &n


कोल्हापूर :
जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीचा समाचार घेतला आहे. "आम्ही घेतलेले निर्णय केवळ आकसापोटी रद्द करण्याचा सपाटा या सरकारने सुरु केला आहे. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बिनधास्त करा. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा मात्र ही योजना केवळ सरकारची नसून यामध्ये लोकसहभाग देखील होता हे लक्षात घ्या, असेही चंद्रकांतदादा  पाटील म्हणाले.



एखाद्या गावात भ्रष्टाचार झाला असेल तर संपूर्ण जलयुक्त शिवार योजनेतच गैरव्यवहार झाल्याचा महाविकास आघाडी सरकारचा आरोप हास्यास्पद असल्याचा टोला मारतानाच खुशाल चौकशी करा, तुम्हाला अडवतंय कोण? असे आव्हानच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिले. जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, भाजप सरकारने जलयुक्त शिवार योजनेतून पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याचा प्रयत्न केला. सरकारी निधीबरोबरच लोकनिधीचा त्यासाठी वापर केला. ० .१७टक्के नमुन्यांवरुन संपूर्ण योजनेबाबत तर्क लावणे हे अत्यंत चुकीचे आहे. यामध्ये लोकांनी त्याचबरोबर सामाजिक संस्थांनी देणगी दिली आहे. त्यांची देखील तुम्ही चौकशी करणार का ? असा सवाल देखील चंद्रकांतदादा पाटील यांनी विचारला.


ते पुढे म्हणाले, "तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विचारा या योजनेचा फायदा झाला आहे की नाही. तुम्ही आमीर खान, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे त्यांना विचारा की त्यांनी किती काम केले आहे. त्यामुळे केवळ आकस मनामध्ये धरुन चौकशी करणे हे अत्यंत चुकीचे आहे. आरेमधील कारशेड हलवणे सरकारच्या अंगाशी आले आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा मुद्दा समोर आणला आहे," असा आरोप चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.


या योजनेतून बावीस हजार गावांत सहा लाखावर कामे झाली, त्यामध्ये केवळ १२० गावात चौकशी करून कॅगने अहवाल दिला आहे. नऊ हजार कोटीच्या योजनेत एक दोन गावात भ्रष्टाचार झाला असेलही. त्याला स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी जबाबदार आहेत, त्याची चौकशी करा. एका गावातील भ्रष्टाचाराला संपूर्ण सरकारला जबाबदार धरणे योग्य नाही. त्या गावातील योजनेची चौकशी करा, कारवाई करा असेही त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0