डॉ. अशोकराव मोडक : ८१ वर्षांचा चैतन्याचा झरा

14 Oct 2020 00:58:19

Dr Ashokrao Modak _1 
 
 
रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, सिद्धहस्त लेखक, अभ्यासू संशोधक, बिलासपूर येथील केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरु, वक्ता दशसहस्त्रेषु, जनतेच्या प्रश्नांवर आवाज बुलंद करणारे विधान परिषदेचे माजी आमदार असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेले डॉ. अशोकराव मोडक आपल्या वयाची ८० वर्षे पूर्ण करुन ८१व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या सहस्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
 
“रवी, पाच मिनिटे वेळ आहे का? एक विषय मनात आला म्हणून बोलायचे होते.” डॉ. मोडक यांचा महिन्यातून सामान्यपणे एकदा फोन येण्याची आता सवय झाली आहे. डॉक्टरांचा असा फोन येणे म्हणजे एक पर्वणीच असते. कारण, त्यांनी वाचलेला एखादा लेख व त्यातून त्यांना सुचलेले मुद्दे, नवीन पुस्तकाची माहिती व प्रबोधिनीच्या ग्रंथालयात हे पुस्तक नक्की मागवावयास हवे, असा त्यांचा आग्रह व प्रबोधिनीत पुस्तक आल्यानंतर माझ्याकडे ते अभ्यासाला सवडीने पण नक्की पाठव, असे फोनच्या शेवटी करुन दिलेले स्मरण, या गोष्टी आनंद देणार्‍या असतात. डॉ. मोडक म्हणजे सतत ज्ञानाची उपासना करणारे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. डॉक्टरांचा आणि माझा परिचय गेल्या दोन दशकांहून अधिक काळाचा. त्यांचा प्रत्यक्ष सहवास मिळतो, त्यावेळी आपल्याला विविध विषयांची नेहमी नवीन माहिती मिळत असते. यात हिंदुत्व, सावरकर, राष्ट्रवाद, विवेकानंद, पं. दीनदयाळ उपाध्याय, लोकमान्य टिळकांपासून ते थेट भारताच्या विदेशनीतीपर्यंत विषयांचा समावेश असतो. त्यांच्या बोलण्यातून व लिखाणातून त्यांची जिज्ञासा, अभ्यासूवृत्ती, व्यासंग, अफाट वाचन, चिकाटी हे गुणविशेष प्रभावाने जाणवतात. संस्कृत श्लोक, उद्धरणे त्यांना तोंडपाठ असतात. ते एक उत्तम, नावाजलेले वक्ते म्हणून महाराष्ट्रास परिचित आहेत. त्यांच्या लेखनात एक शिस्त असते. संदर्भ व तळटीपा असतात व तसा त्यांचा आग्रह असतो. डॉक्टरांनी आतापर्यंत ३६ पुस्तके, १४० शोधनिबंध व विपुल असे वृत्तपत्रीय लेखन केले आहे. एकदा मांडी ठोकून बसले की ठरलेले लेखन पूर्ण केल्याशिवाय ते उठत नाहीत. त्यांचे अक्षरही तितकेच वळणदार व सुंदर. विचारवंत माणसांचे अक्षर चांगले नसते, या सर्वसाधारण समजास डॉक्टर निश्चित अपवाद आहेत. आजच्या काळातही शाईच्या फाऊंटन पेनाने लेखन करणारी डॉक्टरांसारखी व्यक्ती विरळीच. फाऊंटन पेनामुळे अक्षरही चांगले येते व जलद गतीने लिहिता येते, असा डॉक्टरांचा सिद्धांत.
 
 
 
डॉक्टरांचा शिस्तबद्ध दिनक्रम ठरलेला असतो. आजही नित्यनियमाने एक तास चालणे व दैनंदिन सूर्यनमस्कार हे त्यांच्या निरोगी वयोमानाचे एक गमक. त्यांचा जन्म तसा नावापुरता नगरचा! परंतु, त्यांचे सर्व बालपण व शालेय शिक्षण हे झाले धुळ्यात, त्यांच्या आजोळी. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनले ते आजोळमधील संस्कारांमुळे. १९४८च्या संघबंदीच्या सत्याग्रहात त्यांच्या आजोळच्या नातेवाइकांनी सहभाग घेतला होता. धुळे भागात त्या काळी नानाराव ढोबळे संघाचे ज्येष्ठ प्रचारक म्हणून काम करत होते. आपल्यावर नानांच्या व्यक्तिमत्त्वाचा विलक्षण प्रभाव पडला व नानांचा सहवास, त्यांचा स्वभाव, समर्पित वृत्ती या गोष्टी आपल्या हृदयात कायम कोरल्या गेल्या, असे अशोकराव नेहमी सांगतात. विनयशीलता, नम्रता, साधी राहणी हे अशोकरावांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष गुण. साधी स्वच्छ शर्ट-पँट, खांद्याला एक बटवा, व्याख्यानाच्या वेळी सदरा असा डॉक्टरांचा नेहमीचा पेहराव. शर्टाची कॉलर घामाने भिजू नये म्हणून कॉलरच्या आतल्या बाजूस मानेभोवती विशिष्ट प्रकारची त्रिकोणी घडी घालून रुमाल ठेवण्याचीही डॉक्टरांची काहीशी सवय. आमदार झाल्यावरही डोंबिवलीत रेल्वे स्थानकापासून घरापर्यंत ते पायी प्रवास करत व लोकांना याचे कौतुक असे. डॉक्टरांना मी कधी चिडलेले, रागावलेले बघितले नाही. संघसंबंधित संस्थांमधील कार्यकर्ते व समाजजीवनात कार्य करणार्‍यांपोटी अशोकरावांच्या मनात कायम आत्मीयता व कृतज्ञतेची भावना असते. कार्यकर्त्यांची व त्याच्या परिवाराची ते आस्थेने चौकशी करत असतात. ‘मित्रा’ हा त्यांचा प्रिय शब्द. वाचन व लेखन करणार्‍याला त्यांचे नेहमी प्रोत्साहन असते. आपल्याकडील ज्ञान व माहिती दडवून ठेवण्याचा त्यांचा स्वभाव नाही. एखाद्या विषयावर कोणास लेख लिहावयाचा असेल किंवा भाषण द्यावयाचे असेल आणि अशोकरावांकडे त्यासाठी अधिक माहिती व मुद्दे मागितले तर त्याचे ते नेहमी स्वागत करतात. त्यात कंजुषी न करता, भाषण देणार्‍यास व लेख लिहिणार्‍यास उदार मनाने मुद्दे, संदर्भ, उदाहरणे त्वरित देतात. मी स्वतः याचा अनेकदा अनुभव घेतला आहे.
 
 
स्वा. सावरकर व डॉ. हेडगेवार ही त्यांची दैवते आहेत. ‘म्हाळगी प्रबोधिनी’ योजत असलेले वैचारिक व संशोधन उपक्रम, तसेच ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’च्यावतीने योजण्यात येणार्‍या ‘सावरकर साहित्य संमेलना’त अशोकरावांचे नेहमीच योगदान राहिले आहे. डॉक्टर थोरामोठ्यांपासून तरुण वर्गाशीही समरस होतात. मित्रत्व करु शकतात. मिष्किलता हा त्यांचा आणखी एक स्वभाव विशेष. महापुरुषांच्या जीवनातील तत्त्वज्ञानाबरोबर विनोदाचे अनेक किस्सेही ते तेवढ्याच सहजतेने सांगतात. एका महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्या महाविद्यालयातील प्राचार्य व कँटिनच्या मालकाचे नाव योगायोगाने सारखे होते. डॉक्टरांनी एकदा चहाची ऑर्डर देताना चुकून प्रचार्यांनाच फोन लागला गेल्यामुळे कशी गडबड झाली, हे त्यांच्याकडूनच ऐकावे.
 
 
डॉ. मोडक यांनी १९९४ मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि तेव्हापासून सलग १२ वर्षे कोकण पदवीधर मतदार संघातून ते विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून गेले. विधान परिषदेत त्यांनी कोकणातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली. कोकण पदवीधर मंचाच्या माध्यमातून अनेक उपक्रम घडवून आणले. कोकण विभाग म्हणजे नारळ, आंबा, सुपारी, काजू इ. चे आगार. यात सुपारीच्या बागायतदारांना पूर्वी सुपारीच्या पिकावरच कर भरावयास लागायचा. डॉ. मोडकांच्या नेतृत्वाखाली या विषयावर बागायतदारांच्या बैठका, आंदोलने झाली आणि त्याचा शेवट हा कर रद्द होण्याकडे झाला. त्यांच्या आमदारकीच्या काळात महाराष्ट्रात १९ आयुर्वेद व युनानी महाविद्यालये होती. सदर महाविद्यालयांना काही रुग्णालये संलग्न होती. या महाविद्यालयांना सरकारकडून ७० टक्के अनुदान दिले जायचे. उरलेल्या ३० टक्के खर्चाची भरपाई रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांकडून वाढीव दराने वसूल करण्यात येत असे. एका अर्थाने रुग्णांवर अन्याय होई. डॉक्टरांनी हा मुद्दा विधानसभेत लावून धरला व महाराष्ट्र सरकारकडून आयुर्वेद व युनानी महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. कोकण पदवीधर मंचाच्या माध्यमातून कोकणात आठ ठिकाणी रुग्ण साहाय्यक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. एक वर्षाचा कालावधी असलेल्या या अभ्यासक्रमास डॉक्टरांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची मान्यता मिळवून दिली. या उपक्रमामुळे २५०० महिलांना रोजगार मिळाला.
 
 
शिरढोण हे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मस्थान. त्यांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार, तसेच शिवाजी महाराजांचे पहिले चरित्रकार परमानंद स्वामी यांचे पोलादपूर येथील त्यांच्या जन्मस्थानी उभारण्यात आलेले स्मारक, या दोनही गोष्टी, डॉक्टरांच्या पुढाकारामुळे झाल्या. प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, तिथे अफजलखानचा वर्षानुवर्षं उरुस भरवला जायचा. हा लांच्छनास्पद प्रकार बंद पाडण्यासाठी जी काही आंदोलने व प्रयत्न झाले, त्यांत डॉ. मोडक यांचा मोलाचा वाटा होता. डॉक्टरांनी विधान परिषदेतील आमदारकी आपले कार्य व सभागृहातील वाक्चातुर्याने गाजवली. महाराष्ट्र विधान परिषदेचा त्यांना प्राप्त झालेला ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’ ही त्याची एक पावतीच आहे. ‘सोव्हिएत इकॉनॉमिक अ‍ॅड टू इंडिया’ या विषयावर डॉक्टरांनी पीएच.डी प्राप्त केली. भारत सरकारने राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक (National Research Professor) म्हणून २०१५ पासून पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्तीही केली. २००६ पासून ‘इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स’ संस्थेच्या कार्यकारी मंडळावर ते सदस्य म्हणून नियुक्त झाले आहेत. बिलासपूर येथील केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरु म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील विविध जबाबदार्‍यांच्या आधारे त्यांनी अकादमिक क्षेत्रातील उंची गाठलीच आहे. परंतु, हे करत असताना त्यांनी संघनिष्ठेस कधी अंतर दिले नाही, हेही विशेष उल्लेखनीय! बालपणी स्वयंसेवक मग अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपचे आमदार, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे विश्वस्त, देवबांध येथील सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाचे अध्यक्ष अशा अनेक जबाबदार्‍या त्यांनी सांभाळल्या आहेत.
 
 
एक आदर्श स्वयंसेवक म्हणून डॉ. अशोक मोडक जीवन जगले व जगत आहेत. कधी ‘प्रथम पुरुषी एकवचनी’ व्हायचे नाही, ही संघ संस्कारांनी दिलेली शिकवण अशोकरावांच्या वागण्या-व्यवहारातही आपल्याला नेहमी दिसते. अहंकार त्यांना कधी शिवला नाही. उर्वरित आयुष्यातही आपल्या हातून कोणतीही चूक होऊ नये, यासाठी परमेश्वराकडे आजही ते प्रार्थना करत असतात. यातच त्यांची विनम्रता दिसते. आपल्या वयाची ८० वर्षे पूर्ण करुन ८१व्या वर्षात पदार्पण करणार्‍या डॉक्टरांचे ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ व ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’च्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्यावतीने मनःपूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना उदंड व निरोगी दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, ही ईश्वरचरणी प्रार्थना!
- रवींद्र साठे
(लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आहेत.)
 
 
Powered By Sangraha 9.0