“हे कसले हिंदुत्वाचे पुजारी, हे तर लाचारी”

13 Oct 2020 17:36:19

Uddhav Thackeray_1 &
 
मुंबई : मंदिरे खुली करण्यावरून आता विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. धार्मिक स्थळे खुली करण्यावरून गेले महिनाभर भाजप मागणी करत आहे. याशिवाय, राज्यपालांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र लिहिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ‘माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही,’ असे राज्यपालांना प्रत्युत्तर देत मंदिर उघडण्यासाठी नकार दिला. यावर “हे कसले हिंदुत्वाचे पुजारी, हे तर सत्तेसाठी लाचारी आहेत.” असे म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
 
 
 
आशिष शेलार यांनी सांगितले की, “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत ज्यांनी केली, याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना ज्यांनी मुंबईचे पालकमंत्री केले, पंढरपुरात जाऊन विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्शही ज्यांनी केला नाही. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी आहेत,” अशी टीका शेलार यांनी ट्विटरवरून केली. तसेच पुढे शेलार म्हणाले की, “जे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये “शेजारी-शेजारी” बसले आहेत. यांनीच अयोध्येत राम मंदिराचे भूमीपूजन ई-पद्धतीने करा, असे अनाहूत सल्ले दिले होते. तसेच “भारत तेरे तुकडे हो हजार” म्हणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले. त्यांच्या कार्यक्रमाला हे निघाले होते.”
 
 
Powered By Sangraha 9.0