‘अजेय भारत’मधून वैभवशाली इतिहासाचे साक्षेपी लेखन

13 Oct 2020 21:59:27

ajey bharat_1  
 
 
पुणे : आपल्या हजारो वर्षांच्या वैभवशाली इतिहासाच्या परंपरेत अनेक विविधता निर्माण झाल्या. त्या सगळ्या विविधतांचं एकतेतं केलेलं समन्वित, संवादी आणि समरस असं संकलन म्हणजे हिंदू समाज म्हणजेच आजचा भारत देश आहे. हा हिंदू समाज घडण्याची प्रक्रिया ज्या काळात पूर्णत्वाला गेली हा तो (५ शतक ते १२ वे शतक) काळ आहे. हा आपला उज्वल इतिहास जगाला सांगणे आवश्यक आहे. आपल्या प्रगतीसाठी तो जाणून घेणे देखील तितकाच गरजेचे आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले.
 
 
सुधा रिसबूड लिखित व कॉटिंनेन्टल प्रकाशित अजेय भारत (५ शतक ते १२ वे शतक – भारतीय इतिहासाचा दैदीप्यमान कालखंड) या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते आज (१३ ऑक्टोंबर २०) झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी नॅशनल मेरिटाईम हेरिटेज कॉम्पलेक्सचे डायरेक्टर जनरल व ज्येष्ठ पुरातत्व संशोधक डॉ.वसंत शिंदे हे होते. तर व्यासपीठावर लेखिका सुधा रिसबूड व कॉटिंनेन्टल प्रकाशनच्या देवयानी अभ्यंकर या उपस्थिती होती. न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी कोरोना संसर्गासंबंधाने असलेल्या सर्व नियमांचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास रा.स्व.संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांतांचे संघचालक नानासाहेब जाधव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर कार्यवाह महेश करपे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे महेश आठवले आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 
 
भारत देशात शासननिरपेक्ष स्वतंत्र अशी व्यवस्था आहे ती मोडून काढल्याशिवाय या देशावर राज्य करणे सोपे नाही, ही गोष्ट ज्यावेळी ब्रिटीशांच्या लक्षात आली त्यावेळी त्यांनी आपला गौरवाशाली इतिहास मोडून सांगायला व शिकवायला सुरूवात केली. आपली वैभवशाली परंपरा, वस्तुस्थिती सांगणारे पुरावे दडविले. जे पुरावे उपलब्ध होते त्यांचे विकृत विश्लेषण केले गेले. विदेशींच्या मदतीने काही विद्वानांनी जाणीवपूर्वक बिघडवलेला हा दृष्टीकोन स्वातंत्र्यानंतर ही सुधारण्याची संधी होती मात्र दुर्दैवाने ही सुधारणा होता कामा नये हे नियोजनपूर्वक पाहिले गेले असेही डॉ. भागवत म्हणाले.
 
 
आमच्या इथे इतिहासाची मांडणी करताना निष्कर्ष आधी मांडला जातो त्यानुसार सोयीचे पुरावे, संदर्भ समोर ठेवले जातात. पण जे सत्य आहे, दिसतं आहे अशी कोणतीही गोष्ट मान्य केली जात नाही. राखीगढीमध्ये हडप्पन संस्कृती संबंधाने झालेले संशोधन त्याचे एक चांगले उदाहरण म्हणून पाहता येईल असे डॉ.भागवत यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ.वसंत शिंदे यांनी आपल्याकडे इतिहास नव्या पिढीला सांगणे किती गरजेचे आहे हे सांगताना सुधा रिसबूड यांनी उपलब्ध सर्व साधनांचा चौफेर संशोधन करून `अजेय भारत` पुस्तकाच्या माध्यमातून इतिहासाची सर्वांगिण मांडणी केली असल्याचे सांगितले.
 
 
भारतावर अनेक आक्रमण झाली तरीही इथली संस्कृती आजही टिकून आहे. आज आपल्या संस्कृतीत असलेल्या अनेक गोष्टी या हडप्पन संस्कृतीच्या उत्खननाच्या वेळी देखील आढळल्या. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर अफगाणिस्तानपासून बांग्लादेशपर्यंत आपणा सर्वांचा गेल्या दहा हजार वर्षांपासूनचा एकच वंशज आहे हे सर्व पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी लेखिका सुधा रिसबुड यांनी ५ वे शतक ते १२ वे शतक या भारत देशाच्या दैदीप्यमान कालखंडातील इतिहास समोर येणं आवश्यक होते. पण ते मांडण्याचे धाडस कुणी केलं नाही. त्याची गरज लक्षात घेऊन मी हा इतिहास लेखानाचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. देवयानी अभ्यंकर यांनी प्रकाशनाची मागची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर गाडे यांन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0