महाराष्ट्रातून प्रथमच दुतोंडी शार्कची दुर्मीळ नोंद

12 Oct 2020 17:08:51

shark _1  H x W


सातपाटीमध्ये आढळला दुतोंडी स्पेडनोझ शार्क 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रामधून प्रथमच दुतोंडी (dicephalic) शार्क माशाच्या प्रजातीची नोंद झाली आहे. पालघरच्या सातपाटी येथे मच्छीमारांना हा दुतोंडी शार्क आढळून आला. 'स्पेड नोझ शार्क' (छोटी मुशी) प्रजातीमधील या दुतोंडी शार्कची ही दुर्मीळ नोंद झाल्याने अशा प्रकारच्या नोंदी तज्ज्ञांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मच्छीमारांना सागरी जीवशास्त्रज्ञांनी केले आहे. 
 
 
 

shark _1  H x W 
 
 
महाराष्ट्राच्या सागरी परिसंस्थेतील अनेक गुपिते वारंवार उलगडत असतात. अशाच प्रकारची एक दुर्मीळ नोंद नुकतीच झाली. शनिवारी सातपाटी येथील मच्छीमार नितीन पाटील यांना हे सहा इंच लांबीचे दुतोंडी शार्कचे पिल्लू सापडले. या प्रकाराची माहिती त्यांनी छायाचित्रांसह 'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संस्थे'च्या (सीएमएफआरआय) शास्त्रज्ञांना पाठवली. हा दुतोंडी शार्क 'स्पेड नोझ' प्रजातीचा असून महाराष्ट्रातल्या सागरी परिक्षेत्रातील ही पहिलीच नोंद असल्याची माहिती 'सीएमएफआरआय'चे शास्त्रज्ञ के.व्ही.अखिलेश यांनी दिली. माणसांबरोबरच इतर प्रजातींमध्ये देखील अशाप्रकारची उदाहरणे आपल्याला दिसतात. मादीच्या गर्भामध्ये बदल झाल्याने असे दुतोंडी जीव जन्माला येत असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
 

shark _1  H x W 
 
 
यापूर्वीही भारतामधून अशा प्रकाराच्या दुतोंडी सागरी जीवांची नोंद झाली आहे. १९८४ साली आंधप्रदेशमधून क्राऊननोझ रे, १९९१ साली स्पेडनोझ शार्क आणि १९६४ साली गुजरातमधून मिल्क शार्कचे दुतोंडी नमुने सापडले होते. अशा प्रकारच्या दुतोंडी (dicephalic) प्रजाती प्रौढ अवस्थेपर्यंत जीवंत राहत नाहीत. कारण, अशा प्रजातींमध्ये दोन मेंदू असल्यामुळे अन्नाची शिकार करताना बरीच गुंतागुंत होते अशी माहिती सागरी जीवशास्त्रज्ञ स्वप्निल तांडेल यांनी दिली. मच्छीमारांनी अशा प्रकारच्या जीवांचे नमुने सापडल्यास त्याची माहिती सागरी शास्त्रज्ञांना देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. जेणेकरुन या दुर्मीळ जीवांच्या नोंदी संग्रहित करुन संशोधनामध्ये त्याचा उपयोग होईल. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0