आम्ही तुमचे बाप आहोत : चंद्रकांतदादा पाटील

10 Oct 2020 17:29:13

Chandrakant Patil_1 
 
पुणे : “उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दाखवून द्या, आम्ही तुमचे बाप आहोत,” असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. कोथरूड विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी संघटनेच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यासह आघाडी सरकारवर टीका केली.
 
 
“भारतीय जनता पक्ष हा अत्यंत मोठा पक्ष आहे, याचा तुम्हाला अभिमान असला पाहिजे,” असे सांगत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. जगातील ९० टक्के देशांच्या लोकसंख्येपेक्षा भाजपाची सदस्य संख्या ही जास्त असल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. भाजपाचे सध्या २२ कोटी सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
“राज्यातील महाविकास आघाडी सरकार दिशाहीन सरकार आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच का घेतला नाही? सरकारमध्ये कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. मुख्यमंत्री तर मातोश्रीमध्येच बसलेले असतात. मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकणे हे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघांसाठी चुकीचे ठरेल. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करा, असे काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार बोलले असतील तर त्यांनी आधी ओबीसी समाजाला याबाबत विचारावे. त्यांना हे चालणार आहे का? असे झाले तर गावोगावी संघर्ष होतील.” असेही मत त्यांनी मांडले.
 
 
Powered By Sangraha 9.0