"लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं"

01 Oct 2020 12:07:23

sabhajiraje_1  



मुंबई :
बीड जिल्ह्यातील विवेक कल्याण राहाडे या मराठा समाजातील तरुणाने आरक्षण न मिळाल्याने शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली.त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन युवकांनी आत्महत्येचा निर्णय घेऊ नये असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजेंनी केले आहे. संभाजीराजेंनी ट्विट करून हे आवाहन केले.


ते म्हणतात, “बीडमधील विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरुन निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहिल. मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरु असताना युवकांनी आत्महत्या करु नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही.” ते पुढे म्हणतात,"एक लक्षात ठेवा हा समाज, "लढून मरावं, मरून जगावं" हेच आम्हाला ठावं, असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका. आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी, उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूंच!" अशा विश्व त्यांनी मराठा समाजमध्ये जागवला.


सुसाईड नोट लिहून 'या' विद्यार्थ्याची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या


मी मेल्यानंतर तरी केंद्रआणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि तेव्हा माझे मरण सार्थक होईल, अशी चिठ्ठी लिहून केतुरा येथील विवेक कल्याण रहाडे (१८) या विद्यार्थ्याने गळफास घेतला. बारावीला चांगले गुण मिळाल्यानंतर त्याने नीटची परीक्षा दिली होती. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
Powered By Sangraha 9.0