' अन्यथा...ही मशाल संपूर्ण व्यवस्था भस्मसात करेल'

01 Oct 2020 10:16:57

parth pawar_1  



मुंबई :
राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यापासून मराठा समाजात अस्वस्थता आहे. मराठा संघटनांनी लढण्याची भूमिका घेतली आहे. याच मुद्दयावरून बीड जिल्ह्यात विवेक राहाडे या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्येपूर्वी त्यानं चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. याच घटनेच्या अनुषंगानं पार्थ पवार यांनी ट्वीट केलं आहे. पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात ट्वीट असून ते मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे सांगितले.




'मराठा आरक्षणासाठी विवेकनं आत्महत्या केल्याचं ऐकून हादरून गेलो. अशा दुर्दैवी घटनांचं सत्र सुरू होण्याआधीच मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि आरक्षणासाठी लढायला हवं. महाराष्ट्र सरकारनंही यात तातडीनं लक्ष घालावं,' असं पार्थ यांनी म्हटलं आहे. या घटनेतील मृत तरुणाचा फोटो आणि त्याने लिहिलेली चिठ्ठी शेअर करत, पार्थ पवार यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जागं होण्याचं आवाहन केलंय. 'विवेकनं आमच्या मनात पेटवलेली ज्योत संपूर्ण व्यवस्थेला भस्मसात करू शकते. एका संपूर्ण पिढीचं भवितव्य पणाला लागलंय. हे सगळं पाहता सर्वोच्च न्यायालयात जाण्याखेरीज माझ्यासमोर पर्याय नाही. सध्या न्यायालयापुढं मराठा आरक्षण प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. माझ्या मनात पेटलेली ही मशाल पुढं नेण्यास मी तयार आहे. विवेकला आणि त्याच्यासारख्या लाखो तरुणांना न्याय मिळावा म्हणून मी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे. 'जय हिंद, जय महाराष्ट्र' असे पार्थ यांनी ट्वीटच्या शेवटी म्हटले आहे.


दरम्यान मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा संघटना वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करत आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षणावरील स्थगिती कोर्टाकडून उठत नाही, तोपर्यंत फायदा मिळाला पाहिजे अशी मागणी मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी केली. येत्या १० ऑक्टोबर रोजी मराठा गोलमेज परिषदेने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे असं त्यांनी सांगितले
Powered By Sangraha 9.0