गांधीजींचा ‘अंत्योदय’ विचार रुजविणारा समाज उद्योजक

    दिनांक  01-Oct-2020 22:11:47   
|


Kishor Kakade_1 &nbsगांधीजींनी नेहमी शेवटच्या माणसाचा विचार केला होता. ‘अंत्योदय’ हा शब्द त्यामुळेच रुजू झाला. किशोर काकडेंसारखे समाज उद्योजक खर्‍या अर्थाने गांधीजींचे विचार खोलवर रुजवत आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 


 
७० वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी खेड्यांना स्वयंपूर्ण बनण्याचा सल्ला दिला होता. खेड्यातील भारताचा विकास व्हावा, हे गांधीजींचं स्वप्न होतं. कोरोनासारख्या साथीच्या आजाराने भारतच नव्हे, तर अख्खे जग त्रस्त आहे. भारतासह जगाची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. अशा परिस्थितीत आपल्या पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भरते’ची घोषणा केली. येथील उद्योग-व्यवसायांना बळकटी यावी, यासाठी प्रत्येक भारतीयाने स्थानिक उद्योगांचा आवाज व्हावा. त्यांच्याकडून खरेदी करावी असे आवाहन केले. खेड्यातून येऊन जीवन संघर्ष करणार्‍या त्या तरुणाने असंच काहीसं स्वप्न पाहिलं. अगदी चणे विकण्यापासून त्याने अनेक उद्योगधंदे केले. गृहिणी असणार्‍या आपल्या आईला महागाईच्या राक्षसाशी झुंजताना त्याने पाहिले. आपल्या अशा कोट्यवधी भारतीय आईंची या संकटातून सुटका व्हावी म्हणून त्याने अनोखी संकल्पना राबविली. हजारो आई आज या संकल्पनेमुळे महागाईशी दोन हात करुन स्थिर झाल्या आहेत. हा सामाजिक बदल घडवू पाहणारा समाज उद्योजक म्हणजे ‘काक इकॉनॉमिक मार्केटिंग प्रा.लि’चे किशोर काकडे होय.


सातार्‍याच्या वाई तालुक्यातील चिंधवली एक टुमदार गाव. या गावात अशोक काकडे आणि हिरा काकडे हे दाम्पत्य राहत होते. पुढे अशोक काकडे मुंबईला कामासाठी गेले. एका खासगी वाहनावर वाहनचालकाची नोकरी करु लागले. काकडे दाम्पत्यास एकूण तीन अपत्ये, किशोर, कैलास आणि सीता. किशोर यामध्ये थोरले. गावच्या शाळेतच त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. पुढे शाळेत ते नापास झाले. शिक्षणात आपल्याला काही ‘राम’ नाही हे त्याने ओळखले. घरचा आर्थिक भार कमी व्हावा म्हणून काम करावं यासाठी ते मुंबईला आले. वय होते अवघे १४ वर्षे. त्याचे बाबा, अशोकराव मुंबईतच नोकरी करत होते. एका कंपनीत किशोरला नोकरी मिळाली. पगार होता अवघे ७२५ रुपये.


कामावरुन घरी आल्यावर किशोर यांच्याकडे भरपूर वेळ असायचा. हा वेळ आपण योग्य गोष्टीत गुंतवला पाहिजे, हे त्यांनी मनोमन पक्कं केलं. ते कामावरुन आले की, एक बाकडे घेऊन बसत. चणे, शेंगदाणे, कुरमुरे एवढंच काय अगदी उकडलेली अंडीदेखील ते विकू लागले. त्यानंतर वाहन तयार करणार्‍या ‘महिंद्रा’च्या कार्यालयात ते सुविधा कर्मचारी म्हणून काम करु लागले. याच दरम्यान किशोर यांना एक संधी मिळाली, दक्षिण आफ्रिकेत नोकरी करण्याची. तिथे ते वाहनचालकाची नोकरी करु लागले. इंग्रजीचा गंध नाही, तंत्रज्ञानाची माहिती नसतानादेखील किशोर यांनी चांगल्यापैकी नोकरी केली. या नोकरीतून खूप काही शिकायला मिळाले. विशेषत: आपला देश, आपला महाराष्ट्र किती समृद्ध आहे, येथील उद्योगाच्या अनेकविध संधी याची जाणीव झाली. आपण आपल्या देशात जाऊन व्यवसाय करायचा हा विचार मनाशी पक्का करुनच ते भारतात परतले.

२००६ साली किशोर काकडेंनी मुंबईत किराणा मालाचं दुकान सुरु केलं. या दुकानात कडधान्यापासून गृहोपयोगी सार्‍या वस्तू मिळत असत. सचोटी, प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळे काकडे या व्यवसायात स्थिरावले. अनेक ग्राहक दुकानाशी जोडले गेले. एके दिवशी त्यांच्या दुकानातील कर्मचार्‍याचा मित्र त्या कर्मचार्‍याला भेटावयास आला. त्याने त्या कर्मचार्‍याला एका संकल्पनेविषयी सांगितले. ती संकल्पना विपणन संबंधित होती. त्या कर्मचार्‍याने आपल्या मित्रास थेट काकडेंना भेटवले. काकडेंना ती संकल्पना आवडली. त्या संकल्पनेत एक व्यावसायिक कार्यप्रणाली दिसली. ही कार्यप्रणाली जर प्रत्यक्षात अंमलात आणली तर समाजात क्रांती घडेल असे त्यांना वाटले. मात्र, त्यासाठी पूर्ण वेळ देणे आवश्यक आहे हेसुद्धा त्यांना कळले. ही कार्यप्रणाली राबविण्यासाठी त्यांनी स्वत:चं दुकान बंद केलं. खरंतर ही एक मोठी जोखीम होती. मात्र, समाजहित लक्षात घेऊन काकडेंनी ती जोखीम उचलली. या विपणन कार्यप्रणालीवर विस्तृत स्वरुपाने काम करण्यास सुरुवात केली.


लोकहित असलेली आणि लोकांना आवडणारी संकल्पना गृहपातळीवर राबविण्यास त्यांनी सुरुवात केली. संकल्पनेअंतर्गत घरोघरी जाऊन त्यांनी वस्तू विकण्यास सुरुवात केली. अनेकांना ही व्यावसायिक प्रणाली आवडली. काहीजण या व्यवसायात भागीदार बनले. मात्र, प्रत्येकजण समाजहित लक्षात घेऊनच व्यवसाय करेल असे नाही. त्यातील काही भागीदारांनी सामाजिक हिताकडे दुर्लक्ष केले. परिणामी, व्यवसायात तोटा होऊ लागला. हा व्यवसाय बंद करावा लागला. एका व्यावसायिक उंचीवरुन काकडेंना जमिनीवर यावे लागले.

मध्यंतरी काही काळ गेला. खर्‍या अर्थाने ‘बॅडपॅच’ सुरु होता. यश साजरे करायला अनेकजण असतात. मात्र, अपयशात कोणी जवळ नसतं, याचा काकडे प्रत्यय घेत होते. मात्र, ती माऊली आपल्या लेकराच्या पाठीशी ठामपणे उभी होती. त्या माऊलीच्या हाताला एक वेगळी चव होती. त्यांच्या हातचं जेवण जेवलेला तृप्त होत असे. कसलीही लाज न बाळगता २०१५ साली काकडेंनी फुटपाथवर वडापाव विकण्यास सुरुवात केली. ‘माय टेस्ट’ या नावाने ते हे वडापाव विकू लागले. सोबत शिरा आणि उपमादेखील ते विकत. माय म्हणजे आई, माऊली. काकडें आईच्या हातची चव लोकांना आवडू लागली. अल्पावधीत ‘माय टेस्ट’ वडापाव प्रसिद्ध झाला. याच काळात विपणन क्षेत्रातील त्यांचे मित्र त्यांना भेटले. पुन्हा त्यांनी व्यवसाय सुरु करावा, अशी त्यांनी विनवणी केली. एक वडापाव आपण एवढ्या प्रभावी विकू शकतो, तर तो व्यवसाय आपण पुन्हा शून्यातून उभारु शकतो, याची काकडेंना खात्री पटली. हाच त्यांच्या आयुष्यातील ‘टर्निंग पाईंट’ ठरला.


दि. १ एप्रिल २०१९ रोजी ‘काक इकॉनॉमिक मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. समाजातून अनेक उद्योजक घडले पाहिजे, हा विचार त्यामागे होता. संकल्पना सुस्पष्ट होती. एखादं उत्पादन तयार होते तेव्हा त्याची किंमत अत्यंत कमी असते. मात्र, आकर्षक वेष्टन, उत्पादक ते गोदाम मग तेथून घाऊक विक्रेता त्यानंतर किरकोळ विक्रेता अशी एक साखळी तयार होते. यामध्ये जाहिरातीचा आणि दळणवळणाचा खर्च मिळून ती मूळ वस्तू शेवटच्या व्यक्तीस म्हणजेच ग्राहकास प्रचंड महाग किंमतीत मिळते. येथेच थेट विक्रीची संकल्पना उदयास आली. या थेट विक्रीच्या संज्ञेवर आधारित काकडेंच्या ‘काक इकॉनॉमिक प्रायव्हेट लिमिटेड’ने ‘महाराज्य कार्ड’ सुरु केले.

‘स्वराज्य’ ही शिवाजी महाराजांची संकल्पना. इतर राजांसारखं फक्त एक साम्राज्य उभारणं एवढ्यापुरतंच ते मर्यादित नव्हतं, तर रयतेला सुखी-समृद्ध करण्याची संकल्पना या स्वराज्यात होती, जी महाराजांनी प्रत्यक्षात आणली. महाराजांना आणि स्वराज्याला आदर्शस्थानी मानून काकडेंनी ‘महाराज्य’ हे कार्ड विकसित केलं. या कार्डांतर्गत सदस्यत्व घेणार्‍या व्यक्तीस कारखान्यात उत्पादित होणार्‍या दरात वस्तू मिळतात. गेल्या दीड वर्षांत २५ हजारांच्यावर सदस्यांनी या ‘महाराज्य कार्डा’चा लाभ घेतलेला आहे. तसेच या वस्तू वितरीत करण्यासाठी दुकानांची श्रृंखला उभारण्याचा काकडेंचा मानस आहे. कोणतीही व्यक्ती या दुकानाच्या माध्यमातून उद्योजक म्हणून उभी राहू शकते. वांद्रे ते विरार, दादर, ठाणे, पनवेल, कोकण आणि सातारा या ठिकाणी ‘महाराज्य कार्ड’चा विस्तार झालेला आहे. या संपूर्ण प्रवासात किशोर काकडेंच्या पत्नी मंदाकिनी काकडेंनी मोलाची साथ दिली. क्रिश आणि कृपा अशी दोन गोंडस मुलं त्यांना आहेत.

 

‘काक माय स्टोअर’, ‘काक माय एंटरटेन्मेंट’, ‘काक माय ट्रॅव्हल्स’ आणि ‘काक माय हॉटेल्स’ या सेवा या वर्षी सुरु होणार होत्या. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्या प्रतीक्षेत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या सेवा लोकांच्या सेवेत रुजू करण्याचा काकडेंचा मानस आहे. ‘माय’ म्हणजे आई. जी महागाईसोबत दोन हात करत घर सांभाळते. महागाईमुळे तिची होणारी ओढाताण आपण प्रत्येकजण पाहतो. तिची महागाईपासून सुटका व्हावी आणि तिला मूळ किमतीत वस्तू मिळाल्यास तिच्या बजेटमध्ये तिला घर उत्तमरीत्या सांभाळता येईल. स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देता येईल. कागदाच्या नोटरुपी लक्ष्मीला आपण भारतीय पूजतो. पण, आपल्या घरातील आई, बहीण, पत्नी, मुलगी यांनादेखील योग्य तो मान दिला गेला पाहिजे, या सामाजिक उद्देशाने हा समाज उद्योजक झटत आहे. गांधीजींनी नेहमी शेवटच्या माणसाचा विचार केला होता. ‘अंत्योदय’ हा शब्द त्यामुळेच रुजू झाला. किशोर काकडेंसारखे समाज उद्योजक खर्‍या अर्थाने गांधीजींचे विचार खोलवर रुजवत आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.