महाराष्ट्रातली पहिली महिला चर्मवाद्य उद्योजिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2020   
Total Views |

p_1  H x W: 0 x


बंगळुरू येथील जगातील एक बलाढ्य अशा कंपनीचं, विप्रोचं सभागृह. विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या त्या सभागृहात आपल्या सातार्‍याची कन्या आपल्या उद्योगाविषयी बोलत होती. डिजिटल साक्षरतेविषयी व्याख्यान देत होती. ते सगळे विद्यार्थी उच्चशिक्षित. ही अवघी दहावी झालेली, ते पण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून. तिचे व्याख्यान संपले आणि एखाद्या अभिनेत्रीची स्वाक्षरी घेण्यासाठी जशी झुंबड उडते तशी झुंबड उडाली. जो तो तिचा ‘ऑटोग्राफ’ घेऊ लागला. तिच्याबरोबर सेल्फी काढू लागला. आपल्या कर्तृत्वाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी ती उद्योजिका म्हणजे सातार्‍याच्या रुपाली तानाजी शिंदे, आदित्य म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या संचालिका.


‘सातारा ते बंगळुरू व्हाया पुणे’ हा प्रवास रुपाली शिंदेसारख्या ग्रामीण भागातील उद्योजिकेसाठी तसा प्रचंड मोठा आहे आणि वाटतो तितका सोप्पादेखील नाही. बंगळुरूच्या या व्याख्यानासाठी त्या पहिल्यांदा विमानप्रवास करत होत्या. अशाप्रकारे विमानाने प्रवास करणार्‍या त्या कदाचित त्यांच्या भागातील पहिल्याच स्त्री. त्या जिथून आल्या तो भाग मुळातच अवर्षणग्रस्त. पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं. पाणी नसल्याने शेती नाही. परिणामी, हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही अशी परिस्थिती. सुदैवाने रुपाली लग्न होऊन ज्या घरी आली, त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता, चामड्याच्या पर्स तयार करण्याचा. सारं कुटुंब या व्यवसायात गुंतलेलं. दहावी शिकत असतानाच रुपालीच्या वडिलांनी, तुकाराम सोनावणेंनी तिचं लग्न तानाजी पांडुरंग शिंदेसोबत लावून दिले. तेव्हा रुपाली अवघ्या १४ वर्षांची होती. सासरी बर्‍यापैकी सुबत्ता होती. पर्स तयार करण्याच्या कामाला बायका यायच्या. १०० रुपये त्यांना रोजंदारी मिळायची. त्यावेळेस गृहिणी असलेल्या रुपालीच्या मनात यायचं की आपण असे पैसे कधी कमावणार? आपण व्यवसाय कधी करणार?


कालांतराने रुपालीला प्रणाली आणि आदित्य अशी दोन मुले झाली
. मुलं मोठी होत होती. आपण आपलं काहीतरी सुरू करावं, असं सतत डोक्यात होतं. पण नेमकं काय ते सुचत नव्हतं. एकदा कुटुंबासोबत रुपालीताई जेजुरीच्या मंदिरात गेल्या होत्या. तिकडे त्यांनी ढोल, डमरू, खंजिरी अशी चर्मवाद्ये विकताना पाहिली. अशाप्रकारची चर्मवाद्ये आपण विकली तर? विचार चमकून गेला. आपल्या पतीला त्यांनी ही कल्पना सांगितली. तानाजीरावांनीदेखील आनंदाने होकार दिला. तानाजीराव माणदेशी महिला सहकारी बँकेत रुपालीच्या नावाने पैसे जमा करत. ते जमा केलेले पैसे आणि बँकेकडून काही कर्ज घेऊन भांडवल उभं राहिलं. चर्मवाद्य तयार करणारे दोन कारागीर आणले. मात्र, हे कारागीर चर्मवाद्य कसं बनवायचं, ते शिकवतच नव्हते. दोन महिन्यांनी ते कारागीर काम सोडून गेले.


“बस झाला व्यवसाय, कच्चा माल विकून पैसा परत मिळवूया,” असं तानाजीराव म्हणाले. कारण चर्मवाद्य बनवायला कुणालाच येत नव्हतं. दरम्यान, रुपालीताई माणदेशी बँकेच्या चेंबर ऑफ कॉमर्समध्ये जायच्या. तिथे त्यांना उद्योगाचं बाळकडू मिळालं. जगात अशक्य असं काहीच नाही. हे त्यांनी मनात पक्क केलं. त्यांनी स्वत:हून परत प्रयत्न केले आणि सहा महिन्यांत चर्मवाद्य बनविण्यास त्या शिकल्या. सुरुवातीला एका बाईला सोबत घेऊन आदित्य म्युझिक इन्स्ट्रुमेंट सुरू केलं. सहा महिन्यांत तीन महिलांना सोबत घेतलं. आज आदित्य म्युझिक इन्स्ट्रुमेंट १० महिलांना रोजगार देते. ढोल, डमरू, खंजिरी, ढोलकी, तबला, हलगी अशाप्रकारची विविध चर्मवाद्ये आदित्य म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये तयार होतात. अगदी ५० रुपयांपासून ते ५ हजार रुपये या दरात ही वाद्ये मिळतात. मागच्या वर्षी ‘माणदेशी महोत्सवा’त त्यांची हलगी एकाने जास्त किंमत देऊन खरेदी केली होती. ही हलगी आता अमेरिकेत पोहोचली आहे. अशा प्रकारे चर्मवाद्ये तयार करून विकणार्‍या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उद्योजिका होत.


कोणतीही गोष्ट आत्मसात करण्याच्या याच गुणामुळे
‘माणदेशी फाऊंडेशन’मध्ये त्यांनी डिजिटल साक्षरतेचे धडे गिरवले. काहीच दिवसांत त्या एवढ्या निष्णात झाल्या की, त्यांना डिजिटल साक्षरता प्रकल्पाच्या प्रमुखपदी नियुक्त केलं गेलं. दिवाळीनंतर त्या ‘अ‍ॅमेझॉन’, ‘सहेली’वर आपली उत्पादने विकू लागल्या.


ग्रामीण भागातील महिलांना एटीएम वापरता येत नाही
, नेटबँकिंग तर दूरची गोष्ट. रुपालीताईंनी पाच हजारांहून अधिक महिलांना एटीएम कसं वापरायचं, ऑनलाईन पेमेंट कसं करायचं याचं प्रशिक्षण दिलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकार्‍यांनादेखील त्यांनी डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण दिले आहे. ‘दि कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ या भारतीय उद्योजकीय शिखर संस्थेने भारतातील ३०० महिला उद्योजकांची चाचणी घेतली. त्यातून अठरा महिला उद्योजकांची पुढील टप्प्यासाठी निवड झाली आहे. या १८ महिला उद्योजकांमध्ये रुपाली शिंदे यांचा समावेश आहे. येत्या काही महिन्यात अंतिम निवड होणार आहे.


त्यांच्या या संपूर्ण उद्योजकीय प्रवासात त्यांचे पती तानाजीराव
, मुलगी प्रणाली आणि मुलगा आदित्य यांनी मोलाची साथ दिली. सोबतच सासरच्या मंडळींनीदेखील नेहमीच पाठिंबा दिला. ‘माणदेशी फाऊंडेशन’ मुळेच आपल्यातली उद्योजिका घडली, असे त्या प्रांजळपणे कबूल करतात.


प्रतिकूल परिस्थितीला पाहून गर्भगळीत व्हायचं की जगात अशक्य असं काहीच नाही
, हे लक्षात ठेऊन झोकून देऊन परिस्थिती अनुकूल करायची. हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. रुपाली शिंदेंनी दुसरा पर्याय निवडला आणि आज त्या आत्मविश्वासाने जगाला सामोरे जात आहेत. रुपाली शिंदेंच्या या जिद्दीला सलाम!

@@AUTHORINFO_V1@@