समानतेचा मंत्र जपू या...!

    दिनांक  08-Jan-2020 21:05:59
|

p_1  H x W: 0 xसं गच्छध्वं सं वदध्वं सं

वो मनांसि जानताम्।

देवा भागं यथा पूर्वे सं जानाना उपासते ॥

(ऋग्वेद-10/191/2)


अन्वयार्थ

(यथा) ज्याप्रमाणे (पूर्वे) पूर्वीचे, प्राचीन व पूर्ण ज्ञानी (देवा:) विद्वान दिव्य महापुरुष (सं जानाना:) उत्तम प्रकारे जाणत, ज्ञानग्रहण करीत (भागम्) यजन करण्यायोग्य परमेश्वराची (उपासते) उपासना व भक्ती करीत असत, त्याचप्रमाणे (व:) तुम्हां सर्व (जानताम्) ज्ञानी विद्वान लोकांचे आचरण असावे. तसेच त्याच्याप्रमाणे तुम्ही (सं गच्छध्वम्) समानतेने, एकमेकांसोबत चालत राहा, (सं वदध्वम्) एकसारखे बोला आणि सर्वांची (मनांसि) मने सुद्धा (सम्) एक समानच ठेवा.विवेचन

वेदांनी समग्र सृष्टीतील मानव समूहाला आदर्श अशी समान न्यायव्यवस्था प्रदान केली आहे. जगात आम्ही सर्व लोक एकसारखे आहोत. आम्हांत कोणतेही भेदभाव नाहीत. ‘अज्येष्ठासो अकनिष्ठासो एते’ आपल्यात कोणीही मोठा नाही की छोटा! आपण सर्व एकाच कुटुंबातले एकसमान बांधव! देशोदेशींच्या विद्वान व विचारवंतांनी निर्मिलेल्या राज्यघटना कदाचित काही प्रमाणात संकीर्ण वा सदोष असू शकतील, पण विश्वनिर्मात्या भगवंताचे आद्य असे ‘वेद संविधान’ मात्र कदापि पक्षपाती असू शकणार नाही. ऋग्वेदाची दहा मंडळे आणि त्यातील असंख्य ज्ञान-विज्ञान परक सूक्तांनी विभिन्न विषयांवर मानवाला सम्यक् दिशा दिली आणि जाता-जाता शेवटच्या ‘संगठण सूक्ता’त मात्र समानतेचा अद्भुत व अपूर्व असा मौलिक उपदेश जगाला बहाल केला.


वैदिक ऋषींना मानवांच्या अल्पज्ञतेची जाणीव असावी. समग्र ज्ञानाची उपलब्धता लाभून सर्व सुखाचा उपभोग घेता-घेता तो आपल्या मतवैभिन्नतेमुळे आपसांत भांडू लागले. काम-क्रोध-लोभ-मोहादी षड्रिपूंना बळी पडून माणसा-माणसांमध्ये संघर्ष उद्भवू शकेल. एकाच भूमातेची सर्व लेकरे, पण आपल्याच आईच्या देहाचे विभाजन करून छोट्या-छोट्या देश व प्रांताच्या तुकड्यांमध्ये विभक्त झालेला मानव आपल्या स्वार्थापोटी एक-दुसर्‍याविरुद्ध शस्त्रास्त्रे उगारू शकेल, याच जाणिवेपोटी त्यांना एकसमान राहण्याकरिता प्रबोधनाची गरज आहे. ही दूरदृष्टी ठेऊनच परमोच्च बुद्धीचे सामर्थ्य लाभलेल्या ऋषींनी वरील मंत्राद्वारे सार्वकालिक व सार्वजनिक असा अमृतोपम उपदेश केला आहे.


ऋग्वेदाचे शेवटचे संघटन सूक्त हे वैश्विक एकात्मता, समानता व एकजुटीचे महत्त्व कथन करते. यात आलेले एकूण सहा मंत्र हे सर्वांना एकत्र राहून एकविचाराने जगण्याचा संदेश देतात. प्रस्तुत दुसर्‍या मंत्रात आपल्या मती, उक्ती व कृती यांना एकाच समान शृंखलेत बांधून टाकतात. एकत्वाच्या समान सूत्रांमध्ये बंदिस्त झाल्याशिवाय एकजूट वाढणार नाही. आपले विघटन हे आपल्या र्‍हासास कारण ठरणारे आहे. जगातील मानवसमूहाच्या अधोगतीच्या मुळात असते ती आपसातील फूट. महाभारतात कौरव-पांडव आपसांत लढले. यादव कुळ भांडणातच संपले. तेव्हापासून ‘यादवी’ हा शब्द प्रसिद्ध झाला. नंतरदेखील पृथ्वीतलावरील देशोदेशींमध्ये घडलेल्या विनाशकारी भयंकर युद्धांमुळे मानवजातीचा संहार घडून आला. या सर्व विनाशलीला थांबविण्याकरिता वरील वेदोक्त मंत्र सर्वाधिक प्रभावी ठरणारा आहे. पूर्वी अगदी महाभारतापर्यंत समग्र वसुंधरा हीच एक राष्ट्र स्वरूपात होती. सर्वत्र मानवतेचे अधिराज्य होते. भूमंडळातील असंख्य राजे पुण्यभू भारतवर्षाचे मांडलिक होते. हा पवित्र देश सर्वांच्या गुरुस्थानी होता. गुण-कर्म-स्वभाव वैशिष्ट्यांनुसार वर्णव्यवस्था आणि वृत्ती व वयोमानानुसार आश्रमव्यवस्था चालत होती. राजा हा ईश्वरांचा प्रतिनिधी बनून प्रजेचे पुत्रवत् पालन करीत असे. सदाचारसंपन्न अशा उच्च कोटीच्या तपाचरणी विद्वान ऋषी-मुनींच्या आज्ञेत राहून राजा आपले सुशासन चालवित असे. याचे एकमेव कारण म्हणजे ‘देवा भागं यथा पूर्वे संजानाना उपासते।अर्थात् दिव्य गुण धारण करणारे ते सर्व विद्वान लोक विवेकशील होते. आपली सर्व कामे ज्ञानपूर्वक करीत असत. त्यांच्यात कधीही भेदभावनांच्या वाईट वृत्ती नव्हत्या. त्यांची मने स्वच्छ व उदार होती. म्हणूनच ‘वसुधैव कुटुम्बकम्।’ किंवा ‘यत्र विश्वमेकनीडम्’ हा महदाशय त्यांच्या विचारांमध्ये दडला होता. ‘हे हृदयेचि ते हृदयी।’ अशा विशाल विचारसुमनांचे ते फुलणारे मळे होते. त्यांचेच अनुकरण युगानुयुगे करणे इष्ट आहे.


माणूस हा समाजशील प्राणी आहे
. माणसांत आणि इतर पशू-प्राण्यांत हाच भेद आहे. जनावरांना समाज नसतो. त्यांना समानतेने चालण्या-बोलण्याची आचारसंहिता नसते. त्यांना फक्त समज असते. पण, माणसात ‘समज’ व ‘समाज’ या दोन्ही गोष्टी आढळतात. जेव्हा तो या दोन्हींपासून दूर जाईल, तेव्हा भर्तृहरींनी म्हटल्याप्रमाणे- ते मर्त्यलोके भुविभारभूता: मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति। या मर्त्यलोकी केवळ भूमीला भार (ओझे) बनून ते मानवी आकृतीतले पशू रूपाने विचारतात.


मंत्रातील पहिल्या चरणात तीन आज्ञार्थक वाक्ये आली आहेत
. ‘सं गच्छध्वं, सं वदध्वं आणि सं मनांसि।’ मानवांनो! तुम्ही सर्वांच्या सोबत समान गतीने चाला. सर्वांसोबत एकाच सत्य वाणीने बोला आणि एकाच पवित्र मनांचे व्हा. तुमच्या चालण्यात, बोलण्यात आणि मनात एकवाक्यता हवी! याला आपण सरळ व विपरीत क्रमाने देखील घेऊ शकतो. ‘कृती-उक्ती-मति’ किंवा ‘मति-उक्ती-कृती’ जगातील प्रत्येक मानवाच्या या तिन्ही बाबी एकसमान बनल्यास युद्धे कशाला होतील? एकत्वाच्या अखंड धाग्याने जेव्हा आम्ही बांधले जाऊ, तेव्हा हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख, पारशी किंवा त्याही पलीकडे जाती-उपजातीच्या भिंती कोसळतील. मनामनातील अशा क्षुद्र भेदभावनांचे मळभ नाहीसे होईल. ‘सं गच्छध्वम्।’ म्हणजे एका चालीने चला, एका दिशेने ध्येयपंथाकडे पावले टाका, एकाचेही पाऊल मागे-पुढे पडता कामा नये... कुटिल मार्गाचा अवलंब नको. आमची तोंडे एकाच दिशेने आणि पावलेदेखील एकाच मार्गावरती असावीत, तरच कृतिशीलतेची ही समानता सफल ठरते. सर्वांच्या मुखात एकवाक्यता हवी. एकच विचार आणि एकच उद्घोष! एकच गाणे आणि एकसमान तराणे.


एकच भाषा
, एक बोली, एकच मंत्र आणि एकच संकल्प. शेवटी म्हटले आहे-’सं मनांसि’ म्हणजेच एका मनाचे, एका दिलाचे व्हा. जोपर्यंत आमची मने एक होणार नाहीत, तोपर्यंत चालण्या-बोलण्यात तफावत राहणारच. घर, कुटुंब, गाव, समाज, देश आणि शेवटी वैश्विक स्तरावर दु:ख आणि अशांतता पसरते, ती मनात उद्भवणार्‍या वैचारिक मतभिन्नतेमुळे. याकरिता मनाच्या एकत्म भावनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कारण, चांगली किंवा वाईट वृत्तीची सुरुवात ही अगोदर मनातूनच होत असते. बीज हे मनरूपी भूमीतून अंकुरते व नंतर वाणी व कृतीद्वारे फलिभूत होते. मग ‘मूले कुठार.. नैव पत्रं नैव शाखा।’ म्हणजेच मुळावरच घाव घातल्यास वृक्षच उगवणार नाही! मनातून वाईट विचारांना दूर केल्यास अशुभ वाणी व अनिष्ठ कर्मांना थारा उरणार नाही. याकरिता मनातील दुर्भाव आणि भिन्नता दूर व्हावयास हवी. ‘सं वो मनांसि’ अर्थात् तुमची मने एकसमान होवोत, हा मूलमंत्र केवळ माणसा-माणसालाच नव्हे तर जगाला एकसंध जोडणारा आहे. एकसमान विचारांअभावी मने दुभंगतात आणि हीच संघर्षाची नांदी ठरते. नेमके इथेच तर जगाचे चुकले आहे. आम्ही जागतिक शांतता, सहिष्णूता आणि सुखसमृद्धी प्रस्थापित करण्याच्या गोष्टी करतो आणि मनामनात विस्कटलेल्या खंडप्राय वस्त्रांचा बाजार थाटतो. यामुळे काय आपले इष्टित साध्य होईल? सद्यस्थितीत केवळ भारतालाच नव्हे, तर भूतलावरील सर्व देशांना सर्वांगीण प्रगतीकरिता या संघटन वृद्धी मंत्रातील महान आशय धारण करण्याची गरज आहे.

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.