भक्तिमार्गाच्या मर्यादा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2020
Total Views |

pp_1  H x W: 0



रामदासांनी आपल्या संप्रदायाचे वैशिष्ट्य पुढील ओवीत स्पष्ट केले आहे.

“साह्य आम्हांसि हनुमंत ।

आराध्य दैवत श्रीरघुनाथ।

गुरू श्रीराम समर्थ। उणे काय दासासी॥

समर्थांनी पारमार्थिक हेतूने आपल्या संप्रदायाची उभारणी केली. धर्मरक्षण हा त्यांचा मुख्य हेतू होता. त्यासाठी धर्मउच्छेदक दुष्ट दुर्जनांचा नाश आणि त्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना, ही त्यांची उद्दिष्टे होती. रामदास मूलत: भक्तिमार्गी संत होते. त्यासाठी महाराष्ट्रातील एकंदर भक्तिमार्गाचा आढावा घेणे उपयुक्त ठरेल.


भक्तिमार्गातून मनाला शांती
, समाधान मिळते व प्रपंच सुरळीत पार पाडता येतो. महाराष्ट्रातील समाजात काही भक्तिप्रकार पिढ्यान् पिढ्या चालत आलेले आहेत. महाराष्ट्रीय समाजात भक्तिमार्ग हा प्रामुख्याने असला तरी अध्यात्म तत्त्वज्ञानाच्या बाबतीत महाराष्ट्राने नेहमी समन्वयाची भूमिका स्वीकारलेली आहे. प्रत्येकाने आपापल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे व आवडीच्या दैवताप्रमाणे भक्तिपंथाची निवड केलेली दिसून येते. हे निवडीचे स्वातंत्र्य प्रत्येकाला होते. त्यामुळे एका संप्रदायाचा स्वीकार करून अन्य भक्तिसंप्रदायाचे तत्त्वज्ञान आचरणात आणलेल्यांची अनेक उदाहरणे दाखवता येतील. येथे विविध दैवतांना मान्यता आहे. त्यानुसार पंथ निर्माण झाले. त्यात प्रामुख्याने मोठा पंथ हा विठ्ठलभक्तीचा आहे. त्याला ‘भागवत संप्रदाय’ असे म्हणतात. या पंथात बहुजन समाजाचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे. हे भक्त नियमितपणे वर्षातून दोनदा आपले दैवत विठोबा माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. या संप्रदायाला ‘वारकरी पंथ’ म्हणूनही ओळखले जाते.


महाराष्ट्रात मान्य झालेला आणखी एक संप्रदाय म्हणजे दत्तावतार नृसिंहसरस्वती यांच्या प्रभावातून निर्माण झालेला
दत्त संप्रदाय’. या संप्रदायात प्रामुख्याने ब्राह्मणवर्गाचा समावेश आहे. या संप्रदायात संन्यासप्रवण शुचिर्भूततेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने सर्वसामान्य त्याकडे ‘कर्मठपणा’ म्हणून पाहतात. तसेच खंडोबा या दैवताला मानणारा एक संप्रदाय महाराष्ट्रात आहे. या पंथात प्रामुख्याने लढवय्या जमातीच्या लोकांचा जास्त भरणा होता. तेराव्या शतकात चक्रधरांनीही ‘महानुभव’ पंथाची स्थापना करून धर्मविचार व आचार लोकभाषेत मांडण्याचा प्रयत्न केला. तथापि, हा पंथ संन्यासप्रवण व आत्यंतिक निवृत्तीवादी झाल्याने तो फार काळ बहुजन समाजात स्थिरावला नाही. महाराष्ट्रात सर्वात मोठा स्थिरावलेला व वाढलेला पंथ म्हणजे वारकरी पंथ म्हणजेच भागवत संप्रदाय. त्यातील विठ्ठल उपासनेचा मूळ प्रवर्तक पुंडलिक मानला गेला आहे. तरी वारकरी भक्तिसंप्रदायाला ज्ञानदेवांनी खर्‍या अर्थाने सामाजिकदृष्ट्या कार्यप्रवण केले, असे म्हणावे लागेल.


ज्ञानेश्वरांचे आयुष्य अवघे २१ वर्षांचे होते
. त्यांनी इ. स.१२९६ मध्ये समाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी या अल्पायुष्यात महाराष्ट्र संस्कृतीचा पाया भरण्याचे महत्कार्य केले आहे. भागवत धर्माच्या झेंड्याखाली सर्वांना सामावून घेण्यात ज्ञानेश्वरांनी क्रांतदर्शित्व दाखवले. महाराष्ट्रातील हे पंथ समावेशक प्रवृत्तीचे होते. खंडोबाचे उपासक असलेले अनेक मराठा लढवय्ये वारकरी पंथात येऊन विठ्ठलाची उपासन करीत. त्यात गैर काही नव्हते. दत्तसंप्रदायातील अनेक ब्राह्मणांचे कुलदैवत खंडोबा होते. एकनाथ हे गुरुपरंपरेतून दत्तसंप्रदायी पण, भागवतधर्माच्या प्रचारासाठी त्यांनी महान कार्य केले. ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत एकनाथांनीच तयार केली. ज्ञानेश्वरांना गुरू निवृत्तीनाथांकडून नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली होती, तरी ज्ञानदेवांचे जीवितकार्य वारकरी संप्रदायासाठी पायाभरणीचे ठरले (ज्ञानदेवे रचिला पाया). भारतीय परंपरेनुसार सर्वसमावेशक व समन्वयाची भूमिका या पंथांनी मान्य केल्याने महाराष्ट्रात पंथीय वा सांप्रदायिक झगडे झाले नाहीत. दैवते भिन्न असली तरी भक्ती एकच होती. एका पंथाने दुसर्‍या पंथाचा तिरस्कार कधी केला नाही. याउलट एकमेकांविषयी आदर बाळगला.


परंतु
, नंतर महाराष्ट्रावर उत्तरेकडून मुसलमानांचे फार मोठ्या प्रमाणावर आक्रमण झाले. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते, विचारी पुरुष, धार्मिक संघटक हादरून गेले. ते दिग्मूढ झाले. या आक्रमकांचा उद्देश राजकीय प्रदेश काबीज करण्याबरोबर इस्लामच्या प्रचाराचाही होता. त्यामुळे हिंदू मंदिरांची, त्यातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड, हिंदूंची कत्तल, लूटालूट, स्त्रियांची विटंबना या अपप्रवृत्तींना ऊत आला. कसल्याही नीती न्यायाची चाड नसलेले जुलमी म्लेंछ आक्रमक केव्हा घात करतील, याचा नेम राहिला नाही. या आक्रमणाचा रेटा एवढा जबरदस्त होता की, हिंदू धर्म टिकून राहतो की नाही, अशी शंका निर्माण होऊ लागली. या आपत्तीतून हिंदू संस्कृतीला, आचारांना संतांनी प्रतिपादलेल्या भक्तिपंथाने वाचवले, असे अभ्यासकांचे मत आहे.


मराठी संतांवर अनेकदा टीका करणारे गाढे अभ्यासक वि
. का. राजवाडे यांनीही संतांच्या भक्तिपंथाचे ऋण मान्य केले आहे. राजवाडे लिहितात, “जर भरतखंडात व महाराष्ट्रात त्याकाळी भक्तिमार्ग नसता तर अफगाणिस्तान, इराण वगैरे देशांतल्याप्रमाणे या देशातील सर्व प्रजा एकवर्णी मुसलमान झाली असती व आर्यसंस्कृती, आर्य सारस्वत, आर्य समाजरचना, आर्य चातुर्वर्ण्य, आर्यशील या जगतातून समूळ उच्छिन्न झाले असते. इराणातील सर्व प्रजा मुसलमान झाली असता, पाच चारशे पारशी अवेस्ता घेऊन जसे भरतखंडात पळून आले, तसा शोचनीय प्रकार झाला असता. कदाचित त्याहूनही भयंकर झाला असता. बिचार्‍या निराश्रित पारशांना आश्रय देण्यासाठी आपले सात्त्विक भरतखंड तरी होते. पारशांच्यासारख्या स्थितीत आपल्याला पृथ्वीच्या पाठीवरील कोणते खंड सापडले असते? भक्तिखंड हे एकच खंड राहिले होते. त्याकडे साधुसुकर्णधारांनी आपल्याला कारूणिक बुद्धीने नेले व बहुमोल आर्यसंस्कृतीचा बचाव केला.” या शब्दांत राजवाडे यांनी संतांच्या भक्तिपंथाचे कौतुक केले आहे.


मुसलमानांच्या या आक्रमक झंझावाताला रोखण्यासाठी धैर्यवान
, विचारवंत व समाजावर छाप पाडणार्‍या नेतृत्वाची आवश्यकता होती. राजपुतांनी काही काळ या झंझावाताशी झुंज दिली. कर्ते पुरुष मारले गेल्यावर तेथील स्त्रियांनी जोहार केले तरी दुष्ट यवनांचा ते पूर्णपणे बिमोड करू शकले नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर या आक्रमणाच्या झळा महाराष्ट्राने सोसल्या. रामदासांनी ‘रामदासी पंथ’ हा भक्तिमार्गी पंथ स्थापन केला, तरी त्यांनी परंपरागत चालत आलेल्या भक्तिमार्गाच्या मर्यादा ओळखल्या होत्या. या भक्तिमार्गाचा स्वीकार करून ज्यांना नीती-न्यायाची चाड नाही, अशा जुलमी म्लेंछ आक्रमकांचा प्रतिकार करणे शक्य नव्हते. त्यासाठी सशस्त्र आक्रमक प्रतिकाराची शिकवण समाजाला देणे जरूरीचे होते. एकंदर परिस्थितीचा अभ्यास करून रामदास या निर्णयाप्रत आले होते.


इकडे शिवाजी महाराजांनी मोगल सुलतानशाही विरुद्ध बंड उगारून नवचैतन्य निर्माण केले व हिंदवी स्वराज्याची घोषणा केली
. भक्तिपंथाने लोकात सर्वांभूती भगवद्भाव निर्माण केला होता. त्यांना त्यातून एक प्रकारचे आत्मिक बळ मिळत होते. छळ करणार्‍या दुष्टांना हार न जाता आत्मार्पण करण्याचे वेगळे सामर्थ्य भक्तांच्या ठिकाणी येत होते. पण त्यातून काही कार्यभाग साधत नव्हता. छळ करणार्‍या दुष्टांना कायमचे संपवण्याचे सामर्थ्य हा भक्तिमार्ग देऊ शकत नव्हता. क्वचित प्रसंगी संकटाचे निवारण झाल्याच्या कथा सांगितल्या जातात. सेना व्हावी, दामाजीपंत अशा संतांच्या विठ्ठलभक्तीच्या कथा समाजात प्रचलित आहेत. विठ्ठलाने या भक्तांना संकटातून वाचवले. या कथा जरी खर्‍या असल्या तरी अकारण छळ करणार्‍या दुष्टांचा नायनाट करण्याचे सामर्थ्य या भक्तिमार्गात नव्हते. म्हणून आतापर्यंत चालत आलेल्या भक्तिमार्गाला रामदासांनी सशस्त्र प्रतिकाराची जोड दिली. ते तत्कालीन परिस्थितीला योग्य होते. त्यातून महाराष्ट्र धर्म सांगितला गेला. तो आपण पुढील लेखात सविस्तरपणे पाहू.

- सुरेश जाखडी

@@AUTHORINFO_V1@@