पांडवांना राधेयाची खरी ओळख

    दिनांक  08-Jan-2020 21:52:20
|

ppp_1  H x W: 0


युद्धात मृत पावलेल्या वीरांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास विदुर, संजय आणि धौम्य यांना धृतराष्ट्राने आदेश दिले. युधिष्ठिर, धृतराष्ट्र व इतर आप्तजन गंगाकिनारी आले. सोबत गांधारी व कुंतीही होत्या. द्रौपदीदेखील हजर होती. कुंतीची मनासिक अवस्था बिकट होती. राधेयाचे सारे पुत्र मारले गेले होते म्हणून त्याचे और्ध्वदेहिक करायला कुणीच नव्हते. कुंती आता गंगाकिनारी होती. तिला तो दिवस आठवला, ज्या दिवशी तिने तान्हुल्या पुत्राला, सूर्यपुत्राला एका छोट्या लाकडी पेटीमध्ये ठेवून गंगेत सोडले होते. तो तेव्हाही अनाथ व पोरका झाला होता व आताही पोरकाच राहिला, याचे दुःख तिला झाले. त्याच्यासाठी काहीतरी करावे, अशी उत्कट इच्छा कुंतीला झाली. ठाम निर्धार करून ती युधिष्ठिराजवळ आली व म्हणाली, ‘’अशी अजून एक व्यक्ती बाकी आहे, जिच्याकरिता तुम्ही धार्मिक विधी केले पाहिजेत.” युधिष्ठिराने तिच्याकडे निरखून पाहिले. भावना व रडणे दाबून ठेवल्यामुळे तिचा चेहरा कसातरीच झाला होता. डोळे लालबुंद झाले होते. युधिष्ठिराचे सर्व भाऊ पण जवळ आले. ते सर्व विचार करू लागले की, कोण असेल अशी व्यक्ती जिला सारे विसरून गेले आहेत?


युधिष्ठिर म्हणाला
, “माते, मला जेवढ्या व्यक्ती ठाऊक होत्या, त्या सर्वांचे धार्मिक विधी मी आठवणीने केले आहेत. कुणाला विसरण्याइतका मी कृतघ्न तर नाहीच. मग अशी कोणती व्यक्ती आहे, ते तूच सांग.” कुंती म्हणाली,“ती व्यक्ती म्हणजे राधेय. तू राधेयसाठी धार्मिक विधी कर.” ते ऐकून युधिष्ठिर आश्चर्याने थक्कच झाला. तो म्हणाला,“काय? तो सूतपुत्र? त्याच्याकरिता मी विधी करू? मी क्षत्रिय आहे आणि हा राधेय तर आमचा कट्टर शत्रू होता. त्याचे क्रियाकर्म करायला तू मला सांगते आहेस?” कुंतीचे हृदय दु:खाने पिळवटून निघाले. वेदनांमुळे ती अधिक बोलू पण शकत नव्हती. ती एवढंच म्हणाली, “युधिष्ठिर, तू धार्मिक विधी कर, कारण हा राधेय सूतपुत्र नव्हताच, तो क्षत्रिय होता,“ युधिष्ठिर म्हणाला, “माते, तुला राधेयाची काय माहिती आहे? मला सांग, कोण होता त्याचा पिता?”


ती म्हणाली
, “राधेय हा सूतपुत्र नसून सूर्यपुत्र होता. एक तरुण मुलीला सूर्यदेवापासून हा पुत्र झाला, परंतु त्यावेळी ती कुमारी होती. सूर्यापासूनच त्याला जन्मजात कवचकुंडले लाभली होती. जननिंदेची शिकार आपण होऊ म्हणून त्या कुमारी मातेने भीतीपोटी हे रहस्य उदरातच ठेवलं, त्या पुत्राला लाकडी पेटीत टाकून गंगेच्या प्रवाहात सोडलं आणि ती पेटी अधिरथाला मिळाली. अधिरथ व राधा यांना पुत्र नव्हता म्हणून अधिरथाने हा पुत्र राधेच्या हवाली केला. तेव्हापासून तो राधेय झाला. पण त्याची खरी माता क्षत्रिय व राजकन्या होती. तिने भीतीपोटी हा अन्याय आपल्या पुत्रावर केला. त्यानंतर तिला अनेक पुत्र झाले, पण तिच्या हृदयातील ही पोकळी तशीच राहिली.


युधिष्ठिर व सर्व पांडव हे ऐकत होते
. युधिष्ठिर म्हणाला, “माते, ही राधेयची खरी माता कोण? इतकी कशी ती हृदयशून्य? तिचा एवढा बारीक तपशील तुला कसा ठाऊक? कोण आहे ती?” कुंतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तिने सर्वांकडे पाहिले. श्रीकृष्ण पण तिथे होता. त्याच्याकडे करुणेने पाहून ती म्हणाली, “ती स्त्री अद्याप जिवंत आहे. मीच ती निर्दयी स्त्री, दुदैवी स्त्री! राधेय हा माझाच पहिला पुत्र आहे.” एवढे बोलत कुंतीची शुद्ध हरपली!


पांडवांच्या पायाखालची धरणीच जणू सरकली
. त्यांना आठवला तो शस्त्रस्पर्धेचा दिवस. त्या दिवशी कुंतीने राधेयला पाहिले होते व तिची शुद्ध हरपली होती. युधिष्ठिर दु:खाने बडबडू लागला, “मी माझ्याच भावाचा शत्रू म्हणून सतत तिरस्कार केला, त्याच्या वधाला मी कारणीभूत झालो. तो आमचा थोरला भाऊ आणि आम्ही त्यालाच ठार केलं.” अर्जुन पण धावत आला व म्हणाला, “बंधू, मी हे काय केलं? माझ्या भावाचाच वध केला.” अर्जुनही बेशुद्ध पडला. भीम आठवत होता, शस्त्रस्पर्धेच्या वेळी भीमाने त्याला ‘सूतपुत्र’ म्हणून हिणवले होते, “तुझी आमच्याशी स्पर्धा करण्याची लायकी नाही. जा, जाऊन रथ हाक. तेच तुझे कर्म आहे,” या शब्दांत राधेयला त्याने सुनावले होते. तेव्हा दुर्योधन पुढे आला होता व त्याने राधेयला अंगदेशाचे राज्य देऊन, “तो क्षत्रियच आहे,” असे म्हणाला होता. भीम हुंदके देऊन रडू लागला. नकुलाला राधेयबरोबरचे युद्ध आठवले. राधेय म्हणाला होता, “एक दिवस तुला राधेयशी लढाई केल्याबद्दल खूप आदर व अभिमान वाटेल.”


युधिष्ठिराने तर आईशी बोलणेच टाकले
. जिने एवढा अन्याय केला, त्या आपल्या आईबद्दल त्याला घृणा व तिरस्कार वाटू लागला. त्याने तिला विचारले, “हे सारे राधेयला ठाऊक होते? तो राधेय नसून कौंतेय आहे, हे त्याला माहिती होते? कृष्ण उत्तरला, “होय.” त्यानंतर कुणालाच काही बोलावेसे वाटत नव्हते. सत्य ठाऊक असूनही राधेयने आयुष्यभर अपमान सहन केला. युधिष्ठिराने तर दु:खाने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. तो एवढेच म्हणाला,“माते, तू हे असं कसं वागू शकतेस?”

(क्रमश:)

- सुरेश कुळकर्णी

 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.