वन्यजीव संशोधनातील बदलत्या वाटा....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2020   
Total Views |

tiger_1  H x W:


मुंबई (अक्षय मांडवकर) - वन्यजीव संशोधन क्षेत्रातील माहिती संकलन पद्धतींमध्ये (डाटा कलेक्शन) गेल्या 20 वर्षांमध्ये आमूलाग्र बदल घडले आहेत. या पद्धती अधिकाधिक शास्त्रीय व विश्वासार्ह निष्कर्ष देण्याच्या दृष्टीने विकसित होत गेल्या आहेत. पूर्वी वन्यजीव संशोधन म्हटले की, जंगलात भटकणे, पाणवठ्यांवर बसून वन्यप्राण्यांची नोंद करणे आणि त्यांच्या पदचिन्हांच्या आधारे संख्येचा अंदाज घेण्यापर्यंतच त्याची व्याप्ती होती. मात्र, गेल्या 10-15 वर्षांत त्यामध्ये तंत्रज्ञानाची भर पडली आहे. कॅमेरा ट्रॅप, रेडिओ कॉलर या उपकरणांमुळे वन्यजीवांसंबंधी माहिती संकलनामध्ये विश्वासार्हता निर्माण झाली. संकलित केलेल्या माहितीच्या आधारे ठोस व अस्सल निष्कर्ष काढणारे काही सॉफ्टवेअर्स विकसित झाली. त्यामुळे निष्कर्ष काढण्याच्या प्रकियेतील मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. भविष्यात वन्यजीव संशोधन क्षेत्र नानाविध तांत्रिक उपकरणांच्या आधारे प्रगत होणार असल्याचा विश्वास वन्यजीव संशोधकांनी व्यक्त केला आहे. संशोधनाकरिता ड्रोन, सेल्युलर नेटवर्क / वाय-फाय / आर्टिफिशियल इंटेलिजन्सी असलेल्या कॅमेरा ट्रॅपचा वापर वाढेल, असे ते नमूद करतात. या उपकरणांमुळे वन्यजीव संशोधकांना माहितीचे संकलन करणे अधिक सुकर व सुलभ होणार आहेच. शिवाय निष्कर्ष काढण्यामध्येही सुसूत्रता आणि विश्वासार्हता जपण्यास मदत मिळणार आहे.

 

पाणवठ्यांवरील नोंदी

वन्यजीव संशोधनाची पाळेमुळे भारतात ब्रिटिशांनीच रुजवली. ब्रिटिश संशोधकांनी वन्यजीवांच्या माहिती संकलनासाठी खास करून वन्यजीव गणनेकरिता काही पद्धती अंमलात आणल्या. भारतीय वनाधिकारी आणि संशोधक स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही काही काळ या पद्धती वापरत होते. यामध्ये जंगलात फिरून वन्यजीवांची नोंद करण्याची सहजसोपी पद्धत होती. ज्यास सद्यपरिस्थितीत अप्रत्यक्षरित्या ’सिटीझन सायन्स’ असे म्हटले जाते. पाणवठ्यावर बसून पाणी पिण्यासाठी येणार्‍या प्राण्यांची नोंद करण्याची दुसरी पद्धत त्यावेळी रुढ होती. कृत्रिम किंवा नैसर्गिक पाणवठ्यानजीकच्या झाडावर मचाण बांधायची आणि त्याठिकाणी बसून पाणी पिण्याकरिता येणार्‍या प्राण्यांची नोंद करायची, असे त्यामागील तंत्र आहे. मात्र, अशावेळी एकच प्राणी अनेकदा पाणी पिण्याकरिता येण्याची शक्यता असल्याने बदलत्या काळानुसार ही पद्धत अशास्त्रीय ठरली. आजदेखील वन विभागाकडून वन्यजीव गणनेची ही पद्धत केवळ प्रथा आणि उपक्रम म्हणून राबवली जाते. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री अनेक राष्ट्रीय उद्यानांमध्ये पाणवठ्यांवरची गणना घेतली जाते. परंतु, त्या माध्यमातून मिळालेली माहिती अशास्त्रीय असल्याचे जाहीर करण्यात येते.

रानवाटांवर उमटलेल्या वन्यजीवांच्या पदचिन्हांच्या आधारे वन्यजीवांची गणना होत असे. या पद्धतीत मातीत उमटलेल्या पदचिन्हांचे आकारमान नोंदवून आणि त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस ओतून त्याचे साचे तयार करण्यात येतात. याद्वारे प्राण्यांची गणना करण्यात येते. मात्र, ही पद्धत पुढल्या काळात अशास्त्रीय ठरल्याची माहिती वन्यजीव संशोधक निकीत सुर्वे यांनी सांगितले. कारण, प्रत्येक प्राण्याच्या पायाचे ठसे हे पाण्यात, चिखलात आणि वाळूत वेगवेगळ्या आकारमानाने उमटतात. त्यामुळे वन्यजीव गणनेच्या दृष्टीने ही पद्धत विश्वासार्ह नसल्याचे त्यांनी नमूद केले.

 
 

tiger_1  H x W: 
 
 

’प्रोटोकॉल’चे पालन

गेल्या 10 ते 15 वर्षांपासून वन विभाग आणि वन्यजीव संशोधकांकडूनही संशोधन कार्यात काही ‘प्रोटोकॉल’ पाळण्यात येत आहेत. सद्यपरिस्थितीत वन्यजीव संशोधनामध्ये ’फेस फॉर मॉनिटरिंग प्रोटोकॉल’ची अंमबजावणी होत असल्याची माहिती वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी दिली. यामध्ये चिन्ह सर्वेक्षण, लाईन ट्रान्सिट मॉनिटरिंग आणि कॅमेरा ट्रॅपिंगचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. चिन्ह सर्वेक्षणामध्ये वन्यजीवांच्या भ्रमणमार्गात आढळणार्‍या निरनिराळ्या खुणांची नोंद केली जाते. वाघ-बिबट्यासारखे मांसाहारी किंवा हत्ती-गव्यांसारख्या मोठ्या तृणभक्षी प्राण्यांच्या संशोधनाच्या प्राथमिक सर्वेक्षणावेळी चिन्ह सर्वेक्षणाचा अवलंब केला जातो. यामध्ये वाघाने वा बिबट्याने झाडाच्या खोडावर नखांनी केलेले ओरखडे किंवा त्यांच्या पायांच्या ठशांची नोंद करण्यात येते. चिन्ह सर्वेक्षणामधून निर्माण झालेल्या माहितीचे संकलन करण्यासाठी सध्या ’एम-ट्राईप्स’ या अ‍ॅपचा वापर करण्यात येत असल्याचे पंजाबी यांनी सांगितले.

लाईन ट्रान्सिट मॉनिटरिंगही पद्धत तृणभक्षी प्राण्यांची घनता मोजण्याकरिता वापरली जाते. यामध्ये जंगलातील साधारण दोन किमी परिसरात सरळ रांगेत चालत जाऊन केवळ निरीक्षण केले जाते. यावेळी आढळलेल्या तृणभक्षी प्राण्यांची नोंद करण्यात येते. शिवाय, त्या परिसरातील वनस्पती व गवतांच्या प्रजातीही नोंदविण्यात येतात. महत्त्वाचे म्हणजे, या अधिवासावर झालेला मानवी हस्तक्षेपाचा परिणामही नमूद करण्यात येतो. यानंतर प्रत्यक्षात कॅमेरा ट्रॅप लावून वन्यजीवांच्या सांख्यकीय गणनेचा अभ्यास सुरू केला जातो.

 

कॅमेरा ट्रॅपिंग

सद्यकाळात वन्यजीव संशोधन कार्यात सर्वाधिक वापरली जाणारी शास्त्रीय पद्धत म्हणजे ‘कॅमेरा ट्रॅपिंग.’ या पद्धतीमुळे वन्यजीवांची केवळ सांख्यकीय नव्हे , तर त्यांच्या बदलत्या जीवनशैलीविषयक माहिती मिळण्यासही मदत होते. ‘कॅमेरा ट्रॅपिंग’मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये महत्त्वाचे बदल झाल्याची माहिती निकीत सुर्वे यांनी दिली. ‘कॅमेरा ट्रॅपिंग’च्या सुरुवातीच्या काळात कॅमेरा लावलेल्या ठिकाणी दोरी अथवा प्रेसिंग पॅड लावले जात होते. या दोरी किंवा पॅडवर प्राण्याचा पाय पडल्यास कळ खेचली जायची आणि कॅमेरा त्या प्राण्याचे छायाचित्र टिपायचा. त्यानंतर कॅमेरा ट्रॅपच्या तंत्रज्ञानात प्रगती झाली. शरीरातील उष्णता आणि हालचाल टिपून छायाचित्र काढणार्‍या कॅमेर्‍यांची निर्मिती झाल्याचे सुर्वेंनी सांगितले. सद्यपरिस्थिती भारतातील वन्यजीव शोधकार्यात याच प्रकारचे कॅमेरा ट्रॅप वापरले जातात. मात्र, भविष्यात या तंत्रज्ञानातसुद्धा क्रांती होणार असल्याचे गिरीश पंजाबी यांनी नमूद केले आहे. काही ठिकाणी आज ’सेल्युलर नेटवर्क’ असणार्‍या कॅमेरा ट्रॅपचा वापर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये कॅमेरा ट्रॅपने काढलेले फोटो वाय-फाय जो़डून थेट संगणक वा मोबाईलमध्ये पाहता येतात. वन्यजीव संशोधकांना त्याठिकाणी प्रत्यक्षात जाऊन कॅमेरा ट्रॅपमधील मेमरी कार्ड काढून छायाचित्र पाहण्याचे कष्ट करावे लागत नाही. मात्र, भारतातील बहुतांश वनक्षेत्रात मोबाईल नेटवर्कची समस्या असल्याने या पद्धतीचे कॅमेरा ट्रॅप वापरणे कठीण असल्याचे पंजाबी म्हणाले.

 

tiger_1  H x W: 
 
 

रेडिओ कॉलरिंग

वन्यजीवांचे खास करून वाघ-बिबट्यांच्या संचारमार्गाचा अभ्यास करण्यासाठी रेडिओ कॉलरिंग ही पद्धत उपयुक्त ठरते. गेल्या सहा महिन्यांमध्ये टिपेश्वर ते ज्ञानगंगा अभयारण्य असा 1 हजार, 700 किमीचा प्रवास केलेल्या ’सी-वन’ वाघाचा ऐतिहासिक संचारमार्ग रेडिओ कॉलरमुळेच उघड झाला आहे. या पद्धतीमध्ये प्राण्याच्या गळ्याभोवती ट्रान्समीटर असलेला एक पट्टा अडकविण्यात येतो. हा ट्रान्समीटर विशिष्ट कालावधीनंतर प्राण्याच्या ठिकाणाचे संकेत (लोकेशन) उपग्रहाला पाठवतो. उपग्रहाद्वारे हे संकेत तत्सम संस्थेला मिळतात. काळानुरूप हा पट्टा झिजून वा संशोधकांनी लावलेल्या वेळेनुसार प्राण्याच्या गळ्यातून आपसूकच गळून पडतो. त्यामुळे प्राण्यास कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही. सध्या रेडिओ कॉलरिंगचा वापर हा केवळ वाघ-बिबट्यांपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. पक्षी स्थलांतराच्या अभ्यासातदेखील पक्ष्यांना ट्रान्समीटर लावण्याचा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला आहे. तसेच भारतातील एका अग्रगण्य वन्यजीव संशोधन संस्थेने महाराष्ट्रात एका खवले मांजराला ट्रान्समीटर लावून त्यांच्या भ्रमणमार्गाचा अभ्यास सुरू केला आहे.

 
 

सॉफ्टवेअर, ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सी

गेल्या वर्षी व्याघ्र गणनेचे चौथे अंदाजपत्रक जाहीर झाले. यावेळी केलेल्या व्याघ्र गणनेकरिता सक्षम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या ’डिजिटल इंडिया’ अभियानाला अनुसरून माहिती संकलनासाठी ’आर्टिफिशयल इंटेलिजन्सी’चा उपयोग करण्यात आला. मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी कॅमेरा ट्रॅपने टिपलेल्या छायाचित्रांचे संकलन ’लरढठ-ढ’ या सॉफ्टवेअरच्या आधारे करण्यात आले. त्यानंतर वाघांची अचूक संख्या मोजण्याकरिता ’एक्सट्रॅक्ट सॉफ्टवेअर’चा उपयोग करण्यात आला. या सॉफ्टवेअरने वाघांच्या शरीरावरील पट्ट्यांच्या आधारे त्यांची स्वतंत्र विभागणी केली. भविष्यात वन्यजीव संशोधनात किंवा सर्वेक्षण कार्यात ड्रोनचा वापर करण्यासंबंधी महाराष्ट्र शासन विचारात आहे. त्यांसंबंधीची माहिती वन विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी राजस्थानमध्ये जाऊन घेतली आहे.

 

tiger_1  H x W:
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@