कैलास शिखर बारामतीत येईल का?

    दिनांक  06-Jan-2020 19:55:30   
|


saf_1  H x W: 0


कृष्णाला ठार करण्यासाठी कंसाने अनेक मायावी राक्षस पाठविले. एक राक्षसीण पुतना मावशी बनून आली. असे अनेकजण आले. आपण त्यांना त्यांच्या मूळ स्वरुपात ओळखले पाहिजे. त्यांना त्यांच्याच शस्त्रांनी धुवून काढले पाहिजे. हा देश भूतकाळात कधी असहिष्णु नव्हता, आज नाही, उद्या तो कुणीही कर शकत नाही. असे काम करणे म्हणजे हिमालयातील कैलास पर्वत येथून उचलून आणून बारामतीला ठेवण्यासारखे काम आहे, केवळ अशक्य.


नरेंद्र मोदी यांचे शासन केंद्रात आल्या दिवसापासून भारतातील तथाकथित 'टॉलरन्स गँग'ने-सहिष्णुता टोळीने एक राग सातत्याने आळवण्यास सुरुवात केली. या रागाचे नाव आहे, 'उरबडवा राग' आणि हा नेहमी तारसप्तकातच गायचा असतो. हा राग गाणारे खानदानी गवई आहेत. ते सर्व काँग्रेस घराण्याचे प्रतिनिधित्व करतात. हा तारसप्तकातील राग असल्यामुळे तशाच प्रकारचे श्रोते हा राग ऐकण्यासाठी गोळा होतात. ज्यांना 'मालकंस', 'मुलतानी', 'पिलू', 'मियाकी मल्हार' इत्यादी गोड राग ऐकण्याची सवय आहे, असे श्रोते हा राग कधीही ऐकायला जात नाहीत. त्याचा वचपा हे गवई कधी भाषणे करून तर कधी लेख लिहून काढत असतात. वर्तमानपत्रे आपल्या घरी येतात. त्यासाठी पैसा मोजलेला असल्यामुळे ती वाचावी लागतात. मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या 'फ्री प्रेस जर्नल'च्या अंकात कुण्या जगदीश रत्तनानी यांचा When will this nightmare end? या शीषर्काचा लेख ३० डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाला. मी अफाट वाचन करणारा आहे, असा माझा, माझ्याविषयीचा गैरसमज या लेखकाने दूर केला. इतकी वर्षे वर्तमानपत्रे वाचतो. पण या लेखकाचे नाव २०१९ साल संपतानाच वाचायला मिळाले. एवढ्या महान लेखकाचे नाव आपल्याला माहीत नाही, कसले बोडक्याचे वाचन आपण करतो? असे मला वाटले.

 

'उरबडव्या' रागाचा उत्तम परिचय या लेखात होतो. लेखक जे काही म्हणतो, त्याचा सारांश असा- "स्वतंत्र भारताच्या काळ्याकुट्ट कालखंडात आपण जगत आहोत. आणीबाणी वाईट होती. पण आज देश आणीबाणीपेक्षाही वाईट कालखंडात चालला आहे. तो आतूनच तोडण्याचे काम चालू आहे. प्रतिकाराचा अग्नी कसा धगधगतो आहे, हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेले आहे. बुद्धिजीवींचा आवाज क्षीण झालेला आहे. सैन्यदलाचे प्रमुख राजकीय भाषा करू लागले आहेत. जम्मू-काश्मीरमधील खासदार तुरुंगात आहेत. आंदोलनकर्त्यांच्या संपत्तीवर टाच आणली जात आहे. काँग्रेसकडून सत्ता गेल्यानंतर आपल्याला बांधून ठेवणारे धागेच तोडले जात आहे. मोदी-शाह, सीएए, एनआरसी, योगी आदित्यनाथ यांच्यामुळे देशाचा कंपास भरकटलेला आहे. भारतावर संकट कोसळले आहे. ज्यांनी 'आयडिया ऑफ इंडिया' मोडीत काढण्याचे ठरविले आहे, त्यांच्या विरुद्ध उभे राहिले पाहिजे. असे जे काम करीत आहेत त्यांना माफ करता नये. आताही नाही, तर कधीही नाही." असेच दुसरे नाव शशी थरुर यांचे आहे. त्यांचा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही. तीन विवाह करण्याचा त्यांनी पराक्रम केला. तिसरी पत्नी सुनंदा संशयास्पद स्थितीत मेली. संशयाची सुई काहीजणांनी थरुर यांच्याकडे वळविली आहे. पुण्याला सप्टेंबर २०१९ला भाषण करताना त्यांनी सहिष्णुता, असहिष्णुता यावर काँग्रेस घराण्याची सुरावट चढविली. त्यांचे म्हणणे सारांश रुपाने असे- "भाजप आणि संघ परिवाराला हिंदू म्हणजे काय, हे समजलेले नाही. सत्य जसे माझ्याकडे आहे, तसे तुमच्याकडेदेखील आहे. तुमच्याकडील सत्याचा मी आदर करतो. तुम्हीदेखील माझ्याकडील सत्याचा आदर करा. हिंदू धर्माचे हे मूलतत्त्व आहे. हेच भारतीय लोकशाहीचे शक्तीस्थान आहे. दुर्दैवाने भारतातील लोक काळे आणि पांढरे अशा दोन भागात विभागले गेले आहेत आणि या दोघांत सहिष्णुतेला काही स्थान राहिलेले नाही."

 

वानगीदाखल ही दोन नावे घेतली आहेत. तशी घेण्यासारखी खूप नावे आहेत. वृत्तपत्राच्या लेखाला शब्दमर्यादा असते. बाकीचे लोक जे काही म्हणतात ते सार रुपाने या दोघांच्या बोलण्यात आलेले आहे. आता काही प्रश्न - पहिला प्रश्न असा की, २०१४ नंतरच देशातील सहिष्णुता धोक्यात आलेली आहे, असे या काँग्रेसी रागदारी गवय्यांना का वाटले? त्यांची कसोटी लावली तर या देशातील सर्वात श्रेष्ठ असहिष्णु माणूस म्हणजे पं. नेहरू ठरतात. त्यांनी वैचारिक विरोध असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुरुंगात टाकले. गांधी खूनात त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या बदनामीची मोहीम सातत्याने चालविली. तेव्हा सहिष्णुता मास्कोतील व्होल्गा नदीत स्नान करायला गेली होती काय? पं. नेहरु यांनी गांधी खूनात संघाला गोवले. संघाच्या जवळजवळ ८० हजार स्वयंसेवकांना तुरुंगात टाकले. त्यांची घरे जाळली. पश्चिम महाराष्ट्रात अनेकांना जाळून मारण्यात आले. भालजी पेंढारकर यांचा स्टुडिओ जाळून टाकण्यात आला. तेव्हा सहिष्णुता हिमालयात तपश्चर्येला गेली होती काय? इंदिरा गांधींनी १९७५साली आणीबाणी आणली. लाखांहून अधिक विरोधकांना तुरुंगात डांबले. आपले सहकारीदेखील तुरुंगात पाठविले. पितृतुल्य जयप्रकाश नारायण हेदेखील तुरुंगात गेले. तुरुंगात अनेकजणांचे मृत्यू झाले. ४२वी घटना दुरुस्ती आणून राज्यघटना पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सहिष्णुतेचा राग आळविणारे कोणत्या उंदराच्या बिळात बसले होते, हे त्यांनी सांगितले पाहिजे. नेहरु-गांधी घराण्याबाहेरचे नरसिंह राव देशाचे पंतप्रधान झाले. वार्ध्यक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा अत्यंसंस्कार दिल्लीत होता नये, असा १० जनपथावरुन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आदेश गेला. त्यांचा अत्यंविधी आंध्रमध्ये झाला. हा सर्व प्रसंग संजय बारु यांच्या 'दि अ‍ॅक्सीडेन्टल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकात वाचायला मिळेल. तेव्हा आजचे सहिष्णुतावादी व्हिस्कीचे घोट घेत बसले असावेत.

 

जगदीश रत्तनानी यांचा पूर्ण लेख वाचला तर तो पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत विषाने भरलेला आहे, हे लक्षात येईल. भाजपचे शासन त्यांना नको आहे. त्यासाठी ते म्हणतात की, सर्वांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. विद्यार्थी आंदोलने करतात, तशी आंदोलने केली पाहिजेत. अन्य वृत्तपत्रांपेक्षा त्यातला त्यात 'फ्रि प्रेस जर्नल' हे अधिक वस्तुनिष्ठ बातम्या देणारे आणि देशनिष्ठ संपादकीय लिहिणारे वृत्तपत्र आहे. त्यांनी हा लेख छापला. सहिष्णुतेचा पहिला धडा दिला. कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिला नाही. त्या लेखाची लायकी तीच आहे. या लेखावर, हा लेख लिहिपर्यंत तरी पोलिसी कारवाई झाली नाही. शासनाला दखल घ्यावी असे काही वाटले नाही, त्यांनीदेखील हा लेख सहन केला आहे. शशी थरुर यांना तीन विवाह करुनही हिंदू जनतेने सहन केले आहे. हिंदूंचा आदर्श अनेक बायका करणारा कुणी नसतो. ते आता खरा हिंदू कोण, तो कसा सहिष्णु असतो, या विषयावर प्रवचने देत देशभर फिरत असतात. दहा वर्षांपूर्वी ते काय करीत होते, काय बोलत होते, आजच ते एवढे हिंदू कसे झाले? असे प्रश्न त्यांना कुणी विचारत नाही. यापेक्षा आणखी सहिष्णुता काय हवी? मुख्य प्रश्न सहिष्णुता किंवा असहिष्णुतेचा नाही. इंग्रजी विद्वान 'आयडिया ऑफ इंडिया' हा शब्दप्रयोग करतात. त्याचे भाषांतर 'संकल्पना भारताची' असे करता येऊ शकते. परंतु, इंग्रजी शब्दांचे खास अर्थ असतात. त्याचे भाषांतर होऊ शकत नाही. 'आयडिया' या शब्दात खूप मोठा (कु)विचार आहे. तो असा आहे की, भारत हे खिचडी राष्ट्र आहे. ती एक प्रकारची धर्मशाळा आहे. येथे सर्वांना मुक्त प्रवेश आहे. वाटेल ते बडबडण्याचे स्वातंत्र्य आहे. हिंदूचे धर्मांतर करण्याचा मुक्त परवाना आहे. भारताची संस्कृती एक नाही, ती अनेक संस्कृतीचा मेळ आहे. आम्हाला आधुनिक झाले पाहिजे. त्यासाठी इंग्लड, अमेरिकेचे अनुकरण केले पाहिजे. त्यांचा पोशाख, त्यांचा आहार, त्यांचे खाणेपिणे, स्त्री-पुरुष संबंधातील मुक्त जीवन आपण जगले पाहिजे. ही आहे, 'आयडिया ऑफ भारता'ची संकल्पना. ही संकल्पना जगणारी तथाकथित बुद्धिवादी माणसे या देशात आहेत. पुरस्कारवापसीवाले बहुतेक आणि स्वनामधन्य पत्रकार, डावे इतिहासकार, या प्रकारात मोडतात.

 

मोदींचे शासन येणे म्हणजे ही संकल्पना ज्या भारताला मान्य नाही, त्या भारताचे राज्य येणे, असा आहे. मोदींचा भारत धर्मजीवन जगणारा भारत आहे. धर्मजीवन म्हणजे मूल्यांवर आधारित जीवन जगणे. ही मूल्ये आहेत-सुखाने जगा, सुखाने सगळ्यांना जगवा, सत्याची कास धरा. सर्वत्र प्रकाश फैलविण्याचे काम करा. अनावश्यक हिंसा टाळा. सर्वांवर निरपेक्ष प्रेम करा. ही सर्व सृष्टी परमेश्वराने निर्माण केलेली असून येथील सर्व धनसंपत्ती त्याचीच आहे, या भावनेने तिचा त्यागपूर्ण उपभोग घ्या. स्त्रीत मातृत्व पहा. ही मूल्ये, 'आयडिया ऑफ भारत'च्या मूल्यांशी मेळ खात नाहीत. या मूल्यांचा प्रभाव वाढला तर 'आयडिया ऑफ भारत'ची मूल्ये टिकणार नाहीत. ती टिकली नाहीत तर सत्ता हातात राहणार नाही. सत्ता म्हणजे केवळ राजकीय सत्ता नव्हे. ती सांस्कृतिक सत्ता असते, बौद्धिक असते, आर्थिक असते. दिल्लीतील या सत्तेची केंद्रे आहेत, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, इंडिया इंटरनॅशल सेंटर आणि ल्यूटिएन्स. यातील 'इंडिया इंटरनॅशनल सेंटर' हे फारच शक्तीशाली आहे. तेथे भारतातील बहुतेक सर्व 'आयडिया भारत'वाले तुम्हाला भेटतील. फाईव्ह स्टार हॉटेलला लाजवील अशा प्रकारची व्यवस्था तेथे अनुभवायला येईल. सर्व खर्च सरकारचा. या सर्व सत्तास्थानावर काँग्रेस घराण्याने आपले गवई बसविलेले आहेत. त्यांच्या आसनाखाली आता सनातन भारताच्या विचाराची धग निर्माण झाली आहे. अजून तिच्या ज्वाळा झालेल्या नाहीत. त्या उद्या होणार नाहीत, असे नाही. आता सध्या प्रसववेदना चालू आहेत. आपले भवितव्य या सर्वांना दिसू लागले आहे. म्हणून ते अस्वस्थ झालेले आहेत. जो जन्मानेच सहिष्णु आहे, जीवनाने सहिष्णु आहे, जगण्याने सहिष्णु आहे, त्याला सहिष्णुता शिकविणे म्हणजे गटाराचे पाणी घेऊन गंगाजल शुद्ध करण्यासारखे आहे. एका अर्थाने ही वैचारिक लढाई आहे. वैचारिक लढाईत शत्रू बुद्धिभ्रम निर्माण करणारी अस्त्रे बाहेर काढतो. तो आपल्याच शस्त्रांनी आपल्याशी लढायला लागतो. कृष्णाला ठार करण्यासाठी कंसाने अनेक मायावी राक्षस पाठविले. एक राक्षसीण पुतना मावशी बनून आली. असे अनेकजण आले. आपण त्यांना त्यांच्या मूळ स्वरुपात ओळखले पाहिजे. त्यांना त्यांच्याच शस्त्रांनी धुवून काढले पाहिजे. हा देश भूतकाळात कधी असहिष्णु नव्हता, आज नाही, उद्या तो कुणीही कर शकत नाही. असे काम करणे म्हणजे हिमालयातील कैलास पर्वत येथून उचलून आणून बारामतीला ठेवण्यासारखे काम आहे, केवळ अशक्य.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.