वेदनेच्या मुळाशी कवितेचा जन्म होतो : कवी अशोक बागवे

    दिनांक  04-Jan-2020 21:16:08
|
Ashok _1  H x W
 


ठाणे : कवी समाजातील विविध घटना संवेदनशील कवी टिपत असतो. या घटना टिपत असताना कवी मनाला ज्या वेदना होतात.त्याच्या ज्या सृजनशील संवेदना असतात. त्या वेदनेच्या मुळाशी कवितेचा जन्म होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी ‘छंद आनंद’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी केले.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ठाण्याचे प्रथम नागरिक महापौर नरेश म्हस्के यांनी भूषविले. कवी शिवराम (महेश) टक्के यांच्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात झाले. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, शिक्षणतज्ज्ञ व लेखक प्रदीप ढवळ, विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, एकनाथ पवळे तसेच ज्ञानसाधना महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

कवी महेश टक्के हा ज्ञानसाधना महाविद्यालयाचा विद्यार्थी असून या महाविद्यालयातील विद्यार्थी आज विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहे, “या महाविद्यालयाकडे पूर्वी लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. कमी गुण प्राप्त केलेल्या मुलांना ज्ञानसाधनाने स्वीकारले आणि आज आमचे विद्यार्थ्याचे यश पाहून मनाला खूप आनंद होतो,” असे सांगत अशोक बागवे म्हणाले, “कवी महेश टक्के यांनी महाविद्यालयात किती टक्के मिळवले माहीत नाही. परंतु, त्यांचा छंद आनंद हा काव्यसंग्रह 100 टक्के यश मिळविणार,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

ही आनंदाची बाब

महापालिकेच्या वातावरणात राहून महेश टक्के यांनी आपली ही कला जोपासली आहे, त्यांच्या कविता या सामाजिक जीवनावर भाष्य करणार्या असल्या तरी हा कवी हळवा असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. तसेच महापालिकेतील कर्मचारी सुध्दा आपले कामकाज सांभाळून आपली कला जोपासत आहेत ही खरोखर आनंदाची बाब असल्याचे सांगत महापौरांनी शिवराम टक्के यांना शुभेच्छा दिल्या.

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.