'रिपब्लिक'च्या कार्यालयाबाहेर गोंधळ घालणाऱ्या समाजकंटकांचे प्रयत्न अयशस्वी

31 Jan 2020 22:36:03

asf_1  H x W: 0
मुंबई : 'रिपब्लिक टीव्ही'चे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विरोध करण्यासाठी 'रिपब्लिक टीव्ही वृत्तसमूहा'च्या कार्यालयाबाहेर जमलेल्या समाजकंटकांचे गोंधळ घालण्याचे प्रयत्न अखेर अयशस्वी राहिले. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत यावेळी आंदोलकांचे प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे येथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
 
गुरुवार, दि. ३० जानेवारीच्या मध्यरात्री अर्णब गोस्वामी यांच्या 'रिपब्लिक टीव्ही' या वृत्तवाहिनीच्या कार्यालयासमोर काही आंदोलनकर्ते जमले होते. काही डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या कार्यकर्त्यांचा यात सहभाग असल्याचे समजते. पोलिसांनी यावेळी कठोर भूमिका घेत काही जणांची चौकशी सुरू केली. यावेळी धुडगूस घालण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना वेळीच ताब्यात घेतले. पोलिसांपुढे आपला निभाव लागत नसल्याचे लक्षात येताच यावेळी आंदोलकांनी काढता पाय घेतला.
 
नुकत्याच दोन दिवसांपूर्वी कुणाल कामरा या व्यक्तीने विमान प्रवासादरम्यान पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कुणाल कामरा यांना विमानावाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली. हा सर्व प्रकार घडल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री काही समाजकंटक 'रिपब्लिक टीव्ही'च्या परळ येथील कार्यालयाबाहेर धुडगूस घालण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी संपूर्ण रस्त्यावर मोठा फौजफाटा ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. संशयास्पद वाटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ओळखपत्राची विचारणा केली. संशयास्पद व्यक्तींना ताब्यातही घेतले. त्यामुळे 'रिपब्लिक'च्या कार्यालयाबाहेर गोंधळ घालण्याचे प्रयत्नांना यश आले नाही.
Powered By Sangraha 9.0